हिंद-दी-चादर श्री गुरु तेग बहादुर साहिबजी; मानवतेच्या रक्षणासाठी दिलेल्या सर्वोच्च बलिदानाची तेजस्वी आणि अमर गाथा!
02-Mar-2026
Total Views |
मुंबई : (‘Hind Di Chadar’ Sri Guru Tegh Bahadur Sahib Ji 350th Shaheedi Samagam)" महाराष्ट्राच्या पवित्र भूमीवर ‘हिंद दी चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिबजी ३५० वा शहिदी समागमाच्या माध्यमातून आपण महान परंपरेचे साक्षीदार होत आहोत. गुरूंनी दिलेला त्याग आणि सामाजिक एकतेचा संदेश आजही तितकाच महत्त्वाचा आहे."असा संदेश प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ध्वनिचित्रफितद्वारे दिला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितले की," गुरूंनी त्यागाची पराकाष्ठा केली. त्या काळात समाजातील सर्व घटक एकत्र उभे राहिले. सत्य आणि संस्कृतीसाठी ठाम राहण्याची प्रेरणा समाजाला मिळाली. या सामाजिक एकतेच्या महायज्ञात गुरु गोविंद सिंह आणि गुरु नानक नाम लेवा संगत यांची महत्त्वाची भूमिका होती. आज देशाला पुन्हा सामाजिक एकतेची गरज असताना हा समागम आश्वासक ठरत असल्याचे त्यांनी नमूद केले." तर केंद्रीय गृह व सहकारमंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवार दि.१ रोजी नवी मुंबई येथे 'हिंद-दी-चादर' श्री गुरु तेग बहादुर साहिबजी ३५० वां शहीदी समागम येथे प्रमुख उपस्थिती दर्शविली.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या सनातन हिंदू धर्म व संस्कृतीचे रक्षण करण्यासाठी दिलेल्या ‘अद्वितीय बलिदाना’ची आठवण करून देत असे प्रतिपादन केले की,"श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या बलिदानामुळे आपण आपल्या आस्थेचे रक्षण करू शकलो. या समागमच्या माध्यमातून नानकपंथी समाज व सनातन धर्मावर श्रद्धा ठेवणारे सर्व भाविक एकत्रितपणे 'शहीदी समागम' साजरा करतील आणि श्री गुरु तेग बहादूर साहिबजी व श्री गुरू ग्रंथ साहिब यांच्यापुढे नतमस्तक होतील."
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की," औरंगजेबाने श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यावर बंदी घातली तेव्हा लक्खी शहा बंजाराजी यांनी त्यांचे पार्थिव घरी आणून घरासकट अग्नी दिला. श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या बलिदानाने देशात अशी क्रांति निर्माण झाली की औरंगजेब कधीच यशस्वी ठरू शकला नाही. महाराष्ट्र शासनाने श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या शौर्यगाथेचा समावेश शालेय अभ्यासक्रमात केला आहे. तसेच त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ नवी मुंबई येथे श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या नावाने एक रुग्णालय उभारण्यात येणार आहे."
यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, मंत्री मंगलप्रभात लोढा, मंत्री गिरीष महाजन, मंत्री ॲड. आशिष शेलार, मंत्री गणेश नाईक, मंत्री संजय राठोड, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, आमदार रविंद्र चव्हाण, आमदार बाबूसिंह महाराज राठोड, शीख धर्मगुरु बाबा हरनाम सिंह खालसा व इतर मान्यवर उपस्थित होते.