Jay Pawar: अजितदादांच्या अपघात प्रकरणाला नवे वळण; जय पवारांकडून धक्कादायक व्हिडिओ समोर

    02-Mar-2026   
Total Views |

Jay Pawar
 
मुंबई : (Jay Pawar) राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर एक महिना उलटल्यानंतरही या प्रकरणातील गूढ कायम आहे. २८ जानेवारी रोजी घडलेल्या या भीषण घटनेनंतर राजकीय वर्तुळात घातपाताचा संशय व्यक्त होत असून सखोल चौकशीची मागणी होत आहे. दरम्यान, त्यांचे पुत्र जय पवार यांनी सोशल मिडियावर प्रसिद्ध केलेल्या एका व्हिडिओमुळे या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे.
 
जय पवार यांचा गंभीर आरोप
जय पवार यांनी प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओत VSR विमान कंपनीचे मालक रोहित सिंह हे उड्डाणादरम्यान मुख्य वैमानिकाच्या सीटवर झोपलेले दिसत असल्याचा दावा करण्यात आला आहे. “माझ्या वडिलांना आपण गमावले. ही वेदना आयुष्यभर साथ देणार आहे. या व्हिडिओत मुख्य वैमानिकाच्या सीटवर झोपलेले दिसत आहे. आकाशात असताना असा निष्काळजीपणा असू शकत नाही. हे अत्यंत गंभीर आणि धक्कादायक आहे,” असे जय पवार यांनी म्हटले आहे.
 
कठोर कारवाईची मागणी
जय पवार यांनी नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाकडे तात्काळ कठोर कारवाईची मागणी केली आहे. संपूर्ण चौकशी पूर्ण होईपर्यंत VSR कंपनीची सर्व विमाने तात्काळ ग्राउंड करण्यात यावीत तसेच संबंधित व्यक्तीवर त्वरित अटक करून कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. “ही एका मुलाची आर्त हाक आहे. माझ्या वडिलांसाठी आणि प्रत्येक प्रवाशाच्या सुरक्षिततेसाठी,” असे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये व्हिडिओ शेअर करताने म्हटले आहे.
 
रोहित पवार यांची भूमिका
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनीही अपघातानंतर कंपनीच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी त्यांनी सातत्याने केली आहे. नव्याने समोर आलेल्या व्हिडिओनंतर पुन्हा एकदा VSR कंपनीवर टीकेची झोड उठली आहे.
 
प्राथमिक अहवालातील निष्कर्ष
अपघातानंतर नागरी उड्डाण मंत्रालयाच्या Aircraft Accident Investigation Bureau (AAIB) कडून प्राथमिक अहवाल सादर करण्यात आला आहे. अहवालानुसार, लॅंडिंगवेळी बारामती विमानतळावर सुमारे ३ किलोमीटर दृश्यमानता होती, तर दृश्यमान उड्डाण नियमांनुसार किमान ५ किलोमीटर दृश्यमानता आवश्यक असते. परिसरात हलके धुके असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.
 
अहवालात म्हटले आहे की, विमान सुरुवातीला एका झाडावर आदळले आणि त्यानंतर जमिनीवर कोसळले. विमान धावपट्टीच्या डाव्या बाजूस सुमारे ५० मीटर अंतरावर पडले. अपघातावेळी वैमानिक कक्षातून आपत्कालीन उद्गार ऐकू आल्याची नोंद करण्यात आली आहे.
 
तांत्रिक बाबी
बारामती हे अनियंत्रित एअरफिल्ड असल्याचे अहवालात नमूद आहे. रनवे मार्किंग फिकट असणे, सैल खडी, विंडसॉकचा अभाव आणि अपुरी संरक्षक भिंत अशा त्रुटी आढळल्या आहेत. फ्लाइट डेटा रेकॉर्डरचा डेटा यशस्वीपणे डाउनलोड करण्यात आला असून कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डरचा डेटा तांत्रिक प्रक्रियेद्वारे पुनर्प्राप्त केला जाणार आहे. तसेच, उड्डाणापूर्वी दोन्ही वैमानिकांनी मद्यपान केले नव्हते, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
 
एकूणच, प्राथमिक अहवालाने काही तांत्रिक बाबी स्पष्ट केल्या असल्या तरी जय पवार यांनी केलेल्या आरोपांमुळे या प्रकरणाची चौकशी अधिकच संवेदनशील ठरली आहे. अंतिम अहवालानंतरच या भीषण अपघातामागील नेमके कारण स्पष्ट होणार आहे.

दिनेश दानवे

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर येथून पदवी आणि मराठवाडा मित्र मंडळाचे वाणिज्य महाविद्यालय, पुणे येथून पत्रकारिता अभ्यासक्रमात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. डिजिटल आणि सोशल मीडिया हाताळण्याचा अनुभव असून राजकारण, मनोरंजन आणि शेती या विषयांमध्ये विशेष रस आहे. प्रिंट आणि डिजिटल माध्यमांमध्ये इंटर्नशिपचा अनुभव घेतला असून सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत आहेत.