तिसऱ्या महायुद्धाचा भडका

    02-Mar-2026
Total Views |
Iran–Israel–US Conflict
 
इराण- इस्रायल- अमेरिका या तिघांच्या संघर्षांने जगाला वेठीस धरले आहे. अमेरिका आणि इस्रायलने केलेल्या हल्ल्यामध्ये इराणचे सर्वेसर्वा अयातुल्ला खोमेनी ठार झाले. त्यामुळे या युद्धाची व्याप्ती वाढण्याचे संकेत आहेत. कोणतेही युद्ध सुरु करताना, त्याचे काही उद्दिष्ट असते. या युद्धातील कारक देशांच्या उद्दिष्टांचा आणि त्याच्या परिणामांचा घेतलेला आढावा...
 
ज्या संकटाची जगाला गेले काही महिने भीती वाटत होती, ते आता जगापुढे आ वासून उभे ठाकले आहे. अमेरिका आणि इराण यांच्यातील वाटाघाटींच्या फेऱ्या सुरू असतानाच, प्रथम अमेरिका आणि इस्रायल यांनी मिळून शनिवार, दि 28 फेब्रुवारीला भारतीय वेळेनुसार सुमारे 11.30 ते 12 वाजेदरम्यान हवाई हल्ले करण्यास सुरुवात केली. लागोलाग इराणनेही, इस्रायल आणि अमेरिकेच्या आखाती मित्र देशांमधे असलेल्या लष्करी ठाण्यांवर प्रतिहल्ल्यांना सुरुवात केली. काही तासांतच हेही लक्षात आले की, हे हल्ले केवळ लष्करी ठिकाणांपुरते मर्यादित न राहता, नागरी ठिकाणांवरही झाले. सर्वांत हृदयद्रावक हल्ला इराणमधील एका मुलींच्या शाळेवर झाला. नवीनतम मिळालेल्या माहितीप्रमाणे, त्या हल्ल्यात विद्यार्थिनींसह सुमारे 100 लोकांना प्राण गमावावे लागले. तेहरानसकट इतर अनेक शहरांवर न जुमानता अमेरिकेने हवाई हल्ले केले. हे करताना प्रत्येक वेळी फक्त सैनिकी छावण्याच पाहून ते केले असे नसून, नागरी वस्त्याही त्यातून सुटल्या नाहीत. तेहरान तर तेच पाहात होता.
 
त्याचेही प्रतिहल्ले नागरी वस्त्यांवर आणि बंदरांवर झाले. शनिवार, दि. 28 फेब्रुवारीच्या रात्रीपासूनच अनेक वाहिन्यांवर या युद्धाची प्रत्यक्ष वृत्ते आणि त्यांची समालोचने सुरू आहेत. ती इतकी की, शेवटी ती पाहण्याचा वीट आल्यासारखे झाले. ती दृश्ये आणि ठिकाणे दै. ‌‘मुंबई तरुण भारत‌’च्या वाचकांना आतापर्यंत बहुतांश माहिती झाली असतील. अगदी थोडक्यात लिहायचे तर, इराणने इस्रायल आणि अमेरिकी ठाण्यांबरोबरच, इतर आठ आखाती देशांवरही जवळपास एकाचवेळी हल्ले सुरू केले. इराणी परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते इस्माईल बघाइल यांनी त्याच्या समर्थनार्थ म्हटले की, “त्या देशांमध्ये अमेरिकेच्या लष्करी ठाण्यांमधून हल्ले होण्याची शक्यता लक्षात घेता, स्वसंरक्षणार्थ आम्ही हल्ले केले.” अशी खरी-खोटी समर्थने होतच असतात आणि होत राहतीलही. प्रश्न असा आहे की, हे युद्ध भडकण्याची चिन्हे गेले काही महिने जगावर घोंघावत होती. त्यादरम्यानच या होऊ घातलेल्या युद्धात त्यांना काय साध्य करायचे आहे, याची निश्चितीही केली होती. ती लक्षात घेऊनच त्यांची लक्ष्ये कितपत साध्य होण्याची शक्यता आहे, हे लक्षात घेतले पाहिजे.
 
प्रत्येकाची लक्ष्ये
 
अमेरिकेला सतत पाण्यात पाहणाऱ्या आणि त्याच्यावर स्थानिक पातळीवर कुरघोडी करण्यासाठी अयातुल्लांची क्रांती झाल्यापासून, अणुशस्त्रे बनविण्यासाठी आसुसलेल्या इराणी मुल्लाशाहीला नमविणे आणि त्यांना अणुशस्त्रे प्रगत करण्यापासून पूर्णपणे थांबवणे, हे उघडपणे अमेरिकेचे लक्ष्य होते. ते करण्यासाठी इराणमधून अयातुल्लाशाही पदच्युत करून, लोकशाहीवादी शासन प्रस्थापित करणे आणि उघडपणे सांगितले गेले नसले, तरी इराणमधे मुबलकपणे उपलब्ध असलेल्या खनिज तेलाच्या साठ्यावर वर्चस्व प्रस्थापित करणे, हेही लक्ष्य होते. मागील शतकात इराणमधे लोकशाहीवादी शासन प्रस्थापित झाले असता ते स्वतंत्रपणे निर्णय घेते; आपल्या कह्यात नाही यासाठी अमेरिकेने तेथे अंतर्गत उत्पात घडवून आणून, शहा-पहलवींची राजसत्ता प्रस्थापित केली होती. जनतेने केलेल्या उठावानंतर जी अयातुल्लाशाही प्रस्थापित झाली, ती जर अमेरिका धार्जिणी असती, कमीतकमी विरोधात उभी नसती, तर ती जुलमी राजवट अमेरिकेने ‌‘सुखेनैव‌’ चालू दिली असती.
 
एवढेच काय, पण पाकिस्तानप्रमाणे इराणला अण्वस्त्रसज्ज होण्यास मदतही केली असती. अमेरिकेला साम्यवादी सोव्हिएत संघावर जवळून लक्ष ठेवण्यासाठी एक मित्र देशही मिळाला असता. पण अयातुल्ला राजवटीने ‌‘डेथ-टू-अमेरिका‌’, ‌‘डेथ-टू‌‘-इस्रायल‌’ हे नारे बुलंद केल्याने, अमेरिकेने इराणमधील राजवट पलटविण्याचा चंगच बांधला. सध्याच्या परिस्थितीत अमेरिकेचे ते लक्ष्य आहे. त्याच्या अनुषंगाने सध्याच्या अयातुल्ला अली खोमेनी यांची हत्या घडवून आणणे, हे एक उद्दिष्ट सफल झाले आहे.
इस्रायल इराणकडे अधिक वेगळ्या नजरेने पाहतो. कारण इराणची ज्यूंकडे आणि पर्यायाने इस्रायलकडे पाहण्याची दृष्टी अधिक कडवी आहे. इराणची मुल्लाशाही आताही मध्ययुगीन धार्मिक कडवेपणातच रुतलेली आहे. अरबस्तानातील ज्यूंनी प्रयत्न करूनही पैगंबरांना प्रेषित म्हणून मान्यता दिली नव्हती. बद्रच्या लढाईत विजय मिळाल्यानंतर, पैगंबरांच्या समोर शेकडो ज्यूंना कंठस्नान घातले गेल्याचा इतिहास आहे. त्या धार्मिक कट्टरतेच्या पार्श्वभूमीवरच, छोटेसे इस्रायल पृथ्वीवरून नष्ट करण्याचा चंग अयातुल्ला राजवटीने बांधला होता. ते विद्वेषाचे विष सामान्य इराणी जनतेच्या मनात खोलवर रुजविण्याचे काम राजवटीने केले. त्याला धरूनच अयातुल्ला राजवटीने इराणमध्ये तर जय्यत तयारी केली होतीच, पण इस्रायलच्या शेजारील प्रदेशात ‌‘हमास‌’, ‌‘हिजबुल्ला‌’सारख्या अतिरेकी संघटनांना शस्त्रसज्ज करून, इस्रायलमध्ये उत्पात घडविण्याचे प्रयत्न इराण सतत करत आहे. कधीतरी इस्रायलशी युद्ध करून आज इस्रायलने जी स्थिती पॅलेस्टाईन जनतेची केली, जसा तेथे अक्षरशः गाढवाचा नांगर फिरवला, अगदी तीच स्थिती इस्रायलची करण्यासाठी इराणने तयारी सुरू ठेवली होती.
 
इस्रायला पुरते नेस्तनाबूत करण्यासाठी इराणने अण्वस्त्रे आणि लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रे विकसित केल्याचे इस्रायलने लक्षात घेऊनच, इराणचा अण्वस्त्रप्रगतीचा कार्यक्रमच नष्ट करण्याचे धोरण या हल्यादरम्यान ठरविले आहे. त्यासाठी अमेरिकेचे सक्रिय साहाय्य आवश्यक होते. ते देण्यासाठी नेतान्याहू यांना ट्रम्पसारखा उथळ आणि बोलभांड मदतनीसही मिळाला. या युद्धात इराणचे अण्वस्त्रनिर्मितीचे कारखाने आणि क्षेपणास्त्रे बनविण्याची क्षमता पुरती नष्ट करण्याचे, त्यावर बंधन घालण्याचे इस्रायलचे लक्ष्य आहे.‌ ‘डेथ-टू-अमेरिका‌’, ‌‘डेथ-टू-इस्रायल‌’ हे नारे बुलंद करणारी अयातुल्ला राजवट आपली उद्दिष्टे साध्य करण्यासाठी, कुठल्याही पातळीपर्यंत अगदी स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेण्यापर्यंत आणि त्याचवेळी जगातील जवळपास सर्वच देशांना वेठीस धरण्यापर्यंत गेली आहे. काही तासांच्या अवधीत खाडीतील जवळपास सर्वच अरब देशांवर हल्ले करून, इराणने त्यांना युद्धात खेचले आहे. यापूर्वी ‌‘हमास‌’ने एकाचवेळी हजारो क्षेपणास्त्रे टाकून, इस्रायलच्या लोहकवच अर्थात ‌’आर्यन डोम‌’ची कमतरता जगाच्या निदर्शनास आणली होती. तोच प्रयोग आता इराण सर्व ठिकाणी करत आहे. शेकडोंनी टाकलेल्या क्षेपणास्त्रांमधून दोन-चारतरी निसटून उत्पात घडवतील, हा त्याचा होरा खरा ठरतो आहे.
 
या पुढे काय?
 
गेल्या 28 तासांत इराणवर अनेक ठिकाणी यशस्वी हल्ले झाले. अयातुल्लांच्या निवासाला लक्ष्य करत बिळात घुसून स्फोट करणारे 30 बॉम्ब टाकून, पहिल्याच काही तासांतच स्वतः अयातुल्ला, त्याचे काही कुटुंबीय आणि त्याचवेळी बैठकीत असलेले महत्त्वाचे नेते मारण्यात अमेरिका इस्रायलच्या मदतीने यशस्वी झाली आहे. यातून इराणमध्ये सत्तापालट होईल का? तर लगेच सत्तापालट होण्याची शक्यता दिसत नाही. कारण अयातुल्ला राजवटीने संघर्ष न होता, सर्व पातळ्यांवर सत्तांतर सुरळीतपणे व्हावे याची व्यवस्था लावण्याची दूरदृष्टी दाखवली आहे. अयातुल्लाबरोबर मोठा मुलगा मारला गेला, तरी दुसरा त्याची जागा घेणार आहे. अधिकारापदाची पोकळी कुठल्याच स्तरांवर सध्या तरी दिसणार नाही. ट्रम्पने सामान्य इराणी जनतेला राजवटी विरोधात बंड करण्याचे केलेले आवाहन, सध्या तरी फळणे शक्य नाही. अयातुल्लांची खास फौज ते नृशंसपणे मोडून काढेल. तो प्रयोग आताच झाला आहे. जोवर ते कडवे सैन्य अयातुल्ला आणि मुल्लाशाहीला एकनिष्ठ आहे, तोवर जनतेचा उठाव यशस्वी होणार नाही.
 
इस्रायलचे उद्दिष्ट अण्वस्त्र उत्पादनाला दीर्घगामी खीळ घालणे असले, तरी ते सहजासहजी घडणार नाही. मागच्या जूनमध्ये त्या प्रयोगाची चाचणी झाली. पण, ती यशस्वी झाली नाही. त्यावरून शिकून इराणने अधिक पक्का बंदोबस्त केला असणार. तो मोडून काढण्याला वेळ लागेल. इस्रायललाही मोठ्या प्रमाणावर क्षती पोहोचेल. इराणची सर्व बाजूंनी खच्ची करून, त्याची पारंपरिक शस्त्रनिर्मितीक्षमता जवळपास नाहीशी झाल्यावरच अमेरिका आणि इस्रायल यांच्या आटोक्यात गोष्टी येतील. ती होताना इराणची सैन्यशक्ती हाराकिरी करू लागली, तर हे युद्ध नक्कीच लांबेल. सुमारे नऊ कोटी लोकसंख्येचा इराण पूर्णपणे नेस्तनाबूत होऊन, तो दाती गवत धरून पूर्णपणे शरण येईल, याची स्वप्ने ट्रम्पने पाहू नये. इराणने आततायीपणा दाखवला आहेच. त्याचे लगेचचे भविष्य म्हणजे, आज पॅलेस्टाईनमध्ये जसे इमारतींच्या अवशेषांचे ढिगारे दिसतात, तशीच काहीशी स्थिती थोड्याच दिवसांत इराणमधे दिसेल. आताच तेहरानमधे जागोजागी भव्य इमारतींमधून धुराचे लोट निघत आहेत. तीच स्थिती इतरही शहरांमधून दिसेल. हे युद्ध लांबू नये, अशीच सर्व जगाची इच्छा आहे. ती केव्हा सुफळ होईल याची वाट पाहणेच, आपल्या हातात आहे. सध्यातरी असेच म्हणावे, आलिया भोगासी असावे सादर| देवावरी भार घालोनिया॥
 
 
- डॉ. प्रमोद पाठक