मुंबई (विशेष प्रतिनिधी) - मेळघाट व्याघ्र प्रकल्पात रानकुत्र्याच्या एका कळपाचे नेतृत्व मादी लांडगा करत असल्याचे निदर्शनास आले आहे (melghat tiger reserve). श्वान कुळातील आंतरप्रजातींमधील हे वर्तन अभ्यासण्याजोगे असून गेल्या काही वर्षात राज्यातून लांडग्यांच्या बदलेल्या वर्तनाची अनेक उदाहरणे समोर आली आहेत. (melghat tiger reserve)
अमरावतीचे मानद वन्यजीव रक्षक डाॅ. सावन देशमुख यांनी मेळघाट व्याघ्र प्रकल्पामधून भारतीय लांडग्याची मादी ही रानकुत्र्यांच्या कळपाचे नेतृत्व करत असल्याचे निरीक्षण टिपले आहे. रानकुत्रा, कोल्हा, लांडगा हे श्वान कुळातील म्हणजेच कॅनीड कुटुंबातील प्राणी आहेत. एकाच कुळातील असले तरी रानकुत्रा आणि लांडगा यांच्या अधिवासात आणि सामाजिक रचनेत बराच फरक आहे. भारतीय लांडगा हा गवताळ प्रदेश आणि कृषी क्षेत्रात आढळतो. तर रानकुत्रा हा दाट पानझडी आणि सदाहरित जंगलात अधिवास करतो. लांडग्याच्या कळपाचे नेतृत्व हा नर करतो. तर रानकुत्र्यांच्या कळपाचे नेतृत्व ही मादी करते. या दोन्ही प्रजाती सोशल म्हणजे सामाजिक जीवन जगतात. त्यामुळे आंतर प्रजाती सहसंबंध निर्माण होऊ शकतात.
लांडग्यांबाबतचे असे सहसंबंध दी ग्रासलॅण्ड ट्रस्ट या संस्थेने पुण्यातील गवताळ प्रदेशांमध्ये टिपले आहेत. जिथे लांडगा हा कोल्हा आणि कुत्र्यांसोबत वावरताना त्यांच्या कळपासोबत फिरताना दिसला आहे. आता मेळघाटातील या घटनेचे अवलोकन करायचे झाल्यास. मुळातच मेळघाटात लांडगे तसे सामान्यपणे दिसत नाहीत. अशा परिस्थितीत त्याठिकाणी लांडग्याची कमी होणारी संख्या पाहता लांडग्याची ही मादी रानकुत्र्यांच्या कळपात सामील झाली असावी आणि रानकुत्र्यांनी देखील तिला सामावून आपल्या कळपाचे नेतृत्व करण्याची संधी दिल्याची शक्यता आहे. या युतीत तसा दोघांचाही फायदा आहे. कारण, हे दोन्ही प्राणी शिकारीमध्ये तरबेज आहेत. मात्र, दोन्ही प्राण्यांच्या शिकारीच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत. रानकुत्रे हे आपल्या भक्ष्याला पळवून जिवंतपणीच त्याचे लचके तोडतात. तर लांडगे हे भक्ष्याला पळवून थकवतात. त्यामुळे या दोन्ही शिकार पद्धतीचा फायदा मेळघाटातील या लांडगा-रानकुत्र्याच्या युतीला होत असण्याची शक्यता आहे.