फगव्यास गडी वनमाळी...

    02-Mar-2026
Total Views |
Holi
 
ग्रेगरीयन वर्षाची अलीकडेच सुरुवात झाली असताना, हिंदू पंचांगाचा शेवटचा महिना अर्थात फाल्गुन मासारंभ झाला आहे. फाल्गुन म्हटले की शिमगा आलाच. भारतीय संस्कृतीही सणांची संस्कृती असल्याने, सगळेच सण थोड्याबहुत फरकाने सर्वत्र साजरे होतात. त्यामुळे शिमगा काळातील होळीचे स्वरुपही देशभर वेगवेगळे दिसते. संतांनीही या होळीचे वर्णन विविध पद्धतीने केले आहे. आज असलेल्या होळीच्या सणाचा महिमा, त्याचा भौतिक, अध्यात्मिक अर्थ अशा विविध अंगाने घेतलेला आढावा...
होळी, धूळवड, शिमगा, फागपंचमी, रंगपंचमी! भारतीय परंपरेतील संवत्सराचा अखेरचा उत्सव. फाल्गुनी पौर्णिमेपासून सुरू होऊन रंगपंचमीपर्यंत चालणारा हा उत्सव, विविध रंगांच्या छटा घेऊन नवीन वर्षाची चाहूल देतो. होळी उत्सवाबाबत अनेक वैदिक, पौराणिक आणि ऐतिहासिक दाखले आहेत. ‌‘होलिकादहन‌’, ‌‘होळी‌’, ‌‘शिमगा‌’, ‌‘हुताशनी महोत्सव‌’ ‌’दोलायात्रा‌’, ‌‘कामदहन धूळवड‌’, ‌‘रंगपंचमी‌’ या आणि अशा विविध नावांनी, समस्त भारतात हा उत्सव साजरा होतो. ‌‘देशीनाममाला‌’ या ग्रंथात हेमचंद्र याने होळीला ‌‘सुग्रीष्मक‌’ असे नाव दिले आहे. यातूनच ‌‘शिमगा‌’ असा अपभ्रंश तयार झाला असावा, असे मानले जाते. काही लोक याला ‌‘नवान्नेष्टि‌’ नावानेही संबोधतात. शेतातील अर्ध्या पिकलेल्या पिकाचे अग्नीत हवन करून, प्रसाद वाटण्याची पद्धत काही ठिकाणी आहे. या अन्नाला ‌‘होळा‌’ म्हणतात. म्हणूनच होळीच्या दुसऱ्या दिवशी, गव्हाच्या ओंब्या भाजण्याचीही प्रथा आहे. या दिवसात गव्हाचे पीक तयार होते, हेच त्यामागील कारण असू शकते. नवीन पीक अग्नी देवतेला समर्पित करण्याची ही प्रथा आहे. काही लोक या उत्सवाला ‌‘अग्निउत्सव‌’ म्हणतात. ‌‘वसंतोत्सव, नवीन संवत्सरापूव केलेला यज्ञ‌’ असाही उल्लेख ब्राह्मण ग्रंथात केला आहे. ‌‘होळी‌’ शब्दाचे मूळ रूप ‌‘हुळहुळी‌’ (किंवा उलउली - शुभ संकेताचा ध्वनी या अर्थाने) असे आहे. सरत्या संवत्सरात झालेले कार्य हे ‌‘इदं न मम‌’ म्हणून, अग्निरूपी देवाला अर्पण करावे आणि नूतन संवत्सरात विजयासाठी उलुलय (विजयध्वनी-होळी) उच्चारण करण्याची पद्धत आहे.
 
उद्धर्षतां मघवन्‌‍ वाजिनान्युद वीराणां जयतामेतु घोषः|
पृथग्‌‍ घोषा उलुलयः एतुमन्त उदीरताम्‌‍|
(अथर्ववेद 3/19/6)
 
फाल्गुन मासातील पौर्णिमेला साजरा होत असलेल्या या उत्सवाची नक्षत्रदेवता इंद्र आहे.
 
फाल्गुनीष्वग्नीऽआदधीतएता वा इन्द्रनक्षत्रं
यत्‌‍ फाल्गुन्यःअप्यस्य प्रतिनाम्न्यः॥
(शतपथ ब्राह्मण 2/1/2/12)
 
मुळात भारतीय संस्कृती ही वैदिक यज्ञप्रधान संस्कृती आहे. होलिकोत्सव हे यज्ञमयी जीवनाचे प्रतीक आहे. लहान मुलांना पीडा देणाऱ्या होलिका, ढुंढा, पुतना यांसारख्या राक्षसींच्या दहनांच्या कथांमधून होलिकोत्सव परंपरेचा शोध घेता येतो. एका पौराणिक कथेनुसार भगवान विष्णूचा भक्त असलेल्या प्रल्हादाला मारण्यासाठी, हिरण्यकश्यपुने धाडलेल्या होलिकेचा श्रीविष्णूने वध केला होता. होलिकेला असा वर होता की, तिला अग्नी जाळू शकणार नाही; परंतु प्रल्हादाला जाळण्यासाठी तिने त्याला मांडीवर घेऊन अग्निकुंडात प्रवेश केला. प्रल्हाद श्रीविष्णूंच्या आशीर्वादाने बचावला व होलिकेचे दहन झाले, अशी आख्यायिका प्रचलित आहे.
भारतात काशी, मथुरा, वृदांवन, बरसाना येथील होळी जगप्रसिद्ध आहे. ‌‘लट्ठमार, फूलों लड्डूमार!‌’ पंजाबमधील होला-मोहल्ला हे होळी उत्सवाचे गुरुनानकदेव यांनी केलेले क्रांतिकारी स्वरूप आहे. नव्या पिढीला शास्त्रासोबत शस्त्रांची माहिती असावी, यासाठी होला-मोहल्ला उत्सवात शस्त्रांचे प्रदर्शन आणि आकर्षक कवायती केल्या जातात.
 
नंदगावातील गोपींना रंग लावण्यास जेव्हा युवक (गोपाल) येत, तेव्हा त्यांना तसे करण्यास मज्जाव करताना गोपिका लाठीने प्रतिकार करीत असत, याचेच नाव ‌‘लट्ठमार होळी.‌’ वैष्णव संप्रदायात ‌‘गौरपौर्णिमा‌’ या नावाने हा दिवस, चैतन्य महाप्रभू यांची जन्मतिथी म्हणूनही श्रीकृष्ण जन्माष्टमीप्रमाणेच भक्तिभावाने साजरा केला जातो. महाराष्ट्रात कोकण विभागात ‌‘शिमगोत्सव‌’ नावाने प्रचलित असलेल्या या उत्सवात, ग्रामदेवतांच्या पालख्या एकत्र उत्साहाने नाचविल्या जातात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासूनच स्वराज्यातील मावळे जे मर्दानी खेळ त्यावेळी खेळत असत, ती परंपरा आजही कोकणाने जोपासली आहे. आगीतून पलायन, नारळ जिंकणे अशा स्पर्धा आजही कोकणात शिमग्याच्या काळात भरवल्या जातात. उत्तर भारतात तर वसंतपंचमीपासूनच होळीपर्वाचा प्रारंभ होतो. खरं तर, होळी हा एक तेजोत्सव आहे. ब्रह्मांडात तेजोमय (प्रकाश) तरंगांची उधळण विविध रंगांच्या स्वरूपात साकार होत असते. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांनी ‌‘भावार्थदीपिके‌’तील 12व्या अध्यायात होळीचे गूढात्मक वर्णन केले आहे.
 
वज्राग्नीचिया ज्वाळीं| करूनि सप्तधातूंची होळी|
व्याधींच्या सिसाळीं| पूजिलीं यंत्रें॥
मग कुंडलिनियेचा टेंभा| आधारीं केला उभा|
तया चोजवलें प्रभा| निमथावरी॥
नवद्वारांचिया चौचकीं| बाणूनि संयतीची आडवंकी|
उघडिली खिडकी| ककारांतींची॥
 
घराच्या अंगणांत किंवा चौकात एक मोठी एरंडाची फांदी उभी करतात. लाकडे, पालापाचोळा, शेणाच्या गोवऱ्या यांची होळी रचून आंब्याची पाने, रेशमी वस्त्र, गाठी घालून, या होळीचे पूजन केले जाते. महाराष्ट्रात तर वडापुरणाचा नैवेद्यही होळीला अर्पण केला जातो. होळीत वापरल्या जाणाऱ्या विविध वस्तूंचा आध्यात्मिक गूढार्थ असा की, शेणाच्या गोवऱ्या (इथे शुभ या अर्थाने) सात्त्विक असे दूध, तूप, तर राजसी गुणांचे चंदन, कापूर आणि लाकडे अशुभ वासनायुक्त म्हणून तामसी! वासना, रसना या विविध विषयविकारांच्या अधीन असतात. त्यामुळेच त्या सत्त्व, रज आणि तमोगुणांनीही युक्त असतात. अशा विषयवासनांची होळी पेटवून, त्या होळीभोवती तीन प्रदक्षिणा घालून खालील प्रार्थना करावी.
 
वन्दितासि सुरेन्द्रेण, ब्रह्मणा शंकरेण च|
अतस्त्वं फाहि नो देवि, भूते! भूतिप्रदा भव॥
 
अर्थात, इंद्र, ब्रह्मदेव आणि शंकराला वंदन करून हे होलिकादेवी, तुम्ही आमचे रक्षण करून ऐश्वर्य प्रदान करावे. होळीच्या दुसऱ्या दिवशी शांत झालेल्या होळीची राख भस्म म्हणून, अंगाला लावण्याचीही पद्धत आहे. अमंगलाचा, जे जुने अर्थात कालबाह्य झाले आहे त्याचा त्याग करून नव्याचा स्वीकार, असेही होळीचे आध्यात्मिक महत्त्व आहे. सद्गुरू मनोहरनाथ महाराज रचित होळी पदात, होलिकामातेचे सुंदर वर्णन केले आहे. महाराज म्हणतात,
 
धडक होलिके भडक धुंडीके पातक भस्म करी
तेजोमय तव ज्ञानशिखा ही दुखहर सुखकारी
गोविंद वत्सल नाथमाऊली दासालागी कृपासाऊली
वेगीं धाव घे याच पाऊली मनोहरनाथ तारी
 
होलिकेला भद्रकाली, चंडी, शांता, वेदेश्वरी, लक्ष्मी, सरस्वती, नारायणी असे संबोधून सद्गुरू मनोहरनाथ महाराज म्हणतात, या होलिकेच्या तेजोमय प्रकाशात अज्ञान दूर व्हावे, देहभाव संपून ध्येयभाव जागृत व्हावा आणि षड्रिपूंचा विलय होऊन भक्तिभाव नांदावा. 
 
प्राचीन काळापासूनच संस्कृत साहित्यात होळीच्या विविध रूपांचे विस्तृत वर्णन केलेले आढळते. श्रीमद् भागवत महापुराणात रासक्रीडेचे वर्णन आहे. श्रीकृष्णलीलेत आपल्याला होळीचे वर्णन पाहावयास मिळते. संस्कृत काव्यात रंगोत्सवाचे वर्णन केलेले आढळते, ज्यात हर्षाच्या प्रियदर्शिका व रत्नावली आणि महाकवी कालिदास यांच्या ‌‘कुमारसंभवम्‌‍‌’ व ‌‘मालविकाग्निमित्रम्‌‍‌’ यांचा समावेश आहे. महाकवी कालिदासरचित ‌‘ऋतुसंहार‌’मधील एक संपूर्ण सर्गच (प्रकरण) वसंतोत्सवावर आधारित आहे. भक्तिमार्गात होळी आणि फाल्गुन महिन्याचे विशिष्ट महत्त्व आहे. सूरदास, रसखान, पद्माकर, जायसी, मीराबाई, कबीर यांसोबतच, भागवतधर्मातील संत एकनाथ, संत तुकाराम, संत नामदेव, संत देवनाथ, संत दयाळनाथ, संत गोविंदनाथ आणि संत मनोहरनाथ महाराज यांनीही सांप्रदायिक रचनेतून होळीचे वर्णन केले आहे. होळीवरील या भक्तिगीतांना (पद अथवा भजन) ‌‘होरी‌’ किंवा ‌‘फाग‌’ असे संबोधन आहे. बहुतेक धार्मिक संस्थान, मठ, मंदिरात फाल्गुन कृष्ण पंचमी, म्हणजेच रंगपंचमीला (देवाचा होलिकोत्सव) देवता विग्रहांवर पारंपरिक भजने गाऊन रंगाची उधळण करतात. अबीर, गुलाल उधळून देवतांसोबत रंग खेळला जातो.
 
अबीर गुलाल उधळीत रंग,
नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग
वाळवंटी गाऊ आम्ही वाळवंटी नाचू
चंद्रभागेच्या पाण्याने अंग अंग न्हाऊ
विठ्ठलाचे नाव घेऊनि निस्संग
नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग
 
किंवा
 
अबीर-गुलाल की धूम मचाई,
झुलत राधा संग,
भर पिचकारी रंग, गिरिधर झुलत राधा संग
 
संत मीराबाईची गवळणही प्रसिद्ध आहे. मथुरा, वृंदावनातील रंगपंचमीत अबीरचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. अबीर हा मूळ अरबी भाषेतील शब्द असून, त्याचा अर्थ ‌‘सुगंधी अर्क‌’ असा होतो. महाराष्ट्रातील संतकोषात मात्र तुळशीच्या काड्यांपासून तयार होणाऱ्या, पांडुरंगाला प्रिय असणाऱ्या बुक्क्यालाच ‌‘अबीर‌’ म्हणायची पद्धत आहे. उत्तर भारतात गुलाल सोडून, उर्वरित सगळ्या रंगांच्या मिश्रणाला ‌‘अबीर‌’ म्हणतात. बंगाली भाषेत मावळतीच्या सूर्याजवळ तयार होणारा लाल, गुलाबी आणि भगवा रंग म्हणजे अबीर. अबीर-गुलाल उधळताना ‌‘होरीगीत‌’ गाण्याची परंपरा आहे. समर्थ सद्गुरू दयाळनाथ महाराज अशाच एका (सुज अंजनगाव) होरी फागात स्वतःला गोपिका म्हणवून घेत, सद्गुरू देवनाथ महाराजांना कृष्णरूपात पाहात आहेत. ज्ञानरूपी गुलाल आणि ध्यानरूपी अबीर घेऊन आत्मरंगात न्हाऊन जाऊ, असे रूपक दयाळनाथ महाराज यांनी वापरले आहे.
 
खेलुंगी आज मै होरी प्रभूनाथजी संग
ज्ञान गुलाल और ध्यान अबीर की
हात लयी भर जोरी
आतम रंग सवाईसो मारुंगी
प्रेम भरी पिचकारी
देवनाथप्रभु नाथदयालसो
कबहु न रहुंगी मै न्यारी
 
संत कबीर यांनी वर्षात शेवटी येणारा फाल्गुन मास आणि त्यातही शेवटचा होलिकोत्सव म्हणजे, आयुष्याचे अंतिम चरण असे रूपक करून फाग रचला आहे. शांतिब्रह्म एकनाथ महाराज यांनी कलियुगात विठ्ठलनाम हेच सर्वश्रेष्ठ असल्याने नामस्मरण करीत राहावे, असा हितोपदेश केला आहे. नामानेच महा पापराशी नष्ट (होळी) होईल.
 
महा पापराशी त्यांची होय होळी|
विठ्ठलनामें टाळी वाजवितां
एका जनार्दनीं घेतां पैं दर्शन|
जड जीवा उद्धरण कलियुगीं
 
वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनीही ग्रामगीतेमधे होळी उत्सवातील अनैतिक प्रकारांवर प्रहार केले असून, होळी हा ‌‘ग्राम स्वच्छता दिन‌’ पाळावा असे आवाहनही केले आहे.
 
याच दिवशीं प्रल्हादाची छळणा|
केली होती होळीने जाणा|
परि दु:ख न झालें प्रल्हादप्राणा|
हरिभक्त म्हणोनि
होळी म्हणजे ग्रामशुद्धिदिन|
तैसेचि मातृदिन बालकदिन
श्रमिकदिन मानवतादिन|
स्वातंत्र्यदिनादि कितीतरी
 
समस्त संतांनी होळीवर अनेक भजने, आख्याने, धावा, फाग रचून भवरोग टाळण्यासाठी भक्तिरंगात न्हाऊन जाण्याचा हितोपदेश केला आहे. भक्तीच्या विविध रंगात एकात्मतेचे ध्यान लागावे, हेच तर संतांचे मागणे आहे. श्रीदेवनाथ मठात म्हटल्या जाणाऱ्या समर्थ सद्गुरू गोविंदनाथ महाराज (सुज अंजनगाव) रचित पारंपरिक होळी फागात महाराज म्हणतात,
 
या खेळू आज की होळी फगव्यास गडी वनमाळी
जन वदती भलते सलते परि हृदयी नच ते सलते
पिचकारी खांदी झोळी फगव्यास गडी वनमाळी
प्राणनाथ हनुमंताचा प्रभु राम गोविंदाचा
भवरोग नुरवी टाळी फगव्यास गडी वनमाळी
 
अज्ञानरूपी अंधाराला दूर सारण्यासाठी ज्ञानप्रकाशाची होळी पेटवली पाहिजे. संसारचक्राच्या रहाटगाडग्यात साधकांना ध्येयपथावर मार्गक्रमण करण्यासाठी सद्गुरूरूपी वनमाळी ठायी ठायी सोबत असतात, हेच गोविंदनाथ महाराज या फाग भजनात सांगत आहेत. होलिकोत्सवाच्या या आनंदात रंगून भवरोगाला टाळण्यासाठी म्हणूया, या खेळू आज की होळी, फगव्यास गडी वनमाळी!
 
 
 
- भालचंद्र हरदास