युट्यूबर 'एक्स मुस्लिम' सलीम वास्तिक यांच्यावर हल्ला करणाऱ्या आरोपीचा एन्काउंटर; कट्टरतावादी नेटवर्कशी संबंध उघड

मुख्यमंत्री योगींच्या इशाऱ्यानंतर मोठी कारवाई

    02-Mar-2026   
Total Views |

Salim Wastik

मुंबई : (Salim Wastik)
इस्लाममधील अनिष्ट प्रथांवर आणि धर्मासंदर्भात भाष्य करणारे युट्यूबर सलीम वास्तिक यांच्यावर शुक्रवार दि. २७ फेब्रुवारी रोजी झालेल्या प्राणघातक हल्ला प्रकरणातील मुख्य आरोपी रविवारी पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत ठार झाला. मृत आरोपीची ओळख झीशान अशी झाली असून तो अमरोहा जिल्ह्यातील नागला सैफीचा रहिवासी होता. सलीम यांच्यावर हल्ला केल्यानंतर तो त्याच्या साथीदारासोबत घटनास्थळावरून फरार झाला होता.(Salim Wastik)

१० मिनिटे सुरु होता गोळीबार

अतिरिक्त डीसीपी (गुन्हे) पियुष सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, गाझियाबादच्या लोणी पोलिस स्टेशनच्या हद्दीत पोलिस आणि मोटारसायकलवरून पळणाऱ्या आरोपीमध्ये तब्बल १० मिनिटे गोळीबार सुरू होता. आरोपीने या काळात १० राउंड फायरिंग केली. ग्रामीण स्वॅट टीम आणि लोणी पोलिसांच्या संयुक्त कारवाईत झीशानला गोळी लागली. त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. चकमकीदरम्यान लोणी पोलिस स्टेशनचे प्रभारी मुकेश कुमार यांच्या बुलेटप्रूफ जॅकेटला गोळी लागली, तर विपिन कुमार आणि सचिन कुमार या दोन्ही कॉन्स्टेबलच्या हाताला गोळी झाडली गेल्याची माहिती पोलिसांनी दिली. गाझियाबादचे पोलिस आयुक्त जे. रवींद्र गौड़ यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.(Salim Wastik)

योगींकडून कारवाईचा कडक इशारा

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी एक दिवसाआधीच सलीम यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी गुन्हेगारांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. या इशाऱ्यानंतर अवघ्या २४ तासांच्या आत पोलिसांनी आरोपीचा खात्मा केला आहे. या चकमकीनंतर, पोलिसांनी उर्वरित संशयितांना पकडण्यासाठी मोहिमा सुरू केल्या आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून लोणी परिसरात सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.(Salim Wastik)

सोशल मीडियावर कट्टरतावादाचं जाळं

या हल्ल्याबाबत तपासात आणखी धक्कादायक माहिती समोर आली आहे. सलीम यांच्यावर झालेला हल्ला हा वैयक्तिक वैमनस्याचा नसून सोशल मीडियावर पसरलेल्या कट्टरपंथी नेटवर्कमुळे झाल्याचे उघड झाले आहे. तपासानुसार, आरोपी झीशान आणि त्याचा साथीदार गुलफाम हे 'मुस्लिम आर्मी मेहदी मॉडरेटर्स' या टेलिग्रामवरील कट्टरपंथी गटाशी जोडलेले होते. सुमारे १८,२०० सदस्य असलेला हा ग्रुप सातत्याने धार्मिक कट्टरता, हिंसाचाराचे समर्थन आणि द्वेषयुक्त प्रचार करत होता. सलीम यांच्यावर हल्ला झाल्यानंतर याच ग्रुपवर त्यांच्या जखमांचे फोटो आणि भडकावू संदेश शेअर केले गेले. याच नेटवर्कमधील एका पाकिस्तानी यूट्यूबरनेही सलीम आणि काही हिंदू नेत्यांवर हत्या करण्याची उघड धमकी दिली होती. या चिथावणीच्या प्रभावाखालीच झीशान आणि गुलफाम यांनी सलीम यांच्यावर प्राणघातक हल्ला केला, असे तपासात उघड झाले आहे.(Salim Wastik)

दिवसाढवळ्या कार्यालयात शिरून हल्ला

शुक्रवारी सकाळी लोणी पोलिस स्टेशन परिसरात सलीम वास्तिक यांच्यावर कार्यालयात शिरून दोन हल्लेखोरांनी हल्ला केला होता. दुचाकीवरून आलेल्या दोघांनी धारदार शस्त्रानं त्यांच्या मान आणि पोटावर सलग वार करून त्यांना गंभीर जखमी केले. रक्ताच्या थारोळ्यात कोसळलेल्या सलीम यांना तातडीने जीटीबी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे.(Salim Wastik)

सलीम वास्तिक नेमके कोण आहेत?
सलीम वास्तिक स्वतःला 'एक्स मुस्लीम' म्हणजेच माजी मुस्लिम म्हणवून घेतात. त्यांनी वारंवार इस्लाम धर्म आणि इस्लाममधील अनिष्ट प्रथांविरोधात वक्तव्यं केली आहेत. त्यांच्या या कंटेंटमुळे सोशल मीडियावर त्यांना अनेकदा धमक्या आणि विरोधाचा सामना करावा लागला होता. त्यांच्या वक्तव्यांमुळेच ते काही कट्टरवाद्यांच्या निशाण्यावर असल्याची चर्चा आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि इतर पुराव्यांच्या आधारे तपास करून झीशानचा शोध घेतला. या प्रकरणात सहभागी असलेल्या इतर संशयितांचा पोलीस शोध घेत आहेत.(Salim Wastik)

अनिशा डुंबरे

मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\