'युरोपियन मधुबाज'चे सिंधुदुर्गात प्रथमच दर्शन; जिल्ह्यातील पक्ष्यांची यादी पोहोचली...

    02-Mar-2026
Total Views |
European Honey Buzzard




मुंबई (विशेष प्रतिनिधी) -
सिंधुदुर्गात प्रथमच युरोपियन मधुबाजाचे दर्शन घडले आहे (European Honey Buzzard). जिल्ह्यातील वालावल येथून पक्षीनिरीक्षकांनी या पक्ष्यांची नोंद केली आहे (European Honey Buzzard). युरोपातून स्थलांतर करुन येणाऱ्या या दुर्मीळ पक्ष्यांचा संचार जिल्ह्यात आढळणाऱ्या पक्ष्यांच्या संख्येत भर पडली असून सिंधुदुर्गात आढळणाऱ्या पक्ष्यांच्या प्रजातींची संख्या ४२९ झाली आहे. (European Honey Buzzard)
 
 
हिवाळ्याच्या तोंडावर परदेशातील अनेक शिकारी पक्ष्यांनी महाराष्ट्रातील गवताळ अधिवासांमध्ये स्थलांतर करण्यास सुरुवात केली आहे. शिकारी पक्ष्यांमधील 'ओरिएन्टल हनी बर्झड' म्हणजेच मधुबाज हा पक्षी सर्वसामान्यपणे महाराष्ट्रात आढळतो. मात्र, याच कुळातील दुर्मीळ असणाऱ्या युरोपियन हनी बझर्ड म्हणजेच युरोपियन मधुबाजाचे दर्शन सिंधुदुर्गातील कुडाळ तालुक्यात झाले आहे. जिल्ह्यातील पक्षी निरीक्षक डाॅ. श्रीकृष्ण मगदूम हे अभिजीत स्वरमंडळी आणि शेखर गायकवाड यांच्यासोबत वालावल येथे पक्षीनिरीक्षणासाठी गेले होते. त्यावेळी त्यांना युरोपियन मधुबाज पक्षी आकाशात घिरट्या घालताना दिसला. छायाचित्र टिपल्यानंतर सुरुवातीस त्यांना हा पक्षी मधुबाज वाटला. मात्र, ओळख पटवल्यानंतर त्यांना हा पक्षी मधुबाज नसून युरोपियन मधुबाज असण्यावर शिक्कामोतर्ब झाले.
 
 
शिकारी पक्ष्यांची ओळख ही प्रामुख्याने त्यांची शेपूट आणि पंखांवरील रंगछटांच्या खूणावरुन केली जाते. यापूर्वी मधुबाज आणि युरोपियन मधुबाजच्या प्रजननातून संकरित झालेल्या पक्ष्यांच्या नोंदी राज्यातून झाल्या आहेत. मात्र, सिंधुदुर्गात टिपलेला हा कोणताही संकर नसून तो युरोपियन मधुबाज आहे. त्यांचे पंख आणि शेपटीवरील खुणांवरुन तो युरोपियन मधुबाजच असल्याचे दिसत आहे. युरोप आणि मध्य आशियामधून हा पक्षी स्थलांतर करतो. यापूर्वी या पक्ष्याची नोंद गुजरात, केरळ, आंध्रप्रदेश या राज्यांमधून झाली आहे. महाराष्ट्रातून या पक्ष्याचा फार तुरळक नोंदी आहेत.
 
 
युरोपियन मधुबाजाचे वेगळेपण
- युरोपियन मधुबाजाच्या पंखाखाली काळ्या रंगाचा गडद काळ्या रंगाचा पॅच दिसतो, जो मधुबाज पक्ष्यामध्ये दिसत नाही.
- त्याच्या डोळ्याचा रंग पिवळा असतो.
- मधुबाजापेक्षा युरोपियन मधुबाजाची आकार आणि पंखाचा विस्तार मोठा असतो.
- युरोपियन मधुबाजाच्या पंखाच्या कडेला मोठा पट्टा असतो.
- शेपटीच्या शेवटाला एकच मोठा पट्टा असतो. मधुबाजामध्ये हे पट्टे संख्येने दोन ते तीन असतात.