‌‘उचल‌’ समाजकार्याची...

Total Views |
Sachin Khedkar
 
ऊसतोडणी मजुरांच्या स्थलांतराची साखळी तोडून त्यांच्या मुलांना शिक्षणाची नवी वाट निर्माण करणाऱ्या अहिल्यानगर जिल्ह्यातील सचिन खेडकर यांच्याविषयी...
 
मराठवाड्याच्या रखरखत्या उन्हात जमिनीवरची प्रत्येक भेग एखाद्या अपूर्ण स्वप्नाची कहाणीच सांगते. बीड जिल्हा आणि अहिल्यानगरमधील पाथर्डी, शेवगाव, कर्जत, जामखेड हे तालुके पर्जन्यछायेचे प्रदेश. इथला पाऊस म्हणजे अनिश्चित असाच. दिवाळीनंतर काहीच महिने गावात पाणी आणि काम असते, पण उन्हाळ्याच्या झळा वाढू लागल्या की गावच रिकामे होते. गावातील संपूर्ण कुटुंबेच उपजीविकेच्या शोधात ऊसतोडणीच्या ट्रॅक्टरवर, वीटभट्ट्यांच्या धुराकडे आणि बांधकाम सुरु असलेल्या स्थळांकडे रोजगारासाठी जातात.
 
या फिरस्ती जीवनाची सर्वाधिक किंमत कुटुंबातील लहान मुलांनाच सर्वाधिक चुकवावी लागते. शाळेची वही अर्धवट, पाठ्यपुस्तकांची पानं अधच उघडलेली अशा स्थितीतच, या मुलांचे बालपण आणि तारुण्यही हरवते. खेळाच्या वतातच त्यांना कामाची ओळख होते. परिणामी, मुलांमध्ये व्यसनाचं प्रमाण वाढतं, मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर होतो. बालविवाहाचे प्रमाण चिंताजनकरित्या वाढते. बालमातांच्या आरोग्यावर जीवघेणे परिणाम होतात. अशा परिस्थितीत या मुलांची जडणघडण भविष्यातील वीटभट्टी कामगार किंवा ऊसतोडणी कामगार अशीच म्हणूनच होते. यातून जणू दारिद्याचाच वारसा पुढच्या पिढीकडे हस्तांतरित होत राहतो. मात्र, हे सगळे वास्तव डोळसपणे पाहणाऱ्या एका तरुणाने, ही साखळी तोडाण्याचा निर्धार केला, त्यांचे नाव सचिन बाबासाहेब खेडकर होय. सचिन यांनी गावातील मुलांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देण्याचे ठरवले. अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील मुंगसवाडी या छोट्या गावामध्ये, एका ऊसतोडणी कामगाराच्या कुटुंबामध्ये सचिन यांचा जन्म झाला. स्वतःही गरिबी आणि फिरस्तीचे चक्र त्यांनी लहानपणापासून अनुभवले होतेच. पुण्यात बांधकाम क्षेत्रामध्ये मजुरी करताना, सचिन यांना आयुष्याचे जवळून दर्शन झाले. पण एक क्षण असा आला की, त्यामुळे सचिन यांनी हे सारे काही थांबवण्यासाठी कार्य करण्याचा निर्णय घेतला.
 
सचिन यांनी स्वत: मजुरीचे काम सोडले. त्यामुळे सहाजिकच उपजीविकेचा प्रश्न उभा राहिला, पण ते घाबरले नाही. त्यांनी फॅब्रिकेशनचे कौशल्य आत्मसात केले आणि गावामध्ये स्वतःचा व्यवसाय सुरू केला. यानंतरही सचिन यांच्या मनामध्ये गावातील मुलांच्या भवितव्याची चिंता होतीच. 2015 मध्ये सचिन यांनी, व्यवसायाच्या जागेलाच लागून एक छोटेसे मोफत वाचनालय सुरू केले. त्यामुळे गावातील मुलांची पाऊले या वाचनालयात येऊ लागली. जी मुले गावात दिवसभर उनाडक्या करत फिरायची, ती आता पुस्तकांमध्ये रमू लागली होती. त्यामुळे गावात पहिल्यांदाच शिक्षणाविषयी आशेचा किरण दिसू लागला. पण सामाजिक कार्यासाठी केवळ जिद्दच पुरेशी नसते; आर्थिक पाठबळही लागते. याच काळात सचिन यांची ओळख ‌‘स्नेहालय‌’ संस्थेचे संस्थापक गिरीश कुलकर्णी यांच्याशी झाली. सचिन यांचे कार्य पाहून त्यांनी, या उपक्रमाची व्याप्ती वाढवण्यासाठी सहकार्याची तयारी दर्शवली. पुढे 2018मध्ये ‌‘उचल फाऊंडेशन‌’ची अधिकृत नोंदणी झाली. ‌‘उचल‌’ हा शब्दच स्थलांतराच्या वेदनेतून जन्मलेला आहे. ऊसतोडणीला जाताना घेतल्या जाणाऱ्या रकमेला ‌’उचल‌’ म्हणतात, पण सचिन यांनी शब्दाला नवाच अर्थ दिला. ‌‘उचल‌’ म्हणजे ‌‘मुलांना उचलून अंधारातून प्रकाशाकडे नेण्याचा प्रयत्न.‌’
 
सचिन यांच्या संस्थेच्या पहिला निवासी प्रकल्प शेवगाव येथे सुरू झाला. मुंगसवाडीपासून 35 किमी अंतरावरील एका वाड्याची डागडुजी करण्यात आली. सुरुवातीला अवघी चार मुले असणारा हा प्रकल्प, आज सात वर्षांनंतर 40 विद्यार्थ्यांना निवासी शिक्षण देत आहे. इथे ऊसतोड कामगार आणि एकल पालकांच्या मुलांना सुरक्षित निवारा, शिक्षण, पोषण आणि संस्कार दिले जातात. याशिवाय दरवर्षी 100 हून अधिक अनिवासी विद्यार्थ्यांनाही शैक्षणिक मदत दिली जाते. तसेच ऊसतोड कामगार महिला आणि मुलींना विविध कारणांमुळे आरोग्य समस्यांचा सामना करावा लागतो. ‌‘उचल फाऊंडेशन‌’च्यावतीने त्यासाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात येते. आजवर एक हजाराहून अधिक महिलांची तपासणी व समुपदेशन करण्यात आले आहे. विधवा आणि परित्यक्ता महिलांनाही स्वयंरोजगारासाठ मोफत पीठगिरणी आणि शिवणमशीनचे वाटप करण्यात आले आहे.
पाथर्डी आणि शेवगावच्या डोंगराळ भागातील शाळा दूरवर आहेत. त्यामुळे अनेक मुलींना तीन-चार किमी पायपीट करावी लागते. परिणामी, सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होऊन, मुलींना शिक्षण अर्ध्यावर सोडावे लागते. अशा मुलींना ‌‘उचल फाऊंडेशन‌’च्यावतीने मोफत सायकली देऊन, शिक्षणाचा प्रवास सुलभ करण्याचे कार्य केले जाते.
 
सचिन यांच्या कार्याची दाखल घेत, त्यांना विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. मराठवाड्याच्या कोरड्या मातीत पावसाचा थेंब जसा जीवनाची चाहूल देतो, तसाच सचिन यांचा प्रयत्न या भागासाठी आशेचा पहिला थेंब ठरत आहे. सचिन यांची ‌‘उचल‌’ आज अनेक कुटुंबांना उभारी देण्याचे कार्य करत आहे. कदाचित ही त्या दिवसाची सुरुवात आहे, जेव्हा ऊसतोडणीच्या ट्रॅक्टरवर बसून जाण्याऐवजी ही मुले ज्ञानाच्या वाटेवर चालतील. हे चित्र सत्यात येईल तेव्हा, मराठवाड्यामध्ये समृद्धी येईल. रंजल्या गांगल्यांच्या परिस्थितीला आपलेले करत, त्यांचे दैन्य दूर करण्याचा प्रयत्न करणाऱ्या सचिन खेडकर यांना पुढील यशासाठी दै.‌’मुंबई तरुण भारत‌’च्या हार्दिक शुभेच्छा.
 
 

गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.