एक बाकी एकाकी...

    19-Mar-2026   
Total Views |
 Iran Conflict
 
जागतिक राजकारणाच्या इतिहासामध्ये एक साधा; पण अत्यंत महत्त्वाचा नियम कायमच दिसतो, तो म्हणजे सत्ता कधीही एकटी येत नाही, तर ती सोबत जबाबदारी घेऊन येते. या जबाबदारीचे वहन विवेकाच्या आधाराने, नेतृत्वाने करणे आवश्यक असते. हे करताना मानवी मूल्यांना महत्त्व देणेसुद्धा अपेक्षितच. शक्ती आणि संयमाचे प्रमाण व्यस्त झाले, तर अशी शक्ती विनाशकारी ठरते. त्यामुळेच एखादे राष्ट्र किती बलवान आहे, यापेक्षा ते राष्ट्र त्याच्याकडील बळाचा वापर कसा करते? यालाच आज जागतिक राजकारणात अधिक महत्त्व. आज अमेरिका अशाच काहीशा समस्येशी झुंजताना दिसत आहे.
 
पहिल्या सत्ताकाळाच्या चार वर्षांत एकही युद्ध न करणार्‍या ट्रम्प यांनी, दुसर्‍या कार्यकाळाच्या प्रारंभीपासूनच जगात सर्वत्र अशांतता कशी पसरेल याचीच काळजी घेतली आहे, असे म्हणणे अतिशयोक्ती ठरणार नाही. ट्रम्प यांच्या धोरणाचे परिणाम फक्त बाह्य जगावर होत आहेत असे नसून, अमेरिकेची जनता आणि ट्रम्प यांचे प्रशासनातील सहकारी यांच्यावरदेखील होत आहेत. आयातशुल्काच्या धोरणामुळे ट्रम्प यांचा सहकारी प्रसिद्ध उद्योगपती एलॉन मस्क यांनी त्यांच्या प्रशासनातून अंग काढून घेतले होते. आता इराण युद्ध निष्कारण आणि इस्रायलच्या दबावाखाली अमेरिकेवर लादल्याचा आरोप करत, राष्ट्रीय दहशतवादविरोधी विभागाचे सर्वेसर्वा जोसेफ केंट यांनीही राजीनामा दिला आहे. जोसेफ यांचा राजीनामा डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणांमुळे, त्यांच्या प्रशासनात वाढलेल्या उद्विग्नतेचे प्रतीक ठरावे.
 
दुसर्‍या महायुद्धानंतर अमेरिकेने स्वतःला जगासमोर लोकशाहीचे रक्षण करणारे राष्ट्र म्हणून मांडले. पण, प्रत्यक्षात तिची भूमिका ही संशयास्पदच राहिली. व्हिएतनाम युद्ध, इराक युद्ध आणि अफगाणिस्तान युद्ध या युद्धांनी संबंधित देशांना स्थैर्य देण्याऐवजी अधिकच अस्थिर केले. त्यामुळे अमेरिकेच्या भूमिकेवर अधिकच प्रश्नचिन्ह निर्माण झाले. सध्याचे इराणविरुद्धचे युद्ध याच मालिकेतील पुढचा टप्पा ठरावा. ट्रम्प यांनी सत्तेत येताना जागतिक युद्ध टाळण्याविषयी आग्रही भूमिका घेतली होती. पण, प्रत्यक्षात त्यांनीच आज संघर्षाचा मार्ग निवडला. यावर भाष्य करताना केंट यांनी त्यांच्या राजीनामा अर्जात टीका केली आहे. आजवर त्यांनी दिलेला पाठिंबा हा शांततेच्या प्रयत्नांसाठी होता. मात्र, इस्रायलच्या दबावामध्ये अमेरिकेचे नसलेले युद्ध जर ट्रम्प अमेरिकेवर लादत असतील, तर त्यांना साथ देणे शक्य नसल्याचे केंट यांचे म्हणणे.
 
वास्तविक, इराणबरोबरच्या युद्धाचा थेट परिणाम अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर होऊ लागला आहे. मध्य-पूर्वेतील तणाव वाढला की, तेलाच्या किमती वाढतात, त्याचा परिणाम महागाईवर होतो आणि सामान्य नागरिकांच्या खर्चात साहजिकच वाढ होते. त्याच वेळी युद्धासाठी लागणारा प्रचंड खर्च, लष्करी तैनाती, शस्त्रसामग्री, पुरवठा यामुळे सरकारी तिजोरीवर ताण येतो. यामुळेच युद्ध आणि आर्थिक ताण अशी दुहेरी अडचण अमेरिकेसमोर उभी आहे. यामुळेच या युद्धाविषयी अमेरिकेतील नागरिकांच्या मनामध्ये अढी असून, अनेकांचे मत या युद्धाची सध्या गरज नव्हती, असेच. केंट यांनी राजीनामा देताना, अमेरिकन नागरिकांच्या भावनांचा आवाज होण्याचा प्रयत्न केलेला दिसतो.
 
युद्धकाळात सर्वात कठीण गोष्ट म्हणजे, युद्धातून बाहेर पडणे. सध्या या प्रश्नाचे उत्तर ना अमेरिकेच्या प्रशासनाकडे आहे, ना सैन्याकडे. सुरुवातीला ज्या कारणांसाठी हे युद्ध सुरू केले गेले, ती कारणे नंतर बदलत गेल्याने आता हे युद्ध नेमके कशासाठी चालू आहे, याचे उत्तर कोणाकडेच नाही. अशा परिस्थितीत अचानक माघार घेणे कमजोरीचे लक्षण ठरेल, अशी भीती अमेरिकेला वाटते. यासाठीच अमेरिकेने ‘नाटो’ देशांकडून मदत मागितली होती. पण, युरोपातील देश पूर्णपणे अमेरिकेच्या बाजूने उभे राहतील, असे आजचे चित्र नाही. शिवाय, ट्रम्प यांच्या व्यापार धोरणांमुळे अनेक देशांशी असलेल्या संबंधांमध्ये कटुता आली. त्यामुळे या युद्धात अमेरिका आज काहीशी एकटी पडली असून, प्रशासनामध्ये ट्रम्पदेखील एकाकी पडण्याची चिन्हे आहेत. एकूणच, इराणविरुद्धचे युद्ध हे अमेरिकेसाठी फक्त बाह्य संघर्ष नाही, ते तिच्या धोरणातील चुकांचे परिणाम दाखवणारे उदाहरण आहे. आज अमेरिका अशा टप्प्यावर आहे, जिथे युद्ध सुरू ठेवणेही कठीण आहे आणि ते थांबवणेही सोपे नाही. बघू पुढे काय
होते ते...
 
- कौस्तुभ वीरकर
 
 
 

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.