परम पूजनीय डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांचे व्यक्तित्व समजून घ्यायचे असेल, तर केवळ त्यांचे चरित्र समजून घेऊन चालणार नाही; तर त्यांनी उभ्या केलेल्या कामाचा अभ्यास आणि आढावासुद्धा घ्यायला हवा, तर आणि तरच त्यांच्या व्यक्तित्वाची थोरवी लक्षात येईल. आज त्यांच्या तिथीनुसार जयंतीनिमित्त या युगपुरुषाचे हे चरित्रदर्शन...
एकदा एका काँग्रेसी नेत्याने ज्येष्ठ संघ कार्यकर्त्याला गप्पागोष्टीत सांगितले की, "तुमच्या डॉ. हेडगेवार यांच्यापेक्षा आमचे नेहरू श्रेष्ठ आहेत.” त्या संघ कार्यकर्त्याने विनम्रपणाने सांगितले की, "हो मान्य; पण ही अशी तुलना का करता? आणि कोणत्या कारणाने असे म्हणत आहात?” तेव्हा काँग्रेसी नेत्याने सांगितले की, "नेहरू हे स्वातंत्र्यानंतर बराच कालावधी पंतप्रधान होते. त्यामुळे भारतात तर लोकांना ते माहिती आहेतच. परंतु, परदेशातही नेहरू सर्वांना माहिती आहेत. तुमच्या डॉ. हेडगेवार यांना परदेशातच काय, तर भारतातही फारजण ओळखत नाहीत!” संघाच्या कार्यकर्त्यांनी म्हटले की, "हो एकदम मान्य. पण, मी विचारलेल्या एका प्रश्नाचे उत्तर देऊ शकाल का? आज नेहरूजींच्या नावासाठी कितीजण आपले आयुष्य समर्पित करण्यास तयार आहेत? आपले सर्वस्व अर्पण करायला तयार आहेत?” त्या काँग्रेसी नेत्याजवळ या प्रश्नाचे उत्तर नव्हते. त्यांनी विचार करून सांगितले की, "कदाचित कुणीच नाही.” संघाच्या अधिकार्यांनी सांगितले की, "डॉ. हेडगेवार, ज्यांना समाजात फार लोक ओळखत नाहीत, त्यांच्या कार्यासाठी आज हजारो तरुण जीवन समर्पित करत आहेत. संघ कुणाशी तुलना करत नाही, तर आपल्या देशाला परमवैभवाला नेण्यासाठी सर्वांच्या सहकार्याने पुढे वाटचाल करत आहे.” डॉ. हेडगेवार यांच्या व्यक्तित्वाबद्दल हे उदाहरण फारच बोलके आहे... बरोबर ना?
आज अशा पूजनीय डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांचा जन्मदिवस. विलक्षण आयुष्य जगलेला एक द्रष्टा पुरुष. डॉक्टरी परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर स्वतःचा संसार न थाटता, समाजाचे आणि देशाचे कार्य यालाच प्राथमिकता देऊन, समाजाच्या आरोग्याचा इलाज करण्याचे महत्त्वाचे काम करणारा हा डॉक्टर अवलिया! प्रत्येकाने अभ्यासावे असे त्यांचे चरित्र. अतिशय हलाखीच्या परिस्थितीत गेलेले बालपण, त्यातही लहानपणापासूनच देशभक्तीचा अंगार रोमारोमांत भिनलेला. ‘वन्दे मातरम्’चा जयघोष केल्यामुळे शाळा सोडावी लागली आणि नंतर त्यावेळच्या राष्ट्रीय प्रशाळेतून शिक्षण, त्यातूनच त्यावेळच्या दिग्गज नेत्यांशी आणि क्रांतिकारकांशी घनिष्ठ संबंध, त्यातूनच कलकत्ता येथे वैद्यकीय शिक्षण, क्रांतिकार्यात प्रत्यक्ष सहभाग, बंगालमधील पूरपरिस्थितीत सेवाकार्यात सहभाग. नागपुरात परत आल्यावर क्रांतिकार्याची सुरुवात केली. पण, नंतर काळजीपूर्वक सर्व काम आवरती घेतली.
क्रांतिकार्याचा आणि त्याच्या मर्यादांचा अनुभव घेतल्यामुळे ‘संघटित जनआंदोलना’चा मार्ग स्वीकारला आणि लोकमान्य टिळकांच्या प्रेरणेने काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेसमध्ये निरनिराळ्या जबाबदार्या पार पाडल्या. त्याचवेळी काँग्रेसी नेत्यांच्या तोंडदेखल्या राष्ट्रभक्तीचा, राजकीय गटबाजीचा अनुभवही त्यांनी घेतला. डिसेंबर १९२० नागपूर काँग्रेस अधिवेशनाच्या ‘स्वयंसेवक समिती’ची जबाबदारी त्यांनी यशस्वीपणे सांभाळली, त्याच्या एकूणच आयोजनात महत्त्वाचा सहभाग होता. त्यात ‘संपूर्ण स्वराज्य’ हा ठराव व्हावा, यासाठी प्रयत्न केले. परंतु, तत्कालीन दिग्गज काँग्रेसी नेत्यांनी ते प्रयत्न हाणून पाडले. एवढेच नाही तर डॉक्टरांवर नागपूर प्रांताची काँग्रेसची जबाबदारी होती आणि ते अनेक आंदोलनांत सहभागी झाले आणि त्यासाठी कारावाससुद्धा भोगावा लागला. ‘असहकार आंदोलन’, ज्याला ‘खिलाफत आंदोलना’चीसुद्धा पार्श्वभूमी होती, त्यातही सक्रिय सहभाग घेतला. त्यातील भाषणासाठी खटला भरला गेला आणि तुरुंगवासही झाला. त्यावेळी तुरुंगात इमानुल्ला या ‘खिलाफत’ कार्यकर्त्याकडून विपरीत अनुभव आले.वास्तविक, त्यावेळी ‘खिलाफत’ आंदोलनाला त्यांचा तत्त्वतः विरोध होता. महात्मा गांधींसोबत त्यांनी याबाबत चर्चाही केल्याचे उल्लेख आहेत. तरीही, काँग्रेसच्या नेत्यांनी ‘खिलाफत’ आंदोलन स्वीकारले म्हणून त्यांनी आंदोलनात सहभाग घेतला होता. यात आलेले विपरीत अनुभवही त्यांच्या विचार-प्रक्रियेला चालना देणारे ठरले. संघस्थापनेनंतरसुद्धा ‘जंगल सत्याग्रहा’त डॉक्टर हेडगेवार यांचा सहभाग होता. एका तुकडीचे नेतृत्व त्यांनी केले होते. त्यात त्यांना कारावासही झाला. शिवाय, अनेक स्वयंसेवकांनीसुद्धा यात सहभाग घेतला होता. संघ स्वातंत्र्य आंदोलनात कुठे होता, असे विचारणार्यांनी डॉक्टरांच्या चरित्राचा अभ्यास करणे आवश्यक आहे.
डॉक्टरांनी स्वातंत्र्यासाठी सर्वप्रकारच्या मार्गांचा अवलंब केला होता आणि त्याच्या अनुभवातून आणि इतिहासाच्या अभ्यासातून एक बाब स्पष्ट झाली की, जोपर्यंत या देशाची मुख्य धारा असलेला हिंदू समाज संघटित होत नाही, त्यांच्यामध्ये राष्ट्रीय वृत्ती जागृत होत नाही, आपल्या संस्कृतीविषयी अभिमान जागृत होत नाही, तोपर्यंत स्वातंत्र्य मिळूनही ते चिरस्थायी स्वरूपात टिकणार नाही... आणि म्हणून हिंदू संघटन, राष्ट्रीय विचारांचे जागरण हे आवश्यक... आणि त्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली. यासाठी डॉ. हेडगेवार यांनी आपला धर्म, संस्कृती, परंपरा, जीवनमूल्ये, श्रेष्ठ विचार जगून दाखविणारी कार्यपद्धती शोधून काढली, ती म्हणजे संघशाखांची कार्यपद्धती. एक तासाची शाखा! अर्थात, ही साचेबद्ध नाही; तर सतत विकसित होणारी पद्धती आहे. या पद्धतीचे एकच काम, ते म्हणजे संस्कार आणि व्यक्तिनिर्माण! अनुशासन, बंधुभाव, समरसता, स्वावलंबन, सेवाभाव, राष्ट्र प्रथम हे आणि असे संस्कार कळत-नकळत संघशाखेत होतात. असे हे आगळेवेगळे काम डॉक्टरांनी आरंभले. सुरुवातीला पोरखेळ म्हणून हिणवले गेले, चेष्टा आणि थट्टा... मात्र, आता संघाच्या कामाचा प्रवास, दुर्लक्ष ते विरोध ते समर्थन इथपर्यंत येऊन पोहोचला आहे. १९२५ साली डॉ. हेडगेवार यांनी संघाची स्थापना नागपूर येथे केली. त्या कामाच्या आजच्या स्वरूपाचा आवाका लक्षात घ्यायला हवा. नुकतीच संघाची अखिल भारतीय प्रतिनिधी सभेची बैठक झाली. त्यातील कामाच्या अहवालाची आकडेवारी खालीलप्रमाणे आहे : ५५ हजार, ६८३ स्थानी ८८ हजार, ९४९ दैनंदिन शाखा; ३२ हजार, ६०६ ठिकाणी साप्ताहिक मिलन, आणि १३ हजार, २११ ठिकाणी संघ मंडळी. मागील विजयादशमीला ६२ हजार, ५५५ स्थानी संघाचे उत्सव झाले आणि त्यात ३३ लाख, ४५ हजार, १४१ स्वयंसेवक सहभागी झाले होते. संघाच्या १०० वर्षांच्या अथक वाटचालीत गाठलेला हा टप्पा!
डॉ. हेडगेवार असे म्हणत असत की, "संघ ही कृत्रिम व्यवस्था आहे. समाज आणि संघ असे द्वैत ठेवायचे नसून, संघ लवकरात लवकर समाजात विलीन झाला पाहिजे. आपले हिंदुराष्ट्र आहे, आपण या हिंदुराष्ट्राचे अंग आहोत. हे अंग विघटनामुळे दुर्बल झाले आहे. ते सशक्त करून राष्ट्राला परम-वैभवाकडे घेऊन जायचे आहे. संघ समाजातील एक संघटन नाही, तर समाजाचे संघटन करण्यासाठीचे काम आहे,” हा डॉक्टरांचा मूलभूत विचार. या महापुरुषाच्या व्यक्तित्वाची खरी ओळख म्हणजे, आज त्यांच्या पश्चात झालेले सर्व सरसंघचालक हे त्याच मार्गावरून वाटचाल करीत आहेत. १९२५ साली सुरू झालेले हे संघाचे काम आज एका वटवृक्षात रूपांतरित झाल्याचे आपण पाहतो. आज समाजाचे असे एकही अंग नाही की, जिथे संघाचा विचार पोहोचलेला नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कामाच्या व्याप्तीने आज जगड्व्याळ स्वरूप धारण केले आहे. केवळ भारतच नव्हे, तर जगभरात संघाचा विचार आणि काम पोहोचले आहे. देशाला बळकटी येण्यासाठी समाजाच्या आणि देशाच्या प्रत्येक क्षेत्रात राष्ट्रीय दृष्टिकोन याला महत्त्व प्राप्त करून देण्यात संघ यशस्वी होत आहे. आज सर्व क्षेत्रांत ‘राष्ट्र प्रथम’ या मानसिकतेत काम सुरू आहे.
या महापुरुषाच्या यशाचे मोजमाप करायचे, तर एक बाब समजून घ्यायला लागेल, एकच निकष पुरेसा आहे, आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सर्वदूर माहीत आहे, अगदी परदेशातही. परंतु, याचे संस्थापक कोण, याबाबत अनभिज्ञता जाणवते. आपण मोठे न होता, आपण सुरू केलेले काम मोठे होणे; नव्हे, तसे जाणीवपूर्वक करणे खरेच महाकठीण! खरे कर्तृत्व यातच आहे. संघाच्या प्रार्थनेत एक पंक्ती आहे, जे संघाचे ध्येय म्हणता येईल... ‘परं वैभवं नेतुमेतत् स्वराष्ट्रम.’ या देशाला परम-वैभवाप्रत नेणे आणि त्यासाठी जे जे आवश्यक ते ते सर्व करणे! त्यांनी स्वतःच्या वर्तणुकीतून याचा आदर्श घालून दिला आणि त्या आदर्शाबरहुकूम चालणारे हजारो नव्हे, करोडो अनुयायी नव्हे, तर डोळसपणे काम करणारे कार्यकर्ते आज उभे राहिले आहेत. डॉ. हेडगेवार यांनी संघाची स्थापना झाल्यापासून स्वतःचे अस्तित्व केवळ संघकाम आणि देश यांना समर्पित केले. ‘रक्ताचे पाणी करणे’ हा वाक्प्रचार आपण नेहमी ऐकतो. पण, डॉक्टरांबाबत हे प्रत्यक्ष घडले आहे. अंतसमयी त्यांच्या पाठीचे लंबर पंचर केले असता, अक्षरशः पाण्याची धार लागली होती.
१९२५ ते १९४० या उण्यापुर्या १५ वर्षांत संपूर्ण देशभरात संघाचे काम घेऊन जाण्याचा भगीरथ प्रयत्न केला आणि या महापुरुषाच्या कामाचे मूल्यमापन करायचे; तर असे म्हणता येईल की, संघाने आज १०० वर्षांची वाटचाल पूर्ण केली आहे आणि आजही पूजनीय डॉक्टरांना अभिप्रेत असलेल्या विचारांवरच संघ वाटचाल करत आहे. सोमवार, दि. १ एप्रिल १८८९, चैत्र शुद्ध प्रतिपदा या दिवशी केशव बळीराम हेडगेवार यांचा जन्मदिवस. आठवड्याचा पहिला दिवस, हिंदू नववर्षाचा पहिला दिवस, आर्थिक वर्षाचा आणि महिन्याचाही पाहिला दिवस. म्हणजेच, या युगपुरुषाचा तिथीने आज जन्मदिन. भारतमातेला पुन्हा विश्वगुरुपदी विराजमान करण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी झटणारी अभेद्य संघटना निर्माण करणारा हा युगपुरुष. त्यातही विचारांची उत्तुंगता म्हणजे... संघ हा समाजात मिसळून जावा... संघाची आवश्यकताच भासू नये, ही कामाची दिशा असावी आणि संघ लवकरात लवकर विसर्जित व्हावा, अशी कामना करणारा हा महापुरुष. कदाचित, हे विचार, त्यामागची तळमळ आज काहीजणांना समजणार नाही. पण, अशी स्पष्ट धारणा पुढील पिढ्यांतही संक्रमित करणारा हा महापुरुष!
पूजनीय डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांच्या पवित्र स्मृतीस त्रिवार अभिवादन!
- अरविंद जोशी