North Korea Elections : मतदान न करणारे ०.०७ टक्के नागरिक कोण? उत्तर कोरियाचा राष्ट्राध्यक्ष किम जोंग उन घेणार शोध?

    19-Mar-2026   
Total Views |
North Korea Elections

मुंबई : (North Korea Elections) उत्तर कोरियामध्ये संसदीय निवडणुका पार पडल्या. किम जोंग उन यांच्या वर्कर्स पार्टी ऑफ कोरिया आणि त्यांच्या मित्रपक्षांनी ६८७ म्हणजेच सर्व जागांवर आघाडी घेत ही निवडणूक जिंकली आहे. उत्तर कोरियाच्या सरकारी माध्यमांनुसार, १५ मार्च रोजी झालेल्या मतदानात एकूण ९९.९९ टक्के मतदारांनी भाग घेतला. ९९.९३ टक्के मतदारांनी नामांकित उमेदवारांना पाठिंबा दिला. केवळ ०.०७ टक्के मतदारांनी विरोधात मतदान केले. या सगळ्या घडामोडीनंतर आता हा प्रश्न उपस्थित होत आहे की, हे ०.०७ टक्के मतदार नेमके कोण आहेत, ज्यांनी किम जोंग उन यांच्याविरोधात मतं देण्याचे धाडस केले. याच मुद्द्यावरुन सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. (North Korea Elections)

उत्तर कोरियात निवडणुका कशा होतात?

सगळ्यात आधी उत्तर कोरियातील निवडणूक प्रक्रिया कशी असते हे जाणून घेणे आवश्यक आहे. उत्तर कोरियामध्ये बॅलेट पेपरवर मतदान घेतले जाते. जर एखाद्या मतदाराला उमेदवाराच्या विरोधात मतदान करायचे असेल, तर ते त्याला सार्वजनिकपणे करावे लागते. उत्तर कोरियातील प्रत्येक जागेवर फक्त एकच उमेदवार निवडणूक लढवतो. मतदार त्या उमेदवाराच्या पक्षाच्या बाजूने किंवा विरोधात मत देऊ शकतात. मात्र, विरोधात मतदान करायचे असल्यास ते सर्वांच्या समोर उभे राहून करावे लागते, म्हणजेच विरोध गुप्त राहात नाही. (North Korea Elections)

अशा परिस्थितीत, तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, अशा प्रकारच्या निवडणुकीत लोकांसाठी खरे पर्याय अस्तित्वातच नसतात, आणि बहुतेक नागरिक केवळ औपचारिकता म्हणून मतदान करतात. सरकारच्या आकडेवारीनुसार, नोंदणीकृत मतदारांपैकी ९९.९९% लोकांनी मतदान केले. फक्त ०.००३७% लोक परदेशात असणे किंवा समुद्रात कामावर असल्यामुळे मतदान करू शकले नाहीत, तर ०.००००३% लोकांनी मतदान करण्यास नकार दिला. मतदान करणाऱ्यांपैकी ९९.९३% लोकांनी उमेदवारांना समर्थन दिले, तर ०.०७% लोकांनी विरोधात मत नोंदवले. (North Korea Elections)

मतदान न करणे हा राजद्रोहाचा गुन्हा

उत्तर कोरियात विरोधी पक्षाला काहीच महत्त्व नसते. सुप्रीम पिपल्स असेंबली या सर्वोच्च सभागृहातच उत्तर कोरियात कायदे, नियम केले जातात. हुकूमशाहा किम जोंग उन हेच तिथे अशा प्रकारचे निर्णय घेतात. उत्तर कोरियात १७ वर्षावरील व्यक्तीला मतदानाचा अधिकार आहे. तिथे मतदान न करणे हा राजद्रोहाचा गुन्हा मानला जातो. तिथे सर्वच नागरिकांना मतदान करणे अनिवार्य आहे. इतकेच नाही तर चीन आणि रशियामध्ये राहणाऱ्या उत्तर कोरियन नागरिकांनाही आपल्या मायदेशी येऊन किंवा तिथूनच मतदानाचा हक्क बजावावा लागतो. ९९.१% मतदानाची आकडेवारी ही केवळ जनतेचे प्रेम नसून ती हुकूमशहाची भीती असल्याचे पाश्चात्य तज्ज्ञांचे मत आहे. (North Korea Elections)
 
किम यांच्या विरोधात मतदान करणारे कोण?

उत्तर कोरियाच्या निवडणूक प्रणालीमध्ये फक्त स्थानिक उमेदवाराचा विरोध करता येतो. अशा परिस्थितीत जे ०.०७ टक्के विरोधी मतं आहेत, ती स्थानिक उमेदवारांविरुद्ध पडलेली मते आहेत, तीही सर्व ६८७ जागांवर. सरासरी पाहता, प्रत्येक जागेवर सुमारे २६ मतं विरोधात टाकली गेली. हा विरोध किम जोंग उन यांच्या स्वतःच्या विरोधात नाही, कारण किम स्वतः या निवडणुका लढवत नाहीत. मात्र त्यांच्या पक्षाच्या उमेदवारांविरुद्ध ही मते टाकली गेली आहेत. (North Korea Elections)

तज्ज्ञांच्या मते, किम जोंग उन यांनी विरोधाची व्यवस्था लागू करण्यामागचे खरे उद्दिष्ट म्हणजे स्थानिक स्तरावरची नाराजी कमी करणे आहे. अशा प्रकारे निवडणुका घेतल्याने नागरिक छोट्या-मोठ्या स्थानिक समस्यांसाठी थेट किम यांना जबाबदार धरत नाहीत; त्याऐवजी ते नाराजी स्थानिक उमेदवाराच्या विरोधातील मताद्वारे व्यक्त करतात. यातून किम यांची प्रतिमा अबाधित राहते आणि समस्यांची जबाबदारी स्थानिक प्रतिनिधींवर जाते. शिवाय, एखाद्या उमेदवाराविरुद्ध योग्य, ठोस आणि वाजवी विरोध आढळल्यास किम त्या उमेदवारावर कारवाई करण्यासही मागेपुढे पाहत नाहीत. (North Korea Elections)

अनिशा डुंबरे

मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\