गुढीपाडवा सांस्कृतिक ओळखीचा उत्सव...

    19-Mar-2026
Total Views |
Gudi Padwa
 
आज गुढीपाडवा अर्थात चैत्र शुद्ध प्रतिपदा! हिंदू नववर्षाचा शुभारंभ... या दिवशी उभारण्यात येणार्‍या गुढीमागे असंख्य कारणे आहेत. ही कारणे काळाच्या ओघामध्ये त्या त्या दिवसाचे विशेष ठरत गेली. काळ हा प्रवाही आहे, त्यामु़ळे काळाबरोबर स्थित्यंतरेही घडतात. या प्रवाहामध्ये पिढीमध्येही बदल होतात. त्यामुळे त्यांनाही या सणांचे महत्त्व समजले पाहिजे. यासाठीच गुढीपाडवा हा सण, त्याचे स्वरुप, त्याचे महत्त्व या सगळ्याचा घेतलेला मागोवा...
 
आपला भारत देश परंपराप्रिय असल्याने, आपल्या पूर्वजांनी घालून दिलेल्या परंपरा आपण आजतागायत अतिशय उत्तमरित्या पाळत आलो आहेत. आपले सण, उत्सव, जयंती, पुण्यतिथी इत्यादी सगळेच परंपरेने चालत आलेले असते. त्यांचा आदर्श पुढील पिढ्या आत्मसात करून, त्यानुसार आचरण करून पुढे तो वारसा चालवावा, हा त्यामागे आपल्या पूर्वजांचा प्रधान हेतू आहे. ही गोष्ट कोणत्या एका विशिष्ट धर्म, पंथ, जात वगैरेंसाठी सीमित नसून, समस्त मानव जातीसाठी आहे. संतांनी ही गोष्ट आपल्या स्वतःच्या आचरणातूनही सिद्ध करून दाखवली आहे. साहजिकच थोर पुरुषांचे कर्तृत्व, निष्ठा, पराक्रम, आदर्श शिकवण इत्यादी गोष्टी पुढील पिढ्यांकडे हस्तांतरित कराव्यात, हा त्यामागील हेतू आहे.
 
काळ हा थांबत नाही, तो सतत पुढे सरकत राहतो. त्याच्या प्रवाहात माणसाची जीवनपद्धती बदलते, विचारधारा बदलतात, मूल्यांची मांडणी बदलते. मात्र, या अखंड बदलांच्या प्रवासात काही परंपरा अशा असतात की, त्या काळाच्या ओघातही टिकून राहतात. कारण त्या केवळ रूढी नसतात, तर त्या जीवनाशी नाते सांगणार्‍या संस्कारांची अभिव्यक्ती असतात. गुढीपाडवा हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनातील असाच एक महत्त्वपूर्ण सण. तो केवळ नववर्षाचा प्रारंभ दर्शवत नाही, तर माणूस, निसर्ग आणि समाज यांच्यातील नात्याची आठवणही करून देतो.
 
गुढीपाडव्याच्या सांस्कृतिक परंपरेचे पाच महत्त्वाचे संदर्भ आहेत. पहिला संदर्भ म्हणजे ब्रह्मदेवाने या दिवशी विश्वाची निर्मिती केली, असे सांगितले जाते. पृथ्वीवरील कालगणतीची सुरुवात या दिवशी झाली, असे भारतीय परंपरेत मानले आहे. दुसरे महत्त्व असे की, मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीरामचंद्र आपला १४ वर्षांचा वनवास संपवून आणि लंकाधिपती रावणाचा पराभव करून, याच दिवशी अयोध्येला परत आले. त्यांच्या स्वागतासाठी अयोध्यानगरीत सर्वत्र गुढ्या उभारण्यात आल्या. तिसरा संदर्भ म्हणजे, शालिवाहन या सातवाहनांच्या प्रमुख सम्राटाने, शकांचा पराभव करण्यासाठी सहा हजार मातीच्या सैनिकांचे पुतळे तयार केले आणि त्यांची प्राणप्रतिष्ठा करून त्यांना संजीवन करून त्यांच्या सामर्थ्याच्या साहाय्याने या दिवशी त्याने शक आक्रमकांचा पराभव केला, अशी आख्यायिका आहे.
 
गुढीपाडवा म्हणजे चैत्र महिन्याच्या शुद्ध प्रतिपदेचा दिवस; म्हणजे नव्या वर्षाची पहाट. या दिवशी पहाटेला केवळ दिनदर्शिकेचे पानच बदलत नाही, तर माणसाच्या मनात नव्या आशा, नव्या अपेक्षा आणि नव्या संकल्पांची बीजे रोवली जातात. पूर्वीच्या काळी, जेव्हा जीवनाचा वेग संथ होता, निसर्गाशी नाते अधिक जवळचे होते, तेव्हा गुढीपाडवा हा सण जीवनाच्या लयीत सहज मिसळलेला होता. आज मात्र या सणाकडे पाहण्याची दृष्टी बदलत चालली आहे. बदलत्या संस्कृतीत आणि आधुनिक पिढीच्या विश्वात गुढीपाडव्याचे स्थान काय? हा प्रश्न गांभीर्याने विचारात घ्यावा लागतो. गुढी उभारण्याची परंपरा ही विजय, समृद्धी आणि शुभारंभाचे प्रतीक मानली जाते. घराच्या दाराशी उभारलेली गुढी म्हणजे, जणू आयुष्यात येणार्‍या अडचणींवर मात करण्याची, सकारात्मकतेला आमंत्रण देण्याची आणि नव्या वर्षात भरभराटीची कामना करण्याची प्रतिकात्मक कृती. काठीवर बांधलेले रेशमी वस्त्र, उलटा ठेवलेला तांब्याचा कलश, आंब्याची पाने, कडूलिंबाची डहाळी हे सर्व घटक केवळ सजावटीसाठी नाहीत, तर त्यामागे आरोग्य, निसर्ग आणि जीवनदृष्टीचा सूक्ष्म विचार दडलेला आहे. कडूलिंबाची कडू चव आणि साखर-गुळाचा गोडवा एकत्र करून चाखणे, म्हणजे आयुष्यातील सुख-दुःख समभावाने स्वीकारण्याची शिकवण.
 
परंतु, काळ जसजसा पुढे गेला, तसतसे या प्रतीकांचा अर्थ अनेकांसाठी धूसर होत गेला. आधुनिक जीवनशैलीत वेळेचा अभाव, स्पर्धेचे दडपण आणि भौतिक यशाचे आकर्षण वाढले. सण साजरे होतात, पण त्यामागील भावार्थ हरवत चालल्याची जाणीव अनेकदा होते. गुढीपाडवा हा अनेकांसाठी आता एक औपचारिक दिवस ठरतो; कामाला सुटी असलेला, शुभेच्छांचे संदेश मोबाईलवरून पाठवण्याचा आणि समाजमाध्यमांवर फोटो टाकण्याचा. परंपरेचा आत्मा जपण्याऐवजी, तिचे केवळ बाह्य रूपच आज मागे उरताना दिसत आहे.
 
यात दोष केवळ आधुनिक पिढीचाच आहे, असे म्हणणे सोपे असले तरी ते पूर्ण सत्य नाही. आजची पिढी प्रश्न विचारते, कारण तिला अर्थ हवा असतो. हे का करायचे? हा प्रश्न परंपरेला नाकारण्याचा नसून, तिला समजून घेण्याचा प्रयत्न आहे. परंतु जेव्हा उत्तर देण्याची जबाबदारी असलेली पिढी परंपरेचा अर्थ सांगण्यात कमी पडते, तेव्हा दुरावा निर्माण होतो. गुढीपाडव्याचे महत्त्व जर केवळ ‘आपण नेहमी असेच करतो,’ या कारणावर आधारित असेल, तर ते आधुनिक पिढीला पटणे, नक्कीच कठीण आहे. परंपरा जपायची असेल, तर तिचा आशय समजावून सांगावा लागतो.
 
बदलती संस्कृती ही परंपरेची शत्रू नसते, तर ती तिची पुढची पायरी असते. परंपरा जर काळानुसार बदल स्वीकारू शकली नाही, तर ती संग्रहालयात ठेवण्यासारखी वस्तू ठरते. गुढीपाडव्याचे मूलतत्त्व नव्या सुरुवातीचा उत्सव, निसर्गाशी सुसंवाद, सकारात्मक मानसिकता हे आजच्या काळातही तितकेच उपयुक्त आहे. उलट, तणाव, नैराश्य आणि अस्थिरतेच्या युगात अशा सणांची गरज अधिक आहे. प्रश्न आहे, तो या तत्त्वांना आधुनिक भाषेत कसे मांडायचे, याचा. आजच्या बाजारपेठी युगात आणि त्यातूनही डिजिटल युगात सणांचे स्वरूपही बदलले आहे. गुढीपाडवा म्हणजे सवलती, जाहिराती आणि खरेदीचा हंगाम असाच अर्थ अनेकदा घेतला जात आहे. सणांचा उत्साह टिकवण्यासाठी बाजारपेठेची भूमिका नाकारता येणार नाही; पण सण जर केवळ उपभोगाचा उत्सव ठरला, तर त्याची सांस्कृतिक ओळख धोक्यात येते. पूर्वी साधेपणा हा सणांचा गाभा होता. आज मात्र दिखावा, भपकेबाजी आणि कृत्रिमतेने तो गाभा झाकोळला जातो आहे.
 
पर्यावरणीय दृष्टिकोनातून पाहिले, तर गुढीपाडवा हा अत्यंत सुसंगत सण आहे. नैसर्गिक घटकांचा वापर, ऋतुबदलाचे स्वागत आणि आरोग्याची काळजी, हे सारे या सणात अंतर्भूत आहे. आज, जेव्हा पर्यावरणीय संकटे डोळ्यांसमोर उभी आहेत, तेव्हा अशा परंपरांचे नव्याने आकलन करणे, आवश्यक आहे. आधुनिक पिढी पर्यावरणाबाबत जागरूक आहे, जर गुढीपाडव्याचा संदेश पर्यावरणपूरक जीवनशैलीशी जोडून मांडला गेला, तर तो आजच्या आधुनिक पिढीला अधिक जवळचा वाटू शकतो. खरे तर, गुढीपाडवा हा भूतकाळाची ओझी वाहणारा सण नाही, तर भविष्याकडे आशेने पाहण्याची प्रेरणा देणारा उत्सव आहे. तो माणसाला थांबून विचार करायला लावतो, आपण कुठे आहोत, कुठे जायचे आहे आणि त्या प्रवासात आपली मूल्ये कोणती आहेत. बदलती संस्कृती आणि आधुनिक पिढी या परंपरेच्या विरोधात उभ्या नसून, त्या परंपरेला नव्या अर्थाने पुढे नेण्याची संधी आहेत.
गुढी उभारणे म्हणजे केवळ दाराशी नुसते एक प्रतीक उभे करणे नव्हे, तर मनात सकारात्मकतेची, आत्मभानाची आणि सांस्कृतिक ओळखीची गुढी उभारणे होय. जर ही गुढी मनात उभी राहिली, तर काळ कितीही बदलला, तरी गुढीपाडव्याचे महात्म्य अबाधित राहील. आणि तेव्हाच, हा सण केवळ साजरा केला जाणार नाही, तर जगला जाईल! पिढ्यान्पिढ्या... नव्या अर्थाने... नव्या प्रकाशात...
 
 
- श्रीपाद टेंबे