मुंबई : (Gudi Padwa 2026) मुंबईची सांस्कृतिक ओळख आपल्या समाजजीवनातून जपणाऱ्या गिरगाव भागात, दरवर्षी गुढी पाडवा अत्यंत उत्साहात साजरा केला जातो. यावर्षी सुद्धा नववर्षानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या शोभायात्रेला युवशक्तीचा उदंड प्रतिसाद लाभला. वंदे मातरम् या गीत रचनेच्या १५० व्या वर्षानिमित्त यावर्षी 'वंद्य वंदे मातरम्' हा विचार केंद्रस्थानी गुढी पाडव्याच्या शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. त्याचबरोबर प्रजासत्तक दिनानिमित्त कर्तव्यपथावर अव्वल ठरलेला महाराष्ट्राचा चित्ररथ यावेळी गिरगावच्या रसत्यावर अवतरला होता. यंदाच्या वर्षी प्रजासत्तक दिनानिमित्त गणेशोत्सव - आत्मनिर्भरतेचे प्रतिक हा महाराष्ट्राचा चित्ररथ सर्वोत्कृष्ट चित्ररथ ठरला. महाराष्ट्राच्या चित्ररथात गणेशोत्सवातील आधुनिकता आणि परंपरेने दर्शन घडले व याद्वारे आत्मनिर्भरतेचाही संदेश देण्यात आला.
गिरगाव आणि गुढी पाडव्याची शोभायात्रा हे समीकरण खूप जुने आहे. मात्र, काळाच्या ओघात वेगनेगळ्या संकल्पनांच्या माध्यामातून इथला उत्सव आकार घेत असतो. यावर्षी आयोजित करण्यात आलेल्या गुढी पाडव्याच्या शोभायात्रेमध्ये मराठीतील सिनेकलाकारांनी, रंगकर्मींनी हजेरी लावली. अनेक युट्युब इनफल्युनसर्स, हा सगळा उत्सव आपल्या कॅमेऱ्यातून, मोबाईल फोनमधून टिपत होते. गिरगावमधील ढोल ताशा पथक म्हणजे मुंबईची सांस्कृतिक ओळख. चित्ररथांसोबत या ढोल ताशा पथकांचा सुद्धा संयोग जुळून आला.
मुंबईमधील पहिला पथक अर्थात 'गिरगाव ध्वजपथक', आवाज गिरगावंचा अशी ओळख असलेला 'गजर' पथक, नामांकित असा 'मोरया' पथक, सांताक्रुझची ओळख असलेला 'साईस्वर' पथक, घाटकोपर मधील पहिलं पथक 'साम्राज्य' पथक अशा अनेक वेगवेगळ्या गटांमध्ये उत्साह संचारला होता. त्याचबरोबर या वर्षीच्या शोभायात्रेतील चित्ररथांमध्ये विविधता बघायाला मिळाली. राष्ट्र प्रथम हा विचार सांगणारे चित्ररथ या वेळी बघायाला मिळाले. त्याचबरोबर, पर्यावरण रक्षणाचा संदेश देणाऱ्या पथकांनी आपल्या आकर्षाक देखाव्यातून लोकांचे लक्ष्य वेधून घेतले. मल्लखांब खेळणाऱ्या मुलांच्या चित्ररथाने देखील लोकांना स्तिमित केले.पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तात शोभायात्रा सुरळीत पार पडली.
भरजरी नऊवारी साड्या, नाकात नथ, डोक्यावर फेटा आणि डोळ्यांवर स्टायलिश गॉगल्स लावून बुलेट चालवणाऱ्या या रणरागिणींनी परंपरेला आधुनिकतेची जोड दिली. या रॅलीमध्ये १८ वर्षांच्या तरुणींपासून ते ६० वर्षांच्या आजींपर्यंत सर्वच वयोगटातील महिलांचा सहभाग होता.