अदृश्य धाग्यांचे वैश्विक जाळे

    18-Mar-2026   
Total Views |
USCIRF Report
 
एकीकडे महाराष्ट्रात ‘धर्मस्वातंत्र्य’ विधेयक मंजूर झाले असताना, दुसरीकडे अमेरिकेच्या धार्मिक स्वातंत्र्य आयोगाच्या अहवालाने पुन्हा एकदा भारतात अल्पसंख्यांकांवरील अन्यायावरुन बांग ठोकली. एवढेच नव्हे तर रा. स्व. संघ आणि भारताची गुप्तचर संस्था ’रॉ’वर निर्बंध लादण्याचा सल्लाही ट्रम्प सरकारला दिला. पण, याच अमेरिकेकडून छुप्या पद्धतीने ख्रिस्तीकरणाचे जे षड्यंत्र राबविले जाते, त्याविषयी तितकीशी चर्चा होताना दिसत नाही. मागेही शेख हसीना यांनी अमेरिकेचे नाव न घेता, ख्रिस्तीकरणाच्या या छुप्या षड्यंत्राचा भांडाफोड केला होताच. त्यानिमित्ताने जगातील वाढत्या ख्रिस्तीकरणाचा आढावा घेणे क्रमप्राप्त ठरावे.
धर्म, सत्ता आणि अर्थकारण यांचा परस्परसंबंध हा जगाच्या इतिहासात नेहमीच महत्त्वाचा राहिलेला दिसतो. मात्र, आजच्या जागतिक घडामोडींच्या पार्श्वभूमीवर या संबंधाला नव्याने अधोरेखित महत्त्व प्राप्त झाले आहे. पश्चिम आशियातील संघर्ष, आफ्रिकेतील राजकीय अस्थिरता, तसेच जागतिक स्तरावरील ‘सॉफ्ट पॉवर’ची स्पर्धा या सर्व घटनांमध्ये ‘धर्म’ हा केवळ श्रद्धेचा विषय न राहता, भू-राजकारणाचा एक प्रभावी घटक ठरलेला दिसतो. अनेक इतिहासकारांच्या मते, ख्रिश्चन धर्माचा जागतिक विस्तार हा केवळ धार्मिक प्रसारापुरता मर्यादित नव्हता, तर त्यामागे सामाजिक, राजकीय आणि आर्थिक घटकही कार्यरत होते. विशेषतः आशिया, आफ्रिका आणि अमेरिकेतील अनेक समाजांमध्ये मिशनरी चळवळींमुळे सामाजिक आणि सांस्कृतिक बदल घडून आले. गेल्या दोन हजार वर्षांत विविध ख्रिश्चन मिशनरी संस्थांनी शिक्षण, आरोग्यसेवा आणि समाजकार्याच्या माध्यमातून अनेक देशांत आपले कार्य विस्तारले. शाळा, रुग्णालये आणि सेवा प्रकल्पांच्या माध्यमातून स्थानिक समाजांमध्ये त्यांचा प्रभाव निर्माण झाला. आधुनिक काळात हा प्रभाव अधिक सूक्ष्म पद्धतीने ‘सॉफ्ट पॉवर’च्या माध्यमातून दिसून येतो. समाजसेवा, मानवाधिकार, शिक्षण आणि मदतकार्य यांच्या माध्यमातून विचारप्रवाह आणि सांस्कृतिक प्रभाव निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचे काही अभ्यासकांचे मत आहे. तसेच धर्मांतरामुळे लोकसंख्येच्या धार्मिक स्वरूपातही परिवर्तन झाले. परिणामी, आफ्रिका, लॅटिन अमेरिका आणि आशियातील काही भागांमध्ये ख्रिश्चन लोकसंख्या वाढल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते.
 
भारताचा विचार करता, २०११च्या जनगणनेनुसार ख्रिश्चन लोकसंख्या सुमारे २.३ टक्के म्हणजे जवळपास २.८ कोटी इतकी होती. ईशान्य भारतातील नागालॅण्ड, मिझोराम आणि मेघालय या राज्यांमध्ये ख्रिश्चन लोकसंख्या बहुसंख्य. दुसरीकडे देशातील हिंदू लोकसंख्येचे प्रमाण १९५१ मधील ८४.१ टक्क्यांवरून २०११ मध्ये ७९.८ टक्क्यांपर्यंत घटल्याचे दिसते. या बदलांमुळे सामाजिक आणि सांस्कृतिक परिवर्तनाबाबत विविध मतप्रवाह पुढे आले. काहींच्या मते, धर्म हा सामाजिक नियंत्रणाचे साधन ठरू शकतो; तर काहींच्या मते, तो समाजसंघटन आणि मूल्यव्यवस्थेचा आधार असतो. धर्मप्रसाराच्या कार्यात आर्थिक घटकांचाही मोठा सहभाग असतो. विविध मिशनरी संस्था, चर्च आणि स्वयंसेवी संघटनांच्या माध्यमातून निधी उभारला जातो. काही प्रकरणांमध्ये निधीच्या गैरवापराच्या किंवा ‘मनी लॉण्ड्रिंग’च्या घटनाही समोर आल्या आहेत.
 
आजच्या डिजिटल युगात धर्मप्रसाराचे स्वरूपही बदलले आहे. सोशल मीडिया, ऑनलाईन प्लॅटफॉर्म आणि जागतिक नेटवर्क यांच्या माध्यमातून विचारप्रवाह अधिक वेगाने आणि व्यापक पातळीवर पोहोचताहेत. भारतातही शिक्षण, आरोग्यसेवा आणि सामाजिक कार्याच्या माध्यमातून मिशनरी संस्थांनी अनेक भागांत वर्षानुवर्षे धर्मांतरे घडवून आणली. विविध आमिषे, भीती दाखवून, असाध्य रोगांवरील उपचारांच्या नावाखाली ख्रिस्ती श्रद्धा कशी सर्वश्रेष्ठ, हे बिंबवण्याचा प्रयत्न केला. परिणामी, भोळ्याभाबड्या, गरीब, वनवासी समाजाने वैयक्तिक, कौटुंबिक हितासाठी ख्रिस्ती धर्म स्वीकारलाही. पण, यामुळे स्थानिक संस्कृती, समाजजीवन धोक्यात आले. हे प्रकार रोखण्यासाठीच धर्मांतरबंदी कायद्याची आवश्यकता प्रकर्षाने अधोरेखित होताना दिसते. त्यामुळे ब्रिटन असेल अमेरिका अथवा फ्रेंच आणि पोर्तुगीज, या सर्व शासकांनी आर्थिक, राजकीय हिताच्या आड ख्रिस्तीकरणाचाही अजेंडा पद्धतशीरपणे राबविला. आज जगाला वसाहतवादातून मुक्ती मिळाली असली, तरी ख्रिस्तीकरणाचे छुपे जागतिक षड्यंत्र थांबलेले नाहीच!

ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक