नवी दिल्ली : (Fire Accident) दिल्लीतील पालम परिसरात बहुमजली इमारतीला लागलेल्या भीषण आगीत ७ जणांचा मृत्यू झाला, तर मध्यप्रदेशातील इंदूर येथे चार्जिंग पॉईंटमध्ये स्फोट होऊन लागलेल्या आगीत ८ जणांचा मृत्यू झाला आहे. या दोन्ही दुर्घटनांबद्दल पंतप्रधान नरेंद मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. तसेच पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून आर्थिक मदत जाहीर केली आहे.(Fire Accident)
पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला शोक
मध्य प्रदेशातील इंदूर आणि दिल्लीतील पालम येथे घडलेल्या आगीच्या दुर्घटनांमध्ये झालेल्या जीवितहानीमुळे मी अत्यंत व्यथित झालो आहे. ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले आहे, त्यांच्याप्रती मी संवेदना व्यक्त करतो. जखमींना लवकरात लवकर आराम मिळावा, यासाठी मी प्रार्थना करतो. पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून (PMNRF) प्रत्येक मृताच्या नातेवाईकांना २ लाख रुपयांची मदत दिली जाईल. तसेच, जखमींना ५० हजार रुपयांची मदत दिली जाईल, असे पंतप्रधानांनी जाहीर केले आहे.(Fire Accident)
दिल्लीत चार मजली इमारतीला आग
राजधानी दिल्लीतील पालम भागातील राम मार्केटमधील चार मजली इमारतीला सकाळी ७:०४ वाजता आग लागली. ही इमारत राजेंद्र कश्यप यांच्या मालकीची असल्याचे सांगितले जात आहे. तळमजला, पहिला मजला आणि तळघरात कपडे आणि सौंदर्यप्रसाधनांचे शोरूम होते, तर वरच्या दोन मजल्यांवर एक कुटुंब राहत होते. आग इतक्या वेगाने पसरली की लोकांना बाहेर पडता आले नाही, यात सात जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.(Fire Accident)
इंदूरमध्ये लागलेल्या आगीत आठ जणांचा मृत्यू
मध्य प्रदेशातील इंदूरमध्येही बंगाली स्क्वेअर परिसरातील ब्रिजेश्वरी कॉलनीमध्ये कार चार्ज करत असताना शॉर्ट सर्किट झाल्याने आग लागली. आगीने संपूर्ण घराला वेगाने वेढले. घरात ठेवलेल्या गॅस सिलिंडरलाही आग लागली, ज्यामुळे एकापाठोपाठ एक स्फोट झाले आणि घराचा काही भाग कोसळला. या घटनेत किमान आठ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.(Fire Accident)
मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\