नाशिकमध्ये होणारा सिंहस्थ कुंभमेळा हा जगातील सर्वात मोठ्या धार्मिक सोहळ्यांपैकी एक मानला जातो. देश-विदेशातील करोडो भाविक आणि पर्यटक या कुंभमेळ्यात सहभागी होण्यासाठी येत असतात. त्यामुळे त्याचे सुयोग्य नियोजन करण्याची जबाबदारी शासन आणि प्रशासनाची असते. सिंहस्थाचे व्यवस्थापन, स्वच्छता आणि गर्दी नियंत्रण ही मोठी आव्हाने सर्वांसमोर असतात. याच पार्श्वभूमीवर ‘सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणा’ने सुमारे दहा हजार स्वयंसेवकांना प्रशिक्षण देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. हा उपक्रम कुंभमेळ्याच्या यशस्वी आणि सुरक्षित आयोजनासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार असल्याचे बोलले जात आहे. या स्वयंसेवकांना स्वच्छता जनजागृती, पर्यावरणसंरक्षण, गर्दी नियंत्रण, आपत्कालीन परिस्थिती हाताळणे आणि भाविकांना मार्गदर्शन करणे अशा विविध बाबींमध्ये विशेष प्रशिक्षण दिले जाणार आहे. कुंभमेळ्यादरम्यान मोठ्या संख्येने साधू-संतांनंतर भाविक रामकुंडावर अमृतस्नानासाठी दाखल होतील.
त्यावेळी निर्माण होणारी गर्दी नियोजनबद्ध पद्धतीने हाताळणे अत्यंत आवश्यक ठरणार आहे. त्यावेळी हे प्रशिक्षित स्वयंसेवक भाविकांना योग्य मार्गदर्शन करून अनावश्यक गोंधळ टाळण्यास मोठा हातभार लावतील. त्यासोबत स्वच्छता हीदेखील कुंभमेळ्याच्या यशस्वीतेची एक महत्त्वाची कडी ठरणार आहे. अनेकदा धार्मिक स्थळांवर मोठ्या प्रमाणावर कचरा निर्माण होतो. या पार्श्वभूमीवर स्वयंसेवक भाविकांना स्वच्छतेचे महत्त्व समजावून सांगतील आणि परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी जनजागृती करतील. ‘स्वच्छ कुंभमेळा, सुरक्षित कुंभमेळा’ हा संदेश देत, ते भाविकांना जबाबदारीची जाणीव करून देतील. याशिवाय, आपत्कालीन परिस्थितीत मदत करणे, हरवलेल्या व्यक्तींना मार्गदर्शन करणे आणि प्रशासनाला सहकार्य करणे यामध्येही स्वयंसेवकांची महत्त्वाची भूमिका राहणार आहे. त्यामुळे प्रशासन आणि भाविक यांच्यातील संवाद अधिक सुलभ होईल. एकूणच, ‘सिंहस्थ कुंभमेळ्या’सारख्या भव्य सोहळ्यात स्वयंसेवकांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. प्रशिक्षित स्वयंसेवकांच्या सहभागामुळे स्वच्छता, शिस्त आणि सुरक्षितता यांना नवी दिशा मिळेल.
मुख्यमंत्र्यांचा कडक इशारा
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीसंदर्भातील कामांमध्ये अडथळे निर्माण करणार्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधितांना दिला आहे. नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे होणारा ‘सिंहस्थ कुंभमेळा’ हा केवळ धार्मिक सोहळा नसून, तो देश-विदेशातून येणार्या करोडो भाविकांच्या दृष्टीने पवित्र उत्सव आहे. त्यामुळे कुंभमेळ्याच्या तयारीत कोणताही अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी शासनाने गंभीर पावले उचलली आहेत. सिंहस्थ कुंभमेळा हा अत्यंत मोठ्या प्रमाणावर आयोजित केला जाणारा उत्सव असल्याने त्यासाठी पायाभूत सुविधा, रस्ते, स्वच्छता, पाणीपुरवठा, वाहतूक व्यवस्था आणि सुरक्षेची व्यापक तयारी केली जात आहे. त्यासाठी शासनाने विविध विभागांना जबाबदार्या दिल्या असून, नियोजनबद्ध पद्धतीने कामे सुरू आहेत. मात्र, काही ठिकाणी या कामांना अडथळे निर्माण होत असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले की, सिंहस्थासारख्या महत्त्वाच्या धार्मिक कार्यक्रमासाठी सुरू असलेल्या विकासकामांना कोणताही अडथळा आणणे सहन केले जाणार नाही.
अशाप्रकारचे कृत्य करणार्यांवर कायदेशीर गुन्हे दाखल करून कठोर कारवाई केली जाईल. प्रशासनालादेखील त्यांनी स्पष्ट सूचना दिल्या आहेत की, कामांमध्ये विलंब होऊ नये आणि सर्व कामे वेळेत पूर्ण व्हावीत. सिंहस्थ कुंभमेळा हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरेचा अभिमान आहे. त्यामुळे सिंहस्थ कुंभमेळ्याचे यशस्वी आयोजन करण्यासाठी शासन, प्रशासन आणि नागरिक यांचे सहकार्य अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. यासोबतच विकासकामे वेळेत पूर्ण झाली, तर भाविकांना चांगल्या प्रकारच्या सुविधा मिळतील आणि कुंभमेळा अधिक सुव्यवस्थित पद्धतीने पार पाडण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. त्यामुळे सर्व संबंधितांनी सहकार्याची भूमिका घेणे गरजेचे आहे. अडथळे निर्माण करण्याऐवजी विकासकामांना पाठिंबा दिल्यास सिंहस्थ कुंभमेळ्याचे आयोजन अधिक यशस्वी होईल आणि नाशिक शहराची प्रतिमा देश-विदेशात उंचावेल. यासोबतीने स्थानिकांना मोठा रोजगारही उपलब्ध होईल.
- विराम गांगुर्डे