भारतातील आरोग्यव्यवस्थेसमोरची एक समस्या अधिक तीव्र होत, भयानक रूप धारण करत असल्याचे चित्र आहे. एकेकाळी मध्यमवयीन लोकांपुरता मर्यादित मानला जाणारा हृदयविकार, आता तरुण पिढीतही डोके वर काढत असल्याचे वैद्यकीय संशोधन पुढे आले आहे. देशातील ‘कॅल्शियम स्कोअरिंग’ या तपासण्यांमध्ये अलीकडे तब्बल ८५ टक्क्यांनी वाढ झाली असून, त्यामध्ये तरुणांची संख्या सर्वाधिक आहे. बदलती जीवनशैली, वाढता मानसिक ताण, असंतुलित आहार आणि शारीरिक हालचालींचा अभाव या पार्श्वभूमीवर हे वास्तव नेमके काय सांगते आणि त्याचे आरोग्यव्यवस्थेवर कोणते परिणाम होऊ शकतात, याचा या लेखाच्या माध्यमातून घेतलेला आढावा...
भारतीय समाजाचे आरोग्याचे चित्र झपाट्याने बदलत असून, एकेकाळी प्रामुख्याने मध्यमवयीन किंवा वृद्धांमध्येच आढळणारा हृदयविकार आता तरुण पिढीपर्यंत पोहोचत असल्याची परिस्थिती चिंताजनक आहे. अलीकडे प्रसिद्ध झालेल्या एका अहवलानुसार, हृदयातील रक्तवाहिन्यांमध्ये कॅल्शियम साठ्याचे प्रमाण मोजणार्या ‘कॅल्शियम स्कोअरिंग’ या चाचण्यांमध्ये, तब्बल ८५ टक्क्यांनी वाढ नोंदवली गेली आहे. ही वाढ केवळ तपासण्यांच्या संख्येत झालेली वाढ नसून, तरुण भारतीयांमध्ये वाढत चाललेल्या हृदयविकाराच्या धोक्याचा संकेतही आहेत. आपल्या हृदयाला रक्तपुरवठा करणार्या रक्तवाहिन्या अतिशय सूक्ष्म अशा असतात. सततचा चुकीच्या आहार, लठ्ठपणा, मधुमेह किंवा कोलेस्टेरॉल वाढल्यामुळे या रक्तवाहिन्यांच्या आतील भिंतींवर चरबी, कोलेस्टेरॉल आणि कॅल्शियम यांचा थर कालांतराने साचू लागतो. वैद्यकीय भाषेत या प्रक्रियेला ‘अॅथेरोस्लेरोसिस’ असे म्हणतात. हा थर जाड होत गेला की, रक्तवाहिन्या अरुंद होतात आणि हृदयापर्यंत पोहोचणारा रक्तपुरवठाही कमी होतो. कधीकधी हा थर अचानक फुटल्यास, रक्ताची गाठ तयार होऊन रक्तप्रवाह थांबतो आणि त्यातून हृदयविकाराचा झटका येऊ शकतो.
याच प्रक्रियेचा अंदाज घेण्यासाठी ‘कॅल्शियम स्कोअरिंग सीटी’ ही तपासणी केली जाते. या तपासणीत रक्तवाहिन्यांमध्ये कॅल्शियमच्या साठ्याचे प्रमाण मोजले जाते. कॅल्शियमचे प्रमाण जास्त असल्यास भविष्यात हृदयविकाराचा धोका वाढू शकतो, असा वैद्यकीय निष्कर्ष काढला जातो. विशेष म्हणजे, अनेक वेळा रुग्णाला कोणतीही स्पष्ट लक्षणे नसतानाही, ही प्रक्रिया शरीरात सुरूच असते. त्यामुळे ही तपासणी प्रतिबंधात्मक आरोग्य तपासण्यांमधील एक महत्त्वाची तपासणी मानली जाते. सध्या यामधील भारतातील परिस्थिती काहीशी वेगळी आहे. पाश्चिमात्य देशांच्या तुलनेत भारतीयांमध्ये ‘कोरोनरी आर्टरी डिसीज’ साधारणत: दहा वर्षे लवकर दिसून येते. त्यामुळे सध्या ३० ते ४० वयोगटातही हृदयविकाराचा धोका वाढलेला दिसतो. अनेकदा अचानक आलेला हृदयविकाराचा झटका हा त्या आधीच्या दीर्घकालीन प्रक्रियेमुळे येतो. त्यामुळे या चाचणीद्वारे हृदयाचे आयुष्य तपासणे आवश्यक ठरते.
भारतीयांच्या जीवनातील या वाढत्या समस्येमागे बदललेली जीवनशैली हाच सर्वांत मोठा घटक आहे. दीर्घकाळ बसून काम करणे, व्यायामाचा अभाव, फास्ट फूड आणि प्रक्रिया केलेल्या पदार्थांचे वाढते सेवन या सर्वांमुळे लठ्ठपणा, मधुमेह आणि उच्च कोलेस्टेरॉल यांसारख्या समस्या तरुण वयातच वाढताना दिसत आहेत. त्यातच कामाचा ताण, अपुरी झोप आणि सततचा मानसिक दबाव आणि शारीरिक धावपळ यांमुळे शरीरावर अतिरिक्त ताणही पडतो. दक्षिण आशियातील लोकांमध्ये आनुवंशिकदृष्ट्याही हृदयविकाराचा धोका तुलनेने अधिक असल्याचे अनेक संशोधनातून स्पष्ट झाले आहे. या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक विकाराच्या उपाययोजनांचे महत्त्व वाढले आहे. ३०-३५ वर्षांनंतर नियमितपणे रक्तदाब, रक्तशर्करा आणि कोलेस्टेरॉल तपासणे आवश्यक ठरते. जोखीम असलेल्या व्यक्तींमध्ये डॉक्टरांच्या सल्ल्याने कॅल्शियम ‘स्कोअरिंग’सारख्या तपासण्या उपयुक्त ठरू शकतात. त्याचबरोबर जीवनशैलीतील साधे बदलही अत्यंत प्रभावी ठरतात. नियमित व्यायाम, संतुलित आहार, धूम्रपान टाळणे, ताणतणाव कमी करणे आणि पुरेशी झोप घेणे, या सवयी हृदयाचे आरोग्य टिकवण्यासाठी महत्त्वाच्या आहेत.
‘कॅल्शियम स्कोअरिंग’ चाचण्यांतील वाढ ही आरोग्यव्यवस्थेसाठी एक गंभीर इशारा मानावा लागेल. योग्य वेळी तपासणी, जनजागृती आणि जीवनशैलीतील सुधारणा यांद्वारे हृदयविकाराचा वाढता धोका मोठ्या प्रमाणात कमी करता येऊ शकतो, अन्यथा तरुणाईसमोर उभे राहिलेले हे हृदयविकाराचे सावट येत्या काळात देशाच्या सार्वजनिक आरोग्यासमोरील मोठेच आव्हान ठरू शकते.