अखेरच्या श्वासापर्यंत जपली संघनिष्ठा...

    17-Mar-2026
Total Views |
Prabhakar Deshpande
 
वयाच्या अवघ्या तिसऱ्या वर्षी शाखेत पाऊल ठेवलेला एक बाल स्वयंसेवक आणि वयाच्या ८९व्या वर्षीही 'डॉक्टरांच्या समाधीचे दर्शन घ्यायचे' अशीच अंतिम इच्छा मनात बाळगणारा तोच स्वयंसेवक; ही कहाणी आहे कै. प्रभाकर देविदास देशपांडे यांच्या अखंड निष्ठेची, समर्पणाची आणि संघकार्याशी असलेल्या अतूट नात्याची. आयुष्यभर एका विचाराशी, एका संघटनेशी आणि राष्ट्रकार्याशी निष्ठावान राहणे हीच खरी साधना असते. प्रभाकररावांचे जीवन हे अशाच निष्ठा, समर्पण आणि कार्यशीलतेचे प्रेरणादायी उदाहरण ठरते.
 
निष्ठा, शिस्त आणि राष्ट्रकार्याशी अखंड बांधिलकी यांचे जिवंत आदर्श म्हणजे कै. प्रभाकर देविदास देशपांडे. १ जून १९३६ रोजी नागपूर येथे जन्मलेल्या प्रभाकररावांनी बालपणापासूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यात स्वतःला झोकून दिले. अवघ्या तिसऱ्या वर्षी मोहिते वाड्यातील शाखेत शिशु स्वयंसेवक म्हणून त्यांनी संघजीवनाची सुरुवात केली आणि आयुष्याच्या अखेरच्या क्षणापर्यंत ही नाळ अखंड जोडलेली राहिली.
 
वयाच्या ८९व्या वर्षी त्यांनी व्यक्त केलेली एक साधी पण अंतर्मुख इच्छा त्यांच्या संपूर्ण जीवनप्रवासाचे सार सांगून जाते; 'संघ शताब्दी निमित्त नागपूरला जाऊन पूजनीय डॉक्टरांच्या समाधीचे दर्शन घ्यायचे आणि त्यांना नमस्कार करायचा आहे.' ही भावना त्यांच्या संघनिष्ठेची साक्ष देणारी आहे. संघ शताब्दी निमित्त नागपूरला जाऊन पूजनीय डॉक्टरांच्या समाधीचे दर्शन घ्यायचे आणि त्यांना नमस्कार करायचा आहे.” ही भावना त्यांच्या संघनिष्ठेची साक्ष देणारी आहे.
 
महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळात कार्यरत असताना, बदली जिथे जिथे झाली तिथे त्यांनी नवीन लोकांशी संपर्क साधत संघकार्याचा प्रसार केला. साध्या संवादातून संघाची ओळख करून देत त्यांनी अनेकांना संघकार्याशी जोडले. नागपूरमध्ये राहत असताना संघ कामाच्या निमित्ताने किंवा बैठकीच्या निमित्ताने त्यांच्या घरी मा. गो. वैद्य, वसंतराव देवपुजारी, डॉ. आबासाहेब थत्ते यांसारख्या मान्यवरांचा राबता असायचा. या संपर्कातून त्यांच्या विचारविश्वाची अधिक समृद्धी झाली.
 
आणीबाणीच्या कठीण काळात त्यांनी अत्यंत धैर्याने आणि जबाबदारीने कार्य केले. अनेक स्वयंसेवक तुरुंगात असताना त्यांच्या कुटुंबीयांना मदत करणे, भूमिगत प्रचारकांची व्यवस्था पाहणे, त्यांच्या भोजन-निवासाची काळजी घेणे ही जोखमीची कामे त्यांनी निष्ठेने पार पाडली. आणीबाणीच्या काळात स-मो-सा अर्थात सदाशिव मोरेश्वर साने हे नाव धारण करणारे मूळचे विजयराव कापरे हे पुण्यातले. आणीबाणीचा काळात हे समोसा मध्यरात्री त्यांच्या घरी येत असत आणि तेव्हा होणाऱ्या गुप्त चर्चा, त्यांचे आदरातिथ्य ही सर्व परिस्थिती त्यांच्या कुटुंबानेही समजून घेतली. त्यामुळेच त्यांच्या मुलांमध्ये लहानपणापासूनच कर्तव्यभाव आणि संघकार्याची जाणीव निर्माण झाली.
 
प्रभाकर यांच्या पत्नी सुनंदा देशपांडे या देखील राष्ट्र सेविका समितीच्या निष्ठावान कार्यकर्त्या होत्या. अमरावतीपासून नागपूरपर्यंत त्यांनी समितीचे कार्य सक्रियपणे केले. त्यांच्या घरातील वातावरण हे राष्ट्रकार्य, संस्कार आणि सेवाभाव यांचे जिवंत उदाहरण होते. १९८० साली देशपांडे कुटुंब नाशिकला स्थायिक झाले. येथेही त्यांनी संघकार्याची धुरा समर्थपणे सांभाळली. नाशिक रोड परिसरात शाखा, संपर्क आणि संघटन वाढवण्यात त्यांचा मोठा वाटा होता. ज्येष्ठ आणि कनिष्ठ स्वयंसेवकांना एकत्र आणत त्यांनी संघकार्याला गती दिली. अनेक तरुणांना त्यांनी मार्गदर्शन करून कार्यात सक्रिय केले. वयाने लहान असणारे विनायक उपाध्ये, किशोर लाले, दीपक पर्वतीकर, मंगेश कुलकर्णी, राजीव कुलकर्णी, जयंत नारद, सुहास पाठक या आणि यांसारख्या अनेक तरुणांना संघ कामात घडवले, सक्रिय केले.
 
समरसतेचा विचार त्यांनी केवळ मांडला नाही, तर तो आचरणात आणला. विविध समाजघटकांतील लोकांशी आत्मीय संबंध प्रस्थापित करत त्यांना घरी बोलावणे, त्यांच्या घरी जाणे या कृतींमधून त्यांनी सामाजिक ऐक्याचा संदेश दिला. त्यांच्या घरी येणाऱ्या प्रत्येकाचे त्यांनी प्रेमाने आदरातिथ्य केले. नाशिकला घरी डॉ. आबाजी थत्ते, भैय्याजी जोशी, गिरीश कुबेर, रवि बेडेकर अशा अनेकांचे येणं होत असे. समितीच्या पहिल्या प्रचारिका सिंधुताई फाटक, वं. प्रमुख संचालिका - मा. उषाताई चाटी आणि मा. प्रमिलताई मेढे, जेष्ठ कवयित्री शांताबाई शेळके अशा अनेक महनीय व्यक्तींचे पाय घराला लागले होते आणि सुकृत वास्तू पावन झाली होती.
 
प्रभाकररावांची एक विशेष ओळख म्हणजे त्यांचे सुंदर हस्ताक्षर आणि शिस्तबद्ध जीवनशैली. पू. गुरुजींच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांनी दररोज पोस्टकार्डवर विचार लिहून १०० लोकांना पाठवण्याचा संकल्प पूर्ण केला. त्यांच्या लेखनात कुठेही खाडाखोड नसे, ही त्यांची एकाग्रता आणि परिपूर्णतेची जाणीव दर्शवते. निवृत्तीनंतरही त्यांनी अध्ययन आणि साधना थांबवली नाही. श्रीमद्भगवद्गीता, विविध स्तोत्रे, मंत्र यांचे पाठांतर केले. ‘दासबोध’चा अभ्यासक्रम पूर्ण केला आणि संत गजानन महाराजांची उपासना नियमित ठेवली. संघाची प्रार्थना, प्रातःस्मरण, एकात्मता स्तोत्र हे सर्व त्यांनी अखेरच्या दिवसापर्यंत अखंड सुरू ठेवले.
 
त्यांच्या आचरणातूनच त्यांच्या तिन्ही मुलांमध्ये संस्कार रुजले. आज त्यांची मुले आणि त्यांचे कुटुंबीय संघ आणि समितीच्या कार्यात सक्रिय आहेत, हीच त्यांच्या जीवनकार्याची खरी पावती म्हणावी. दि. २७ फेब्रुवारी २०२५ रोजी प्रभाकररावांनी अखेरचा श्वास घेतला, पण त्यांनी रुजवलेले संस्कार, त्यांनी उभा केलेला कार्यवारसा आणि त्यांनी दिलेली प्रेरणा ही कायम स्मरणात राहील. कै. प्रभाकर देशपांडे यांचे जीवन हे केवळ एका व्यक्तीचे चरित्र नसून, ते निष्ठा, समर्पण आणि राष्ट्रसेवेच्या अखंड प्रवासाचे प्रेरणादायी उदाहरण आहे.