इराण, व्हेनेझुएलानंतर आता डोनाल्ड ट्रम्प रशियाचा मित्रदेश क्युबावर हल्ला करणार!
17-Mar-2026
Total Views |
वॉशिंग्टन (Donald Trump next target Cuba) : रशिया-युक्रेन आणि आता इराण-इस्रायल युद्धामुळे जग होरपळत असताना, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी क्युबा देशाला लक्ष्य केले आहे. क्युबाला एक ‘कोलमडलेले राष्ट्र’ म्हणताना, त्याच्यावर कारवाईची गरजही त्यांनी व्यक्त केली. त्यामुळे, रशिया, इराण, व्हेनेझुएअलानंतर ट्रम्प यांच्या रडारवर क्युबा देश आसल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
ट्रम्प यांच्या मते, क्युबा हा देश दिवसेंदिवस अमेरिकेच्या सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक होत असून, भविष्यामध्ये हे संकट विक्राळ रुप धारण करणार आहे. त्यामुळेच त्यांनी क्युबावर कारवाई करत क्युबाला ताब्यत घेणे, हा माझ्यासाठी सन्मान असेल असे म्हटले. तसेच, गेल्या कित्येक दिवसांत क्युबाचे रशिया आणि चीनबरोबरचे वाढते हितसंबंधही अमेरिकेसाठी धोका असून, क्युबामध्ये चीनच्या मदतीने डिजिटल हेरगिरी तंत्रज्ञानाचा विस्तार झपाट्याने होत आहे. ही बाब देखील अमेरिकेसाठी नजीकच्या काळातील धोका असल्याचे ट्रम्प म्हणाले.
मध्यंतरी चीनने क्युबामधील मारिएल पोर्टच्या विकासासाठी 80 दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक करून, तर रशियाने क्युबा सरकारबरोबर लष्करी पायाभूत सुविधेच्या विकासाचा करार करून क्युबामध्ये धोरणात्मक प्रभाव वाढवल्याचेही ट्रम्प यांनी म्हटले. या सर्व बाबी ट्रम्प यांना अमेरिकेच्या भविष्याच्या दृष्टीने धोका वाटत असून, येत्या काळात त्याबाबात क्युबाबरोबर चर्चा करण्यास उत्सुक असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे.
मात्र , त्याचवेळी ही चर्चा निष्फळ झाल्यास मात्र कारवाईवाचून पर्याय राहाणार नसल्याचेही ट्रम्प यांनी जाहीर केले आहे. क्युबामध्ये सध्या कम्युनिस्ट विचारधारेचे सरकार सत्तेवर असून, त्यामुळे रशिया आणि चीन या कम्युनिस्ट राष्ट्रांबरोबरची त्यांची वैचारिक नाळ जुळलेली आहे. त्यामुळे विविध पद्धतीने क्युबा सरकारवरील दबाव वाढवून, त्यांना रशिया आणि चीनच्या प्रभावातून बाहेर काढण्यासाठी ट्रम्प प्रयत्नरत आहेत.
क्युबामध्ये अमेरिकेमुळे ऊर्जासंकटाचा आरोप
दरम्यान, व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष मादुरो यांना अटक केल्यापासून, व्हेनेझुएलाच्या तेलावर अमेरिकेने स्वत:चा अंकुश प्रस्थापित केला आहे. यामुळे क्युबाला होणार्या तेलसाठ्यामध्ये अचानक मोठ्या प्रमाणात घट झाली असून, तेथील वीजपुरवठ्यावर त्याचा परिणाम होत आहे. क्युबाचे राष्ट्राध्यक्ष मिगेल डियाझ- कॅनेल यांनी हे ऊर्जासंकट मान्य केले असून, अमेरिकेच्या निर्बंधांमुळेच गेले तीन महिने क्युबा अंधारात असल्याची टीकाही मिगेल यांनी केली होती. तसेच, अमेरिका जाणीवपूर्वक क्युबाला अमेरिकेवर आर्थिक दृष्ट्या अवलंबून राहण्यास भाग पाडत असल्याचेही मिगेल यांनी म्हटले आहे.