BDD Chawl: नायगाव बीडीडी चाळवासीयांचा गुढीपाडवा गोड; ८६४ बीडीडी चाळवासीयांचे गृहस्वप्न साकार

Total Views |
 
BDD Chawl
 
मुंबई : (BDD Chawl) अनेक दशकांपासून केवळ 160 ते 180 स्क्वेअर फुटांच्या चिंचोळ्या खोल्यांमध्ये राहणाऱ्या शेकडो मराठी कुटुंबांचे नशिब आज उजळले आहे. ज्या कुटुंबांनी पिढ्यानपिढ्या एका खोलीत आयुष्य काढले, त्यांना आता थेट 2 BHK घरांचा ताबा मिळाला असून, मुंबईच्या मध्यवस्तीत हक्काचे आणि मोफत मोठे घर मिळवण्याचे त्यांचे स्वप्न पूर्ण झाले आहे. (BDD Chawl)
 
मुंबई नायगाव बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर बीडीडी संकुलातील ८६४ पुनर्वसन सदनिकांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सोमवार, दि. १६ मार्च रोजी वितरण झाले. यामध्ये ४२३ सदनिका नागरिकांच्या सुरक्षेसाठी तत्पर असलेल्या पोलिस विभागातील निवृत्त पोलिस, त्यांचे वारस व कार्यरत पोलिस कर्मचाऱ्यांकरिता आहेत. (BDD Chawl)
 
या कार्यक्रमाला विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, मंत्री मंगल प्रभात लोढा, मंत्री ॲड. आशिष शेलार, राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर आणि मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. या प्रकल्पामुळे मुंबईतील चाळ संस्कृतीतून थेट आधुनिक टॉवर संस्कृतीत प्रवेश करणाऱ्या रहिवाशांच्या चेहऱ्यावर मोठा आनंद पाहायला मिळाला. (BDD Chawl)
 
यावेळी बोलताना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, "जवळपास 40 वर्षे प्रलंबित असलेला हा प्रकल्प शासनाने स्वतः हाती घेतला आणि म्हाडामार्फत काम सुरू केले. देशातील एल अँड टी व टाटा सारख्या सक्षम कंपन्यांना काम देऊन प्रकल्पाला गती दिली. अनेक अडचणींवर मात करत आज नायगाव येथे घरांच्या चाव्यांचे वितरण करण्यात आले." (BDD Chawl)
 
पुढे ते म्हणाले, "मुंबईतला मध्यमवर्गीय हा मुंबईमध्ये घराचं स्वप्न पाहू शकत नव्हता मुंबईमध्ये वर्षानुवर्ष राहणाऱ्या व्यक्तीला घर घ्यायचं असेल तर कुठेतरी कल्याण डोंबिवली, भिवंडी, कर्जतला जावं लागेल अशा प्रकारची परिस्थिती होती. पण आम्ही निर्णय केला की, मुंबईतल्या सामान्य माणसामुळे ही मुंबई आहे. या मुंबईची संस्कृती जपणारा हा मुंबईकर आहे. त्यामुळे मुंबईकरांना मुंबईतच घर द्यायचं हा आम्ही निर्धार केला. मला विश्वास आहे की,जेवढे प्रकल्प आम्ही हातामध्ये घेतलेले आहेत. या सगळ्या प्रकल्पांमुळे ज्यांनी मुंबईत घर घेण्याचे स्वप्न बघितलं नव्हतं अशा सगळ्यांचे स्वप्न आपले महायुतीचे सरकार येत्या काळामध्ये पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही", असा विश्वासही मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला. (BDD Chawl)
 
तसेच, "वर्ष २०२९ पर्यंत १०० टक्के सगळ्या घरांच्या चाव्या देण्याचा आमचा मानस आहे. नवीन घरे मिळालेल्या नागरिकांनी ही घरे विकू नयेत आणि पुढील पिढ्यांसाठी त्यांचे जतन करावे", अशी विनंती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी रहिवाशांना केली. (BDD Chawl)
 
बीडीडी चाळीत राहणारे सर्वजण आता टॉवरमध्ये राहणार आहेत, एक वेगळा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर आज चाव्या घेताना पहिला. आज तुम्ही चाळीतून २ बी एच के घरात राहायला जाताय याचा आनंद मुख्यमंत्री महोदय, सुनेत्राताई आणि इथे बसलेल्या सर्वांनाच आहे असे सांगितले. त्यामुळे गुढीपाडव्याच्या तुम्हाला सगळ्यांना आधीच शुभेच्छा देतो, यंदाची गुढी तुम्हाला नवीन घरात उभारता येणार आहे याचा मला विशेष आनंद आहे.
- एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री
 
बीडीडीवासियांची हक्काची घरे म्हणजे स्वप्नांचे, आशा-आकांक्षांचे ते प्रतीक आहेत. या घरांचे बांधकाम हे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार असले पाहिजे, असा मा. अजितदादांचा कायम आग्रह राहिला.
- सुनेत्राताई पवार, उपमुख्यमंत्री
 
मुंबईत घर घेण्याचे स्वप्न सत्यात उतरले (BDD Chawl)
 
"मी इयत्ता दुसरीच्या वर्गात असल्यापासून मी या नायगाव बीडीडी चाळीत वास्तव्यास आहे. माझे वडील पोलीस सेवेत होते. माझे शिक्षण पूर्ण करून मी ही पोलीस दलात भरती झालो. वडिलांनंतर मला हा रूम मिळाला. ही घर कधी पूर्ण होतील अशी कोणालाही अपेक्षा नव्हती. मात्र आम्ही संयम ठेवला. आज आमचे घराचे स्वप्न पूर्ण झाले."
- चंद्रकांत जाधव, रहिवासी
 
राज्यातील महायुती सरकारचे खूप आभार गेली चाळीस वर्षे आम्ही या चाळीत काढले. फार वाईट परिस्थिती होती. आज काळाची गरज ओळखून राज्य सरकारने आम्हाला इतकी उत्तम घर बांधून दिली. ५०० चौरस फुटांची अत्यंत सुंदर घरे आम्हाला मिळाली. लवकरात लवकर आम्ही नवीन घरी राहायला जाण्यासाठी उत्सुक आहोत. 
- जगदीश कांबळे, रहिवासी
 
"बीडीडी चाळीत आमची पाचवी पिढी आहे. या चाळींमध्ये अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात आम्ही राहिलो आहे. आमचे मोठे कुटुंब आहे मात्र एकत्रित आम्ही या चाळीत राहत होतो. आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आम्हाला नव्या घराची चावी मिळाली खूप आनंद झाला आहे. आज या क्षणी डोळ्यातून आनंदाश्रू आले."
- वसंत आठवले, रहिवासी
 
 

गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.