आजच्या वेगवान आणि कॉर्पोरेट जीवनशैलीत सौंदर्याची व्याख्या झपाट्याने बदलताना दिसतेे. एकेकाळी सौंदर्य म्हणजे चेहर्यावरची प्रसन्नता, निरोगी शरीर, संतुलित मन आणि सकारात्मक विचार असे मानले जात होते. आज मात्र तजेलदार त्वचा, गोरेपणा, डागरहित चेहरा, सुरकुत्यांचा अभाव आणि दाट केस यांनाच सौंदर्याचे निकष समजले जाते. पण, आज बाह्य नव्हे, तर अंतर्गत संतुलनाची गरज अधिक आहे. त्याविषयी मार्गदर्शन करणारा हा लेख...
एक डॉक्टर म्हणून माझ्या दवाखान्यात येणार्या रुग्णांमध्ये विशेषतः तरुण वर्गात झटपट सौंदर्य मिळवण्याची वाढती घाई स्पष्टपणे जाणवते. सोशल मीडियाच्या प्रभावामुळे परिपूर्ण दिसण्याचा दबाव वाढला आहे. यासाठी अनेकजण आरोग्याकडे दुर्लक्ष करून रासायनिक सौंदर्यप्रसाधने, फेशियल, ब्लीच, स्पा, लेझर ट्रीटमेंट किंवा केमिकल पील यांसारख्या उपायांकडे वळतात. परंतु, मला नेहमीच एक प्रश्न पडतो. हे उपाय खरोखर आवश्यक आहेत का?
त्वचा आणि केसांच्या समस्या या केवळ बाह्य स्वरूपाच्या नसतात; त्या शरीरातील अंतर्गत असंतुलनाचे संकेत असतात. वयात येताना होणारे हार्मोनल बदल, गर्भधारणा, रजोनिवृत्ती, ताणतणाव, फास्टफूडचे अति सेवन, व्यायामाचा अभाव आणि अपुरी झोप, ऋतुचर्या, दिनचर्या पालनाचा अभाव या सर्वांचा परिणाम त्वचेवर आणि केसांवर दिसून येतो. गर्भधारणा, रजोनिवृत्ती व वयात येताना होणारे हार्मोनल बदल या गोष्टी न टाळता येण्यासारख्या असतात. पण, जर आपण आपल्या दैनंदिन जीवनात आयुर्वेदात सांगितलेले ऋतुचर्या, दिनचर्या, वेगाधारनादी नियम यांचे व्यवस्थित पालन केले, तर गर्भधारणा, रजोनिवृत्ती व वयात येताना होणार्या हार्मोनल बदलांमुळे होणार्या परिणामांना आपण टाळू शकतो. त्वचेचे सौंदर्य टिकवून ठेवणे, ही केवळ बाह्य प्रसाधनांची गोष्ट नसून ती शरीराच्या अंतर्गत आरोग्याशी निगडित आहे. माझ्या वैद्यकीय अनुभवातून मी हे ठामपणे सांगू शकते की, निरोगी आणि तेजस्वी त्वचेसाठी आयुर्वेदात सांगितलेली ऋतुचर्या आणि दिनचर्या यांचे पालन अत्यावश्यक आहे.
ऋतुचर्या, दिनचर्या, वेगाधारनादी नियम व त्याचा सौंदर्याशी संबंध
आयुर्वेदानुसार वर्षाचे दोन मुख्य कालखंड मानले जातात - आदान काळ (उत्तरायण) आणि विसर्ग काळ (दक्षिणायन). आदान काळात (शिशिर, वसंत, ग्रीष्म) सूर्य पृथ्वीतील ऊर्जा शोषून घेतो, ज्यामुळे शरीराची ताकद कमी होते, तर विसर्ग काळात (वर्षा, शरद, हेमंत) चंद्र पृथ्वीला पोषण देतो आणि शरीराची शक्ती वाढवतो. या ऋतुचक्राचा त्वचेवर थेट परिणाम होत असतो. तो टाळण्यासाठी खालीलप्रमाणे प्रत्येक ऋतुनुसार ऋतुचर्या पालन करणे गरजेचे आहे.
शिशिर ऋतू (जानेवारी ते मार्च)
शिशिर ऋतूमध्ये कडाक्याची थंडी असते. त्यामुळे वात आणि कफ दोष संतुलित ठेवण्यासाठी पौष्टिक, उष्ण आणि पचायला जड अन्न (तूप, गूळ, तीळ, सुका मेवा) खावे. या काळात भूक जास्त लागते, म्हणून नियमित व्यायाम करावा, गरम पाण्याने स्नान करणे आणि त्वचेच्या काळजीसाठी अभ्यंग (तेल मालिश) करणे लाभदायक ठरते. थंडी व कोरड्या वार्यामुळे त्वचेतील आर्द्रता कमी होते. आहारात तूप, दूध, फळे, भाज्या यांचा समावेश करावा.
वसंत ऋतू (मार्च-मे)
वसंत ऋतूमध्ये हवेत होणार्या बदलांमुळे शरीरात कफ दोष वाढतो, ज्यामुळे सर्दी, खोकला, अॅलर्जी आणि पचनाच्या समस्या उद्भवू शकतात. या काळात हलका, पचायला सोपा आहार (उदा. मूग, बाजरी, मध), कडू-कषाय पदार्थांचे सेवन आणि नियमित व्यायाम करणे आवश्यक आहे. वातावरणातील उष्णता वाढल्यामुळे शरीरातील दोष वाढतात. आहारात थंड पदार्थांचा समावेश करावा. पाणी जास्त प्रमाणात प्यावे.
ग्रीष्म ऋतू (मे-जुलै)
ग्रीष्म ऋतू (उन्हाळा)मध्ये उष्णता, निर्जलीकरण (dehydration) आणि त्वचेच्या समस्या टाळण्यासाठी भरपूर पाणी, शहाळ्याचे पाणी, लिंबू सरबत आणि डाळिंब, द्राक्षे यांसारखी रसाळ फळे खाणे आवश्यक आहे. कडक उन्हात बाहेर पडणे टाळणे, सैल सुती कपडे वापरावे आणि पचायला हलके, थंड पदार्थ आहारात घ्यावे. उष्णता वाढल्यामुळे शरीरातील पाणी कमी होते. आहारात फळे, भाज्या, दही यांचा समावेश करावा. माणिक, मोती यांसारखी रत्ने धारण करावी.
वर्षा ऋतू (जुलै-सप्टेंबर)
वर्षा ऋतू (पावसाळा)मध्ये त्वचेचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी स्वच्छतेवर विशेष भर देणे, गरम व ताजे अन्न खाणे आणि पाणी उकळून पिणे गरजेचे आहे. या ऋतूत पचनशक्ती कमकुवत होत असल्याने हलका आहार घ्यावा. तसेच डेंग्यू, मलेरिया आणि फंगल इन्फेशन टाळण्यासाठी घर व आसपासची जागा सुकी व स्वच्छ ठेवावी. वातावरणातील ओलसरपणा वाढल्यामुळे त्वचा तैलीय होत असते. त्यामुळे आहारात हलक्या पदार्थांचा समावेश करावा. स्नानाकरिता गरम पाण्याचा वापर करावा.कोरडे व स्वच्छ कपडे घालावे.
शरद ऋतू (सप्टेंबर-नोव्हेंबर)
शरद ऋतूमध्ये (पावसाळ्यानंतरचा काळ) प्रामुख्याने पित्त वाढते आणि रोगप्रतिकारक शक्ती कमी होऊ शकते. निरोगी राहण्यासाठी आहारात गोड, कडवट आणि तुरट चवीच्या पदार्थांचा समावेश करावा, दही खाणे टाळावे, पुरेसे पाणी पिणे, भूक लागल्यासच जेवणे आणि पहाटे किंवा संध्याकाळी चालण्यासारखा हलका व्यायाम करावा.वातावरणातील थंडावा वाढल्यामुळे त्वचा कोरडी पडते. त्यासाठी तीळ तेल, शतधौत घृत, किंवा मॉइश्चरायझर क्रीम वापरावे. आहारात गरम पदार्थांचा समावेश करावा. जाड गरम कपडे घालावे.
हेमंत ऋतू (नोव्हेंबर-जानेवारी)
हेमंत ऋतू हा शरद आणि शिशिर ऋतूंच्या मधला, अर्थात हिवाळ्याच्या सुरुवातीचा (ऑक्टोबर अखेर ते डिसेंबर मध्य) सुखद काळ आहे. मार्गशीर्ष आणि पौष महिन्यात येणार्या या ऋतूत हवामान शीतल, आल्हाददायक आणि सुखद असते. यात शरीराची पचनशक्ती (अग्नी) वाढते, त्यामुळे आरोग्यासाठी पौष्टिक अन्न खाणे आणि कसरत करणे हितकारक मानले जाते.वातावरणातील थंडावा वाढल्यामुळे त्वचा कोरडी पडते. आहारात गरम पदार्थांचा समावेश करावा.
या ऋतुनुसार दिनचर्या पालन केल्यास शरीर निरोगी व त्वचा सुंदर राहण्यास मदत होते. तसेच आयुर्वेदात १३ प्राकृतिक शारीरिक अधारणीय वेग सांगितलेले आहे. हे वेग जेव्हा प्रकट होतात, तेव्हा त्यांना शरीराबाहेर टाकणे आवश्यक असते. तसे न केल्यास, ते आपल्या शरीरात विकृती निर्माण करतात व त्यामुळे त्वचेचे आरोग्य खराब होते. ते १३ अधारणीय वेग खालीलप्रमाणे आहेत, मल, मूत्र, शुक्र, अपान वायू, वमन, शिंक, डकार, जांभई, भूक, तहान, अश्रू, निद्रा. यामध्ये मुख्यतः वमन या वेगाला रोखल्याने त्वचारोग उत्पन्न होतात. या वेगाला थांबवल्यामुळे शरीराला खाज येणे, सूज येणे, कुष्ठरोग, वांग, विसर्प यांसारखे रोग उद्भवतात.
अनेक रुग्ण मला सांगतात, "डॉक्टर, एखादी चांगली क्रीम किंवा लेझर उपचार करा. मला लवकर फरक पडायला हवा. मी सुंदर दिसायला हवे” वगैरे वगैरे. परंतु, केवळ बाह्य उपचारांनी काही काळासाठी फरक पडू शकतो; कायमस्वरूपी सौंदर्य टिकवायचे असेल, तर जीवनशैलीत बदल करणे अपरिहार्य आहे. औषधे आणि सौंदर्य उत्पादने ही पूरक असतात, पर्याय नाहीत. शरीराचे प्राकृतिक सौंदर्य टिकवायचे असेल, तर आपल्याला आपल्या शरीराचे ऋतुनुसार शुद्धीकरण करणे गरजेचे असते.
पंचकर्म
ऋतुनुसार पंचकर्म हे आयुर्वेदाने आपल्याला दिलेली एक अनमोल देण आहे, ज्यामुळे आपण आपल्या शरीराचे शुद्धीकरण करून शरीराला निरोगी ठेवण्यास मदत करू शकतो. पंचकर्म हे रोगी व निरोगी या दोन्ही व्यक्तींकरिता लाभदायक आहे, तर सौंदर्यासाठी पंचकर्म हे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढून त्वचा नैसर्गिकरित्या उजळण्यास, तारुण्य टिकवण्यास आणि चेहर्यावरील बारीक रेषा कमी करण्यास मदत करते. यात अभ्यंग (मालिश) आणि स्वेदंनासारख्या उपचारांमुळे त्वचेची लवचिकता वाढते, रक्ताभिसरण सुधारते आणि त्वचेला सखोल पोषण मिळून नैसर्गिक चमक येते.
सौंदर्यासाठी पंचकर्माचे मुख्य फायदे
शरीरातील टॉसिन्स (मल) काढून टाकते, ज्यामुळे त्वचा स्वच्छ, निरोगी आणि उजळ होते.
अॅण्टीएजिंग (तारुण्य टिकवणे), अभ्यंग, नंस्य आणि विरेचन यांसारखे उपाय त्वचेची लवचिकता वाढवतात, सुरकुत्या कमी करते आणि वृद्धत्वाची प्रक्रिया मंद होण्यास मदत करते.
अभ्यंग (तेल मालिश) : यामुळे रक्ताभिसरण सुधारते, ज्यामुळे त्वचेला योग्य पोषण मिळते; त्यामुळे त्वचा मऊ आणि चमकदार दिसते. रोम कुपांना खुले करून पोषण देते.
शिरोधारा : यामुळे तणावमुक्ती होते. मन शांत व सकारात्मक होते, ज्यामुळे मनाची प्रसन्नता चेहर्यावर दिसून येते.
नस्य : चेहर्याचे सौंदर्य वाढवते. शिरोरोगावर उपयुक्त.
विरेचन : शरीरातील उष्णता कमी करून रक्त शुद्ध करण्यासाठी, विकृत पित्त कमी करून रक्ताला शुद्ध करते.
वमन : त्वचेखाली साचलेले विषारी पदार्थ (मल) बाहेर टाकून त्वचेला खोलवर स्वच्छ करते. त्वचेतील अतिरिक्त तेल आणि मुरुमे कमी करण्यासाठी वमन मदत करते. लेद/कफ कमी करण्यास मदत करते.
उद्वर्तन : हे एक उत्तम नैसर्गिक ‘एक्सफोलिएंट’ आहे, जे मृत त्वचा काढून टाकते, त्वचा नितळ करते आणि त्वचेचा पोत सुधारते.
रक्तमोक्षण : शरीरातील दूषित रक्त बाहेर काढून हे त्वचेच्या आजारांचे मूळ कारण नष्ट करते. रक्तातील पित्त दोष कमी करून त्वचेची जळजळ, लालसरपणा आणि खाज त्वरित कमी करते.
- डॉ. स्नेहा बोरुटकर-वांढरे
(लेखिका बीएएमएस, एमडी
(Ayurvedi cosmetology trichology) असून त्यांचे स्नेह स्पर्श स्किन अॅण्ड हेअर लिनिक ब्रह्मांड, ठाणे (पश्चिम) येथे आहे.)