Zero civic sense : सहलीला जाणाऱ्या विद्यार्थ्यांनी केली एसी कोच अशी अवस्था!

    16-Mar-2026   
Total Views |

AC coach garbage viral video in Indian Railways
 
नवी दिल्ली : रेल्वे प्रवासात होणाऱ्या अस्वच्छतेच्या त्रासाबद्दलचा आणखी एक प्रकार उघडकीस आला आहे. शिमला मनालीला सहलीला जाणाऱ्या दहावीच्या विद्यार्थ्यांनी एसी कोचमध्ये प्रचंड कचरा केल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे. ही रेल्वे नेमकी कोणती याबद्दल, अद्याप माहिती या व्हिडिओतून कळवलेली नाही. मात्र, व्हिडिओ पोस्ट करणाऱ्या व्यक्तीने यात घडलेल्या प्रसंगाची माहिती दिली आहे.
 
दहावीच्या विद्यार्थ्यांची सहल शिमला-मनाली येथे जात होती, जेव्हा प्रवासी उतरत होते त्यावेळेस मुलांनी केलेली अस्वच्छता प्रवाशांच्या लक्षात आली. याबद्दल मुलांना हटकले असता, त्यांनीच उलट उत्तरे देण्यास सुरुवात केली. “ही तर देशाची संपत्ती आहे, तुमची नाही. रेल्वे सार्वजनिक मालमत्ता आहे, तुमची खासगी नाही. आम्ही काहीही करू,” अशा शब्दात विद्यार्थ्यांनी इतर प्रवाशांना सुनावले. इन्स्टाग्रामवर सध्या झिरो सिव्हीक सेन्सचा ट्रेंड सुरू आहे. ज्यात अशा घटनांकडे तिरकसरित्या बोट दाखवले जात आहे. मात्र, या विद्यार्थ्यांच्या कारनाम्यामुळे राष्ट्रीय संपत्तीचे नुकसान होत असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे.
 
गेल्या काही वर्षांपासून स्वच्छता, तंत्रज्ञान आणि प्रगतीच्या बाबतीत कात टाकत आहे. येत्या काळात फर्स्ट क्लास प्रमाणेच भारतीय रेल्वेतील जनरल डब्यांचीही स्वच्छता केली जाणार आहे. सहा महिन्यांत सुमारे ८० लांब पल्ल्याच्या गाड्यांची निवड करुन स्वच्छता उपक्रमाची अंमलबजावणी केली जाणार आहे. प्रत्येक १ ते दीड तासाच्या अंतराने डब्यांची स्वच्छता केली जाईल. शौचालय, कचरा पेट्या आणि केबीनची स्वच्छता सतत केली जाणार असल्याची घोषणाही केंद्रीय रेल्वे मंत्री अश्वीनी वैष्णव यांनी फेब्रुवारी महिन्यात केली होती. पूर्वी सफाईची कामे ही विविध कंपन्यांना दिली जात होती. आता मात्र, एका रेल्वेतील सफाईचे काम एकाच एजन्सीला दिले जाणार असल्याने त्या कंपनीची जबाबदारी आणि कार्यक्षमता वाढणार आहे.

तेजस परब

मुंबई विद्यापीठातून एमएसीजेपर्यंत शिक्षण. वाणिज्य शाखेतून पदवी. सध्या ‘मुंबई तरुण भारत’मध्ये मुख्य उपसंपादक (वेब) म्हणून कार्यरत. पाच वर्षांपासून विविध वृत्तपत्रांमध्ये वार्ताहर व उपसंपादक पदाचा अनुभव. दोन प्रमुख वृत्तपत्रांतील निनावी सुत्रांच्या बातम्यांबद्दल संशोधन. डिजिटल मीडियासाठी लेखन. डिजिटल मार्केटींग विषयाचा अभ्यासक.