Tax Saving Alert : ३१ मार्चपूर्वी पूर्ण करुन घ्या 'ही' कामे! अन्यथा भरावा लागेल कर!

    16-Mar-2026   
Total Views |

income tax
 
Income Tax Saving Alert (What is Section 80C? : यंदाचे आर्थिक वर्ष २०२५-२६ संपण्यास अवघे काही दिवसच उरले आहेत. अशातच ज्यांनी करभरणा करताना ओल्ड टॅक्स रिजीमची निवड केली आहे, त्यांना ३१ मार्चपूर्वी काही महत्वाची आर्थिक पावले उचलावी लागणार आहेत. परिणामी त्यांना गुंतवणूक आणि परतावा करताना काहीसा दिलासा मिळू शकतो. आर्थिक सल्लागारांच्या मते, ऐनवेळी गुंतवणूकीचे मार्ग स्वीकारण्याऐवजी ही आवश्यक कामे लवकर संपवलेली कधीही उत्तम. जर का गुंतवणूक करण्यास दिरंगाई झाली तर पुढील आर्थिक वर्षात संबंधित गुंतवणूक गणली जाईल. त्यामुळे या आर्थिक वर्षात त्याचा फायदा मिळू शकणार नाही.
 
What is Section 80C? 
 
सर्वात महत्वाचे म्हणजे आयकर अधिनियम ८० सी अंतर्गत मिळणारी दीड लाख रुपयांपर्यंतच्या सवलतीचा किती वापर केला हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. कित्येकदा विमा, भविष्य निर्वाह निधी, मुलांचे शैक्षणिक शुल्क आदी गोष्टी पूर्वीपासूनच लागू असतात. त्या सर्व गोष्टी मिळूनही जर दीड लाखांपर्यंतची मर्यादा पूर्ण झालेली नसेल तर अन्य गुंतवणूक पर्यायांचा विचार केला जाऊ शकतो.
 
८० सी अंतर्गत कोणत्या गुंतवणूकीचे पर्याय?
 
८० सी अंतर्गत गुंतवणूकीचे विविध पर्याय उपलब्ध आहेत. ज्यात गुंतवणूक केल्यास मोठी करबचत शक्य आहे. ज्यात प्रोव्हीडन्ट फंड, नॅशनल सेव्हींस सर्टीफिकेट, सुकन्या समृद्धी योजना, सिनिअर सिटीझन सेव्हींग स्कीम, टॅक्स सेव्हींग डिपॉझिट आदी योजनांचा सामावेश आहे. याद्वारे केवळ टॅक्स बचतच होत नाही तर सुरक्षित गुंतवणूक म्हणूनही पर्याय उपलब्ध होतात.
 
ईएलएसएसचा पर्यायही उपलब्ध
 
ईक्विटी लिंक्ड सेव्हिंग स्कीम हा म्युच्युअल फंडाद्वारे कर बचतीचा एक लोकप्रिय पर्यायही उपलब्ध होऊ शकतो. या योजनेची विशेष गोष्ट म्हणजे लॉक्ड इन पिरिअड हा तीन वर्षांचा होता. इतर योजनांच्या तुलनेत हा पर्याय खूप फायदेशीर आहे. तसेच ऑनलाईन गुंतवणूक करणे शक्य असल्याने शेवटच्या क्षणीही गुंतवणूक करणे शक्य होते. मात्र, बऱ्याच कंपन्यांच्या प्रक्रीयेत दोन ते तीन दिवसांचा कालावधी लागू शकतो, त्यामुळे हा पर्याय निवडायचा असल्यास लवकरात लवकर निवडावा.
 
आरोग्य विमा प्रिमिअम
 
आरोग्य विमा घेतला असेल तर त्याच्या प्रिमिअम भरणा केल्यावरही वजावट मिळू शकते. मात्र, जर ३१ मार्च पूर्वी प्रिमिअम भरला नाही तर ही सवलत मिळू शकणार नाही.
 
बचत योजनांमध्ये रक्कम भरणे आवश्यक
 
काही बचत योजनांमध्ये रक्कम मासिक किंवा वार्षिक हप्त्यामध्ये भरावी लागते. हा भरणा केला नाही तर योजना बंद पडण्याची शक्यता असते. योजना बंद पडली तर मात्र, खाते निष्क्रिय होऊ शकते. त्याचा परिणाम करवजावटीवरही होऊ शकतो.
 
शेवटच्या तारखेपर्यंत वाट पाहू नका!
 
आयकर भरणा करण्यासाठी योग्य वेळेत नियोजन करा, शेवटच्या तारखेची वाट पाहत बसू नका, असा सल्ला गुंतणूक सल्लागार देतात. वार्षिक नियोजन आधीच केले तर अखेरच्या दिवशी होणारी धावपळ टळू शकते, असेही गुंतवणूक सल्लागार सांगतात.


तेजस परब

मुंबई विद्यापीठातून एमएसीजेपर्यंत शिक्षण. वाणिज्य शाखेतून पदवी. सध्या ‘मुंबई तरुण भारत’मध्ये मुख्य उपसंपादक (वेब) म्हणून कार्यरत. पाच वर्षांपासून विविध वृत्तपत्रांमध्ये वार्ताहर व उपसंपादक पदाचा अनुभव. दोन प्रमुख वृत्तपत्रांतील निनावी सुत्रांच्या बातम्यांबद्दल संशोधन. डिजिटल मीडियासाठी लेखन. डिजिटल मार्केटींग विषयाचा अभ्यासक.