गेल्या दशकापासून दरवष पृथ्वीचे सरासरी तापमान वाढत असून येणारे प्रत्येक वर्ष हे मागच्या वर्षाचे रेकोर्ड तोडत आहेत. उन्हाळ्यात उष्ण लहरी, पावसाळ्यात थंड लहरी आणि पावसाळ्यात वादळे, वादळी पाऊस हे दरवषचेच चित्र झाले आहे. या चित्रामुळेच 2026 सालचा उन्हाळा हा सर्वांत उष्ण उन्हाळा होण्याची दाट शक्यता आहे. यावर प्रकाश टाकणारा हा लेख...
2001 सालापासून जगातील काही देशांत आणि भारतात तापमानवाढ, प्रदूषण, जंगलतोड, उद्योग आणि शहरीकरणात प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे हवामानबदल झपाट्याने होत आहे. याचाच परिणाम म्हणून अति पाऊस, अति उन्हाळा आणि हिवाळा वाढत आहे. यातून रोगराई आणि महामारीच्या समस्या वाढणार आहेत. 2026 सालाच्या जानेवारी महिन्याच्या शेवटी आणि मार्च महिन्याच्या सुरुवातीस उष्णता वाढल्याची नोंद करण्यात आली आहे. याला ‘अल निनो’ आणि ‘ला निनो’ची स्थिती कारणीभूत ठरली आहे. फेब्रुवारी 2026 पासून ‘ला निनो’ कमी झाल्यास जुलै महिन्यात तटस्थ स्थिती राहील. परंतु, पुढे मात्र ‘एल निनो’ वर्षाच्या मध्यापासून सुरू होण्याची शक्यता दाट आहे.
हवामानबदल आणि त्याचे धोके यांच्या आकडेवारीनुसार 2026 वर्षात भारताचा क्रमांक जगात या विषयात नववा आहे, तर हवामानबदल इंडेक्स यादीत भारत 23वा आहे. भारतात 1995 ते 2025 पर्यंत हवामानबदलामुळे 450 मोठ्या घटना घडल्या आहेत. भारतात 2001 पासून हवामानबदल दिसणारी स्थिती सुरू झाली, तर 2020 पासून अती हवामानबदलाच्या परिस्थितीस सुरुवात झाली आहे. 2022 हे भारताच्या मागील 50 वर्षांतील सर्वांत उष्ण लहरींचे वर्ष होते. या वर्षात मार्चमध्ये तीन लहरी, एप्रिलमध्ये सात लहरी, मे महिन्यात आठ लहरी, तर जूनमध्ये पाच उष्ण लहरी आल्या होत्या. मुंबई, पुणे येथे तापमान वाढण्याची शक्यता नसतानादेखील इथे मागील दशकापासून तापमान वाढले आहे. पुढील दशकात यात वाढ होणार होणार असून सर्वाधिक तापमान विदर्भातून नोंदविण्यात येईल.
जागतिक तापमानवाढ ही 2025 - 2029 काळात 1.2 ते 1.9 अंश सेल्सिअसने वाढणार आहे. प्रदूषणात पृथ्वीचे कर्ब वायू हे अति जास्त म्हणजे 427-429 इतके वाढतील, जे उद्योग पूर्व काळाच्या 50 टक्क्यांनी वाढले आहेत. महाराष्ट्रातील जुने आणि नवे तापमान पाहता पुणे 41.8 अंश सेल्सिअस, मुंबईचे तापमान 41 अंश सेल्सिअस, नागपूर 46 ते 48 अंश सेल्सिअस आणि चंद्रपूर 49, तर यवतमाळसुद्धा 46.6 अंश सेल्सिअस असेल. महाराष्ट्रात मुंबई, पुणे, नागपूर, चंद्रपूर येथे गेल्या दशकापासून अतिपावसाचे प्रमाण वाढले आहे. पुढील दशकात हे पुन्हा वाढणार आहे. त्यात इतरही शहरे समाविष्ट होत आहेत. गेल्या दशकात देशात आणि विशेषता महाराष्ट्रात थंड लहरी अपेक्षित नसतानासुद्धा थंडीच्या लाटेत वाढ होत आहे. 2025-26 हेसुद्धा सर्वाधिक थंड हिवाळा वर्ष ठरले. भविष्यात ही थंड लहरीत वाढ होण्याची शक्यता आहे. तापमान हे हवामानबदलाचे मुख्य कारण आहे.
हवामानबदलाला काय काय कारणे आहेत, हे निरीक्षण केल्यास मानवी कृती कारणीभूत असल्याचे माझे मत आहे. आज जगभर शहरीकरणाची आणि औद्योगिकीकरणाची प्रक्रिया झपाट्याने वाढत आहे. यामुळे जमिनीचे तापमान झपाट्याने वाढत आहे. यात भर म्हणजे उद्योग आणि वाहनामुळे कर्बवायूचे प्रदूषणसुद्धा मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. या प्रक्रियेतून पृथ्वीचे स्थानिक आणि वैश्विक तापमान वाढत आहे. पूवचे 15 अंश सेल्शियसचे तापमान आज 16 अंश सेल्शियसच्या पार जात आहे, तर सरासरी तापमानवाढ ही 1.5 अंश सेल्शियस झाली आहे. सर्व जागतिक तह आणि ‘युनो’ने जाहीर केल्याप्रमाणे सर्व देशांनी ही सरासरी तापमान वाढ 1.5 अंश सेल्शियसपर्यंत रोखायची आहे. आज वातावरणात कर्ब वायूचे प्रमाण 425 ppmच्या वर गेले आहे, तर शहरात वायू गुणवत्ता निर्देशांक 300-400 दरम्यान वाढला आहे. पूव संपूर्ण पृथ्वी हिरवीगार होती. परंतु लोकसंख्या वाढ, औद्योगिकीकरण, प्रदूषण आणि शहरीकरणामुळे जगातील जमिनीचा वापर बदलला आहे. त्यामुळे पृथ्वीचे प्रदूषण वाढू लागले आणि
हवामानबदलाच्या घटना घडू लागल्या आहेत. जगातील सर्व देशांनी कर्बवायू आणि इतर प्रदूषित वायूंचे उत्सर्जन त्वरित थांबविले पाहिजे, वृक्षांचे आच्छादन वाढले पाहिजे, जंगले आणि वन्यजीव वाढले पाहिजे. मानवाच्या विकासासोबत निसर्गाचासुद्धा विकास झाला पाहिजे, तरच सृष्टी आणि सजीव वाचू शकेल.
तापमानवाढ अशी असेल
2030 पर्यंत एक अंश सेल्सिअसने असेच प्रदूषण राहिले, तर 2030-2050 या कालावधीत दोन अंश सेल्सिअसने तापमानवाढ होईल. महाराष्ट्रातील उन्हाळ्यात 0.25 ते 0.42 अंश सेल्सिअसने वाढ होईल, तर हिवाळ्यात 0.3 ते 0.55 अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता आहे. या अंदाजानुसार उत्तर महाराष्ट्र व विदर्भात तापमानवाढ जास्त होईल. उत्तर आणि दक्षिण महाराष्ट्रात हिवाळ्याचे तापमान मात्र कमी होईल. महाराष्ट्रातील एकपेक्षा अधिक अंश सेल्सिअसने तापमानवाढीच्या जिल्ह्यांमध्ये भंडारा-2.0, अकोला-1.3, अमरावती-1.6, छत्रपती संभाजीनगर-1.1, बीड-1.2, बुलढाणा-1.4, धुळे-1.1, गोंदिया-1.1, हिंगोली-1.2, जळगाव-1.3, लातूर-1.4,नागपूर-1.1, नंदुरबार-1.6, धाराशिव-1.4, वर्धा-1.1, वाशीम-1.2, यवतमाळ-1.1 यांचा समावेश असेल, तर सर्वांत कमी तापमानवाढीच्या जिल्ह्यात गडचिरोली, कोल्हापूर, मुंबई, पालघर, रायगड, रत्नागिरी, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूर, ठाणे जिल्ह्याचा समावेश असेल. महाराष्ट्रातील सर्वाधिक तापमान असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात मात्र (0.8) तापमानवाढ आणि उष्ण लहरी कमी होणार असल्याचे म्हटले आहे. प्रदूषण असेच वाढत राहिले, तर 2050 पर्यंत सर्वाधिक तापमानवाढ हा अकोला-2.5, अमरावती-2.9, छत्रपती संभाजीनगर. 2.9, भंडारा-2.6, बुलढाणा-2.3, धुळे-2.2 ,गोंदिया-2.1, हिंगोली-2.2, जळगाव-2.5, जालना-2.7, नागपूर-2.2, नंदुरबार-2.5, नाशिक-2.4, वर्धा-2.1, वाशीम-2.3 अंश सेल्सिअसने वाढेल, असा इशारा देण्यात आला आहे.
- प्रा. सुरेश चोपणे
(लेखक हवामान अभ्यासक आहेत.)