मुंबई : राष्ट्र सेविका समितिच्या वरिष्ठ प्रचारिका आणि माजी सह-सरकार्यवाहिका रेखा राजे (रेखा ताई) यांचे रविवार, दि. १५ मार्च रोजी एम्स दिल्ली येथे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर सोमवारी भैरव घाट, कानपूर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. काश्मीरमध्ये हिंदूंवर झालेल्या हत्याकांडाच्या काळात त्यांनी अनेक मुलींचे रक्षण केले. तसेच तथाकथित ‘लव्ह जिहाद’च्या जाळ्यात अडकलेल्या अनेक हिंदू मुलींना परत आणण्यातही रेखा ताईंचे मोठे योगदान होते.
रेखा ताईंचे प्रारंभिक शिक्षण पुण्यात झाले. त्यानंतर त्यांनी कानपूर विद्यापीठ येथून समाजशास्त्र विषयात एम.ए. तसेच शिक्षणशास्त्रात बी.एड. ही पदवी प्राप्त केली. आपत्कालीन काळात त्यांनी कानपूर येथे सत्याग्रह करून महिला आंदोलनाचे नेतृत्व केले. अशोक सिंघल आणि सिंधुताई फाटक यांच्या प्रेरणेने रेखाताई राष्ट्र सेविका समितीच्या पूर्णकालीन प्रचारिका बनल्या आणि आयुष्यभर अविवाहित राहून देशसेवेचे व्रत त्यांनी स्वीकारले.
रेखा ताई यांनी दिल्ली प्रांत प्रचारिका, उत्तर क्षेत्र प्रचारिका, अखिल भारतीय प्रचारिका प्रमुख अशा विविध जबाबदाऱ्या समर्थपणे पार पाडल्या. अनेक वर्षे जालंधरला केंद्र मानून त्यांनी संपूर्ण उत्तर भारतात समितीचे कार्य विस्तारले.
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक