कोकणच्या फुलराणीला वाचवण्यासाठी करा मतदान; कोकण दिपकाडीसाठी आंतरराष्ट्रीय निवडणूक
16-Mar-2026
Total Views |
मुंबई (विशेष प्रतिनिधी) - संयुक्त राष्ट्र संघामध्ये सल्लागाराच्या भूमिकेत असणाऱ्या 'इंटरनॅशनल युनियन फॉर कॉन्झर्वेशन ऑफ नेचर'ने (आययूसीएन) कोकणात फुलणाऱ्या संकटगस्त कोकण दिपकाडी या वनस्पतीच्या प्रजातीला 'अप-राॅअर कॉन्झर्वेशन चॅलेंज' या स्पर्धेत नामांकित केले आहे (konkan dipcadi). या स्पर्धेत विजेत्या ठरणाऱ्या प्रजातीच्या संवर्धनासाठी विशिष्ट निधी देण्यात येणार आहे (konkan dipcadi). त्यामुळे कोकणातील सड्यांवर पावसाळ्यात फुलणाऱ्या या संकटग्रस्त कोकण दिपकाडी प्रजातीला मत देण्याचे आवाहन वनस्पती संशोधकांनी केले असून मतदान १६ ते १८ मार्च या दोन दिवसात आॅनलाईन पद्धतीने पार पडणार आहे. (konkan dipcadi)
'दिपकाडी कोंकणेन्स' या शास्त्रीय नावाने ओळखली जाणारी ही प्रजात केवळ पावसाळी हंगामात बहरते. 'एकदांडी', 'गौरीची फुलं' किंवा 'ढोकाची फुलं' अशा स्थानिक नावांनी ही प्रजात ओळखली जाते. 'आययूसीएन'च्या 'वेस्टर्न घाट प्लांट स्पेशालिस्ट गुप्र'च्या माध्यमातून या प्रजातीचे मूल्यांकन करुन तिला संकटग्रस्त प्रजातीचा दर्जा देण्यात आला होता. अशा संकटग्रस्त प्रजातींच्या संवर्धनाकरिता निधी उपलब्ध करुन देण्यासाठी 'आययूसीएन' मार्फत 'अप-राॅअर कॉन्झर्वेशन चॅलेंज' ही स्पर्धा आयोजित केली जाते. या स्पर्धेच्या माध्यमातून पाच टप्प्यांमध्ये मतदान घेतले जाते. या स्पर्धेच्या वनस्पती गटामध्ये पहिल्या टप्प्याच्या मतदानाकरिता १३ संकटग्रस्त वनस्पतींची नोंद करण्यात आली आहे. ज्यामध्ये कोकण दिपकाडीचा देखील समावेश आहे. या स्पर्धेत जर कोकण दिपकाडी जिंकल्यास 'वेस्टर्न घाट प्लांट स्पेशालिस्ट गुप्र'ला या प्रजातीच्या संवर्धनासाठी निधी मिळेल. ज्याद्वारे कोकणात ते या प्रजातीवर काम करु शकतील.
पहिल्या टप्प्याचे मतदान हे १६ ते १८ मार्च दरम्यान आॅनलाईन पद्धतीने होणार आहे. https://uproar.indianapoliszoo.com/ या संकेतस्थळावर जाऊन तुम्ही मतदान करु शकता. कोकणात अतिशय तुरळक ठिकाणी, मात्र संख्येने भरपूर प्रमाणात वाढणाऱ्या या वनस्पतीचा बहर अंदाजे ३० ठिकाणांवर नोंदवण्यात आला आहे. या प्रजातीच्या मूळ अधिवासाचा विस्तार हा उत्तरेकडे देवरुखपासून दक्षिणेकडे गोव्यातील मोपाच्या सड्यापर्यंत आहे. प्रामुख्याने रत्नागिरी, राजापूर, देवगड ते वेंगुर्ला तालुक्यापर्यंत पसरलेल्या किनारी सड्यांवर ही वनस्पती फुलते. त्यामुळे ती महाराष्ट्र आणि गोवा या दोन राज्यांपुरता प्रदेशनिष्ठ आहे. या प्रदेशनिष्ठतेमुळेच 'आययूसीएन'च्या लाल यादीत या प्रजातीला 'संकटग्रस्त' प्रजातींच्या यादीत स्थान देण्यात आले आहे.