“शिवछत्रपतींच्या राज्याभिषेकावेळी...पायाच्या अंगठ्याने..!”, जितेंद्र आव्हाडांचं भर सभागृहात संतापजनक विधान

मंत्री नितेश राणे, दादा भुसे, शंभुराजे देसाईंसह भाजप आमदार आक्रमक

    16-Mar-2026
Total Views |

Jitendra awhad speech in vidhansabha against the chhatrapati shivaji maharaj
 
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यभिषेकाचा दाखला देताना जितेंद्र आव्हाडांची जीभ घसरली. महाराजांबद्दल वक्तव्य करत असताना जितेंद्र आव्हाड जे काही बरळले, त्यावरुन राज्यभरात संताप व्यक्त करण्यात येत आहे. सभागृहात सर्वात आधी मंत्री शंभूराजे देसाईंनी आव्हाडांना खडसावले. महाराजांबद्दल नको ते वक्तव्य करुन भावना भडकविण्याचे काम आव्हाड करित आहेत, त्यांना तातडीने माफी मागायला लावा, अशी मागणी मंत्र्यांनी केली.
 
जितेंद्र आव्हाडांना घडल्या प्रकारावर माफी मागायला लावण्यासाठी भाजप आणि शिवसेनेच्या आमदारांनी आक्रमक पवित्रा घेतला. जितेंद्र आव्हाडांनी या सर्व गोष्टी गांभीर्याने न घेता दोन शब्दांत दिलगिरी व्यक्त करतो, असं म्हटलं. मात्र, यावेळी आव्हाडांनी ना महाराजांचं नाव घेतलं, ना आदरपूर्वक माफी मागितली. या संपूर्ण प्रकरणावेळी आव्हाडांच्या मदतीसाठी धावून आले ते भिवंडीतील सपा आमदार रईस शेख आणि काँग्रेसचे मालवणीचे आमदार असलम शेख. आव्हाडांना विरोध करत भाजप आमदारांनी गदारोळ घातला. यामुळे अध्यक्षांना सभागृह काही काळासाठी तहकूब करावे लागले.
 
आव्हाड पुन्हा सभागृहात आल्यानंतर त्यांनी माफी मागण्यास सुरुवात केली. मात्र, त्यांच्या वक्तव्यात नव्याने कुठलीही सुधारणा दिसली नाही. हातवारे करत, मोबाईल हाताळत आव्हाडांनी दिलगीरी व्यक्त करण्याचा प्रयत्न केला. अखेर विधानसभा अध्यक्षांना या प्रकरणात आव्हाडांनी माफी मागवी म्हणून निर्देश द्यावे लागले. आव्हाडांनी दोन शब्दांत पुन्हा दिलगिरी व्यक्त केली. मात्र, यावेळी मंत्री दादाभूसेंनी आव्हाडांच्या निलंबनाची मागणी केली. एका विशिष्ट समाजाच्या मतांसाठी त्यांच्या लांगूलचालनासाठी भूमिका घ्यायच्यात तर त्यांना लखलाभ मात्र, जर का जितेंद्र आव्हाड महाराजांबद्दल अपशब्द बोलणार असतील त्यांचे निलंबन करावे, अशी मागणी त्यांनी केली.
 
या प्रकारानंतर भाजप मंत्री नितेश राणेही आक्रमक झाले. महाराजांबद्दल अवमानकारक वक्तव्य करणाऱ्या जितेंद्र आव्हाडांना आपल्या कुठल्याही वक्तव्याचा पश्चाताप नाही. उपकार केल्याची भाषा त्यांच्या दिलगिरीत दिसून येते. जाणून बुजून महाराजांबद्दल अशी वक्तव्ये केली तर खपवून घेणार नाही, असा इशारा आव्हाडांना त्यांनी दिला. महाराष्ट्राच्या सभागृहात, अशी वक्तव्ये करणार असतील तर त्यांना निलंबित करा, अशी मागणी त्यांनी केली. आमदार योगेश सागर यांनीही आव्हाडांविरोधात आसूड ओढले. जितेंद्र आव्हाडांना विधानसभा अध्यक्षांनी सक्त ताकीद दिली. पुन्हा जर का कुठल्याही महापुरुषांबद्दल, अशी वक्तव्ये करणार असाल तर तुम्हाला नियमानुसार, निलंबित केले जाईल, असा इशाराच त्यांनी दिला. आव्हाडांनी माफी मागितल्यानंतर कामकाज पुन्हा सुरू झाले.