कासवांमुळे रत्नागिरीच्या किनाऱ्यावरील बंधाऱ्याच्या नव्या कामांना स्थगिती; दै. 'मुंबई तरुण भारत'च्या वृत्ताची दखल

    16-Mar-2026
Total Views |
 turtle nesting
 
 
 
मुंबई (विशेष प्रतिनिधी) - दै. 'मुंबई तरुण भारत'ने प्रसिद्ध केलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातील किनाऱ्यांवर अनियोजित पद्धतीने होणाऱ्या बंधाऱ्याच्या कामांमुळे सागरी कासवे अंडी न घालताच परतण्याच्या वृत्ताची दखल 'महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणा'ने (एमसीझेडएमए) घेतली आहे (turtle nesting). या वृत्ताची दखल घेऊन त्यांनी बांधऱ्यांचे बांधकाम करणाऱ्या 'सार्वजनिक बांधकाम विभागा'ला 'कांदळवन कक्षा'कडून ना-हरकत घेण्यास सांगितले आहे (turtle nesting). 'कांदळवन कक्षा'ने देखील या वृत्ताची दखल घेऊन चौकशी समितीच्या माध्यमातून तपासणी झाल्यावर कासवांच्या विणीवर बंधाऱ्याच्या बांधकामाचा विपरीत परिणाम पडत असल्याचा अहवाल 'एमसीझेडएमए'ला पाठवला होता. (turtle nesting)
 
 
रत्नागिरी जिल्ह्यातील भाट्ये, नेवरे, आडे यांसारख्या किनाऱ्यावर सुरू असणाऱ्या धूप प्रतिबंधक बंधाऱ्याच्या कामामुळे सागरी कासवे अंडी न घालताच परत जात होती. यासंबंधीचे वृत्त दै. 'मुंबई तरुण भारत'ने ३ आणि ९ फेब्रुवारी रोजी प्रकाशित केले होते. याची दखल घेत 'कांदळवन कक्षा'ने 'कांदळवन प्रतिष्ठान'मधील तज्ज्ञांची तीन सदस्यीय समिती स्थापित केली. या समितीने भाट्ये, नेवरे, आडे यांसारख्या किनाऱ्यांवर भेट देऊन पाहणी केली. पाहणीअंती या बांधकामामुळे कासव विणीला धक्का पोहोचल्याचे त्यांनी निर्देशीत केले. त्यानंतर काही दिवसांसाठी बंधाऱ्याच्या बांधकाम थांबविण्यात आले. आडे किनाऱ्यावरील बांधकाम थांबवून किनाऱ्यावर अत्यावस्थ पडलेले बांधकामातील मोठे खडक काढण्यात आले. त्यानंतर तिथे सागरी कासवांच्या माद्यांनी अंडी घालण्यास सुरुवात केली. 'कांदळवन कक्षा'ने 'एमसीझेडएमए'ला पत्र लिहून ही परिस्थिती विषद करुन किनाऱ्यावरील अशा बांधकामांना परवानगी देण्यापूर्वी कक्षाची ना-हरकत मिळवण्यासंदर्भात सूचना दिली.
 
 
'एमसीझेडएमए'ने देखील या सूचनेचे पालन करुन 'सार्वजनिक बांधकाम विभागा'सोबत 'महाराष्ट्र मेरिटाईम विभागा'ला देखील किनाऱ्यावरील बांधकामाकरिता परवानगी मागण्यापूर्वी कासव संवर्धनाच्या दृष्टीने 'कांदळवन कक्षा'ची ना-हरकत मिळवण्यासंदर्भात सूचित केले आहे. २० फेब्रुवारी रोजी पार पडलेल्या 'एमसीझेडएम'च्या १९४ व्या बैठकीच्या इतिवृत्तातून ही माहिती समोर आली आहे. या बैठकीमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाने गणपतीपुळे, माखजन खाडी, राजीवाडा खाडी आणि भाट्ये येथे संरक्षण भिंत बांधण्यासाठी परवानगी मागितली होती. यावर दै. 'मुंबई तरुण भारत'ने प्रसिद्ध केलेल्या वृत्ताची दखल घेत सर्वप्रथम 'कांदळवन कक्षा'ची ना-हरकत आणल्यानंतर परवानगी मागावी, अशी भूमिका 'एमसीझेडएमए'ने घेतली आहे.
 
 
कांदळवन कक्षाकडे प्रस्ताव
'एमसीझेडएमए'ने सूचित केल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) यांना पत्र लिहून संरक्षण भितींच्या बांधकामासाठी परवानगी मागितली. प्रधान मुख्य वनसंक्षकांनी ही बाब 'कांदळवन कक्षा'कडे वळती केली. कक्षाने बांधकाम विभागाला संरक्षण भिंतीचे किनाऱ्यावरील स्थान, त्याचा आकार, बांधकामाचे स्वरुप याची माहिती विचारली असून बांधकाम विभागाने ती माहिती कक्षाला दिलेली नाही.