धवललक्ष्मी पूर्णपणे झाली बरी; समुद्रात १५० मी खोल डुबकी मारत 'या' आजारातून झाली मुक्त

    16-Mar-2026
Total Views |
dahanu dhavallaxmi turtle

मुंबई (विशेष प्रतिनिधी) - उपचाराअंती पाठीवर सॅटलाईट टॅग लावून डहाणू समुद्रकिनाऱ्यावरुन सोडलेल्या धवललक्ष्मी नामक कासवाने गेल्या चार महिन्यांमध्ये २ हजार १०० किलोमीटरपेक्षा अधिकचा प्रवास केला आहे (dahanu dhavallaxmi turtle). यापूर्वी ओमानच्या समुद्रात पोहोचलेली धवललक्ष्मी पुन्हा भारताच्या दिशेने निघाल्याचे दिसून आले आहे (dahanu dhavallaxmi turtle). तसेच सॅटलाईट टॅगने पुरवलेल्या माहितीनुसार तिने समुद्रात १५० खोलीपर्यंत डुबकी मारल्याने ती पूर्णपणे सुदृढ झाल्याचे समजले आहे (dahanu dhavallaxmi turtle). जखमी अवस्थेत बचाव करुन त्यानंतर उपचार करुन सॅटलाईट टॅग लावून सोडलेली धवललक्ष्मी ही भारतामधील पहिलीच कासव आहे. (dahanu dhavallaxmi turtle)
 
 
२०२५ सालच्या पावसाळ्यात धवललक्ष्मी धाकटी डहाणू किनाऱ्यावर जखमी अवस्थेत वाहून आली होती. त्यावेळी डहाणू वन विभागाने 'डब्लूसीएडब्लूए' या संस्थेच्या मदतीने तिला रेस्क्यू करुन डहाणू येथील सागरी कासव उपचार केंद्रात दाखल केले. याठिकाणी पशुवैद्यक डाॅ. दिनेश विन्हेरकर यांच्या मार्गदर्शनाअंतर्गत धवललक्ष्मीवर तीन महिने उपचार करण्यात आले. धवललक्ष्मीच्या चार परांपैकी तीन परांना इजा झाली होती. तसेच तिच्या फुफ्फुसांमध्ये पाणी शिरल्याने तिला पोहण्यासंबंधीचा फ्लोटिंग सिन्ड्रोम हा आजार झाला होता. या आजारात सागरी कासवांना खोल समुद्रात बुडी मारता येत नाही. या सर्व आजारांवर विन्हेरकर यांनी वेगवेगळ्या उपचार पद्धती वापरुन उपचार केले. उपचारानंतर चार वेळा तिची पोहण्याची चाचणी घेण्यात आली. यात ती उत्तमरित्या पोहत असल्याचे लक्षात आल्यावर तिला सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर २० नोव्हेंबर, २०२५ रोजी 'कांदळवन कक्षा'ने 'भारतीय वन्यजीव संस्थान'च्या (डब्लूआयआय) मदतीने धवललक्ष्मीला 'सॅटलाईट टॅग' लावून समुद्रात सोडले होते.
 
 
गेल्या चार महिन्यांमध्ये धवललक्ष्मीने २ हजार १०० किमी प्रवास पूर्ण केला आहे. यापूर्वी ती ओमानच्या समुद्रात पोहोचली होती. मात्र, त्यानंतर ती भारताच्या दिशेने पुन्हा वळाली असून सध्या ती अरबी समुद्राच्या मध्यभागी आहे. भारत, ओमान आणि पाकिस्तानच्या किनाऱ्यापासून ती सुमारे ५०० ते ६०० किलोमीटर अंतरावर आहे. महत्त्वाचे म्हणजे जखमी अवस्थेत बचाव करुन त्यानंतर उपचार करुन सॅटलाईट टॅग लावून सोडलेली धवललक्ष्मी ही भारतामधील पहिलीच कासव आहे. अशा परिस्थितीत सॅटलाईट टॅगने पुरवलेल्या माहितीनुसार तिने समुद्रात १५० मीटर खोलीवर डुबकी मारली आहे. याचा अर्थ तिच्यावर केलेल्या उपाचारातून ती पुर्णपणे सृदृढ झाली असून फ्लोटिंग सिन्ड्रोम नावाचा आजारातून देखील तिची मुक्तता झाली आहे.