बँक्सीच्या शोधात

    16-Mar-2026   
Total Views |

पत्रकारिता या पेशातील आद्यकर्तव्य म्हणजे शोध घेणे. या शोधप्रक्रियेतूनच सातत्याने जगातील वर्तमानाच्या असंख्य छटा आपल्यासमोर येतात. सतत कुठल्यातरी गोष्टीचा शोध घेणं, भ्रमंती करणं, यातूनच असंख्य कथांचा जन्म झाला. आपल्या एकूण समाजमनाचा धांडोळा घेण्यासाठी, वर्तमानाचा, इतिहासाचा, अन्वयार्थ लावण्यासाठी पत्रकारांनी जंग जंग पछाडल्यानंतरच सत्य उजेडात आले. एका वृत्तसंस्थेच्या अशाच एका वृत्ताने, कलाविश्वात खळबळ उडवून दिली आहे.

पाश्चिमात्य देशांमध्ये दृश्य कलेचे अनेकविध प्रकार आपल्याला अनुभवायला मिळतात. चित्रकला, शिल्पकला आदी कलांपर्यंतच ते मर्यादित राहात नाहीत, तर त्यांचे प्रतिरूप वेगवेगळ्या अंगांनी समाजामध्ये दिसते. उदाहरणार्थ भिंतीवर काढलेल्या चित्रांना ‌‘ग्राफिटी‌’ असं म्हटलं जातं. ‌‘ग्राफिटी‌’ हा शब्द ‌‘ग्राफिटीयो‌’ या मूळ इटालियन शब्दातून तयार झाला, ज्याचा अर्थ ‌‘कोरणे‌’ असा होतो. अमेरिकेतील काही शहरांमध्ये अशा प्रकारची ‌‘ग्राफिटी‌’ दिसते. काही काळानंतर इतर अनेक देशांमध्ये ‌‘ग्राफिटी‌’चा वापर, तरुण कलाकार करू लागले. 1960 आणि 70च्या दशकांमध्ये, फिलाडेल्फियामधील ‌‘कॉर्नब्रेड‌’ नावाच्या तरुणाने आपल्याला आवडणाऱ्या मुलीचे लक्ष वेधून घेण्यासाठी, शहरात सर्वत्र आपले नाव लिहिण्यास सुरुवात केली. न्यूयॉर्कमध्ये राहणाऱ्या एका ग्रीक तरुणाने, कामानिमित्त फिरताना शहराच्या भिंतींवर आणि सबवे ट्रेन्सवर ‌‘Taki 183‌’ असे लिहायला सुरुवात केली. यातूनच स्वतःची ओळख निर्माण करण्याची, एक स्पर्धाच सुरू झाली. कलेचा हा घटक अमेरिकेतील हिपहॉप संस्कृतीचा एक अविभाज्य भाग होता. 1980 नंतर ‌‘स्ट्रीट आर्ट‌’ या संज्ञेखाली, हा प्रकार उत्तरोत्तर लोकप्रिय झाला.

कुठलीही कला स्वतंत्र नसते. प्रत्येक कलाकृतीवर, कलाकारावर तिच्या भोवतालाचा प्रभाव असतोच. म्हणूनच बरेचदा कलेचं रूपांतर हे सामाजिक अभिव्यक्तीमध्येसुद्धा होतं. 1990च्या दशकात इंग्लंडमधील ब्रिस्टल या शहरात, ‌‘ब्रिस्टल ड्रायब्रेडझ क्रू‌’ या भित्तिचित्रकारांच्या समुदायाचा उदय झाला. भिंतींच्या आणि चित्रातून प्रकट होणाऱ्या मजकुराविरोधात विद्रूपीकरणाचा दावा करत, पोलीस प्रशासन या कलाकारांना अटक करीत असे.

बँक्सी हा चित्रकार याच समुदायाचा एक भाग. त्यावेळी तो पारंपरिक पद्धतीने, हाताने स्प्रे पेंटिंग करत असे. मात्र, हे काम वेळकाढू असल्याने पोलीस पकडण्याची भीतीही असे. एकदा पोलिसांपासून वाचण्यासाठी तो एका मालगाडीच्या डब्याखाली लपला होता. तिथे त्याला गाडीच्या डब्यावर स्टेन्सिलने (कापलेल्या साच्यातून) लिहिलेले क्रमांक दिसले. तिथूनच त्याला वेगाने चित्र काढण्याची कल्पना सूचली. त्याने तसेच साचे तयार करण्यास सुरुवातही केली. 2000च्या दशकात त्याने लंडन आणि त्यानंतर जगभरातील भिंतींवर, आपली कलाकृती रेखाटण्यास सुरुवात केली. बँक्सीच्या चित्रांचं वैशिष्ट्य म्हणजे, त्यांनी आपल्या चित्रांच्या माध्यमातून भांडवलशाही व्यवस्थेवर ताशेरे ओढले, युद्धविरोधी संदेश दिला. त्याचबरोबर त्याने अशा ठिकाणी चित्रे काढली, जिथे त्या जागेचा संदर्भच चित्राला अर्थ प्राप्त करून देतो. उदा. एखाद्या जुन्या पडक्या भिंतीचा किंवा नळाचा वापर तो चित्रासाठी करतो. रशिया-युक्रेन युद्ध काळात त्याने, उद्ध्वस्त इमारतींवर चित्रे काढूनही अनेकांचे लक्ष्य वेधून घेतले.

आता बँक्सीची ओळख उजेडात कशी आली, याची कहाणीदेखील रंजक आहे. सप्टेंबर 2000 मध्ये न्यूयॉर्कमध्ये एका जाहिरात फलकाचे विद्रूपीकरण केल्याबद्दल, एका व्यक्तीला अटक झाली. त्या व्यक्तीने स्वतःच्या हस्ताक्षरात ‌‘बँक्सी‌’ असल्याचे कबूलही केले आणि कागदपत्रांवर रॉबिन गनिंगहॅम अशी स्वाक्षरी केली. त्याने आपलं नाव बदलून डेव्हिड जोन्स असेसुद्धा केले. सार्वजनिक दस्तऐवज, डिजिटल आणि ट्रॅव्हल रेकॉर्ड्सचा मागोवा घेत, एका वृत्तसंस्थेने सत्य समोर आणल्याचा दावा केला आहे. बँक्सीची ही अनामिक ओळख अनेकांना आवडत होती. त्याच्या राजकीय विचारांबाबत अनेकांची मतभिन्नता असू शकते मात्र, कलाव्यवहारात त्याने स्वतःची एक वेगळी भूमिका मांडली. कलेच्या व्यवहारातील परिघाचा विस्तार कशा पद्धतीने होऊ शकतो, याबद्दलचा स्वतंत्र विचार त्याने मांडला. समाजाच्या अभिव्यक्तीचे हेच वेगळेपण सामाजिक जाणिवांच्या कक्षा रुंदावत असते, हे विसरून चालणार नाही.

मुकुल आव्हाड

मुंबईच्या डी.जी. रुपारेल महाविद्यालयातून इतिहास आणि राज्यशास्त्र विषयात पदवी प्राप्त.
राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण. आकाशवाणीच्या युवा वाणी साठी विविध विषयांवर कार्यक्रम सादर केले.वाचनाची आवड. कथाकथन, काव्य वाचन,कथा लेखन यात विशेष रुची तसेच पुरस्कार प्राप्त. महाविद्यालयात असताना, नाटकात काम केले त्याच सोबत नाट्यलेखनाचा अनुभव.