Asiatic Society : एशियाटिकच्या निवडणूकीत कोण ठरणार 'धुरंधर'? निवडणूकीची उत्कंठा शिगेला

    13-Mar-2026
Total Views |

Asiaticc

मुंबई : (Asiatic Society) मुंबईच्या समाजजीवनातील बहुप्रतिष्ठित संस्था अशी ओळख असलेली एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबईची निवडणूक उद्या दि. १४ मार्च रोजी संपन्न होणार आहे. मागचे अनेक महिने ही निवडणूक चर्चेच्या आणि वादाच्या भोवऱ्यात सापडली होती. अशातच आता, या निवडणूकीत नेमकं काय होणार? याकडे सगळ्यांचेच लक्ष्य लागले आहे. राज्यसभेचे माजी खासदार डॉ. विनय सहस्त्रबुद्धे यांच्या नेतृत्वातील एशियाटि टुमारो या गटाचे १९ उमेदवार या निवडणूक उतरले आहे. दुसऱ्या बाजूला ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांच्या गटातील १३ उमेदवार यावेळी रिंगणात असून, अपक्ष गटातून ७ उमेदवार निवडणूकीत सामील झाल्यामुळे या तिरंगी लढाईत कोण बाजी मारणार याकडे सगळ्यांचेच लक्ष्य लागले आहे.

मागचे अनेक दिवस समाजमाध्यांमधून एशियाटिक साठी विविध गटांनी प्रचार प्रसार सुरु केला होता. एशियाटिक टुमारो या गटाच्या माध्यमातून संस्थेला अधिक अधिक सर्वसमावेशक बनवणे, आर्थिक दायित्वासह संसाधनांची उभारणी करणे, राष्ट्र प्रथम हे तत्तव राबविणे आदी गोष्टींना प्राधान्य देण्यात आले आहे. तर दुसऱ्या बाजूला ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांच्या गटाने ' सेव्ह एशियाटिक' अशी हाक दिली आहे.

काही दिवसांपूर्वी मुंबईच्या प्रेस कल्ब येथील सभागृहात 'एशियाटिक टूमॉरो' या गटाची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. एशियाटिक सोसायटीचे माजी उपाध्यक्ष डॉ. विनय सहस्रबुद्धे, सोसायटीचे सदस्य विवेक गणपुले, नील हेळेकर,वैजयंती चक्रवर्ती आदी मान्यवर या पत्रकार परिषदेत उपस्थित होते. दोन शतकांहून अधिक काळ कार्यरत असलेली एशियाटिक सोसायटी मागच्या काही काळापासून वादाच्या भोवऱ्यात सापडली होती. या सोसायटीच्या व्यवस्थापकीय समितीची मुदत २७ सप्टेंबर २०२५ रोजी संपली होती. ३ ऑक्टोबर २०२५ रोजी प्रसिद्ध झालेल्या सूचनेनुसार, ८ नोव्हेंबर २०२५ रोजी निवडणूक घेण्याचे निश्चित करण्यात आले होते. मात्र, या निवडणूकीदरम्यान सदस्य नोंदणी प्रक्रियेत झालेल्या राजकीय हस्तक्षेपामुळे निवडणूकप्रक्रिया वादाच्या भोवऱ्यात अडकली. चार महिन्यांहून अधिक काळ लोटला तरीही निवडणूकीचा पत्ता नसल्याने अनेक सभासदांनी नाराजी व्यक्त केली होती. आता अखेर व्यस्थापकीय समितीला जाग आल्यानंतर ही निवडणूक १४ मार्च रोजी संपन्न होणार आहे.