नवी दिल्ली : (Fuel Crisis) पश्चिम आशियातील वाढता संघर्ष आणि जगातील सर्वात महत्त्वाचा सागरी मार्ग होर्मुझची सामुद्रधुनी जवळपास बंद झाल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी लोकसभेत महत्त्वाची माहिती दिली. सभागृहात ऊर्जा संकटावर बोलताना "जागतिक ऊर्जा इतिहासामध्ये जगाने कधीही असा काळ पाहिला नाही, मात्र पंतप्रधान मोदींच्या मुत्सद्दी धोरणांमुळे भारताची इंधन पुरवठा पूर्णपणे सुरक्षित आहे," असे त्यांनी ठामपणे सांगितले.(Fuel Crisis)
भारताचा इंधन पुरवठा पूर्णपणे सुरक्षित
हरदीप सिंग पुरी म्हणाले, "आधुनिक ऊर्जा इतिहासात जगाने कधीही असा काळ पाहिला नाही. मात्र मी हे सांगू इच्छितो की, भारताची कच्चे तेल पुरवठ्याची परिस्थिती सुरक्षित आहे. सध्या जे संकट इराण, इस्रायल युद्धामुळे ओढवलं आहे त्याआधी , भारताच्या कच्च्या तेलाच्या आयातीपैकी अंदाजे ४५% होर्मुझच्या सामुद्रधुनीतून येत होते. पंतप्रधान मोदींच्या मुत्सद्दी धोरणांमुळे भारताला त्याच कालावधीत होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जितके कच्चे तेल मिळू शकले असते तितकेच कच्चे तेल मिळाले आहे. त्यामुळे भारताचा इंधन पुरवठा पूर्णपणे सुरक्षित आहे.(Fuel Crisis)
रिफायनरीज १०० टक्के क्षमतेने कार्यरत
"देशातील रिफायनरीज उच्च क्षमतेच्या वापराने कार्यरत आहेत. पेट्रोल, डिझेल, टर्बाइन फ्युएल, केरोसीन, फ्युएल ऑईल यांचा तुटवडा नाही. भारतात येणारे ५५ टक्के कच्चे तेल दुसऱ्या ठिकाणाहून येत होते. आता हे प्रमाण वाढवून आपण ७० टक्के केले आहे. २००६-२००७ मध्ये आपण २७ देशांकडून कच्चे तेल घेत होतो. सध्या आपण ४० देशांकडून कच्चे तेल घेत आहोत. आपल्याकडे ज्या देशांचे पर्याय उपलब्ध आहेत ते इतर देशांकडे नाहीत", असेही पुरी यांनी सांगितले.(Fuel Crisis)
नवीन पुरवठादार देशांशी करार
"भारताने आपल्या इंधन आयातीचे स्त्रोत विस्तारले आहेत. आता भारत केवळ आखाती देशांवर अवलंबून न राहता अमेरिका, नॉर्वे, कॅनडा, अल्जेरिया आणि रशिया यांसारख्या देशांकडून मोठ्या प्रमाणात कच्चे तेल आणि एलएनजी कार्गो घेत आहे. हे कार्गो दररोज भारतीय बंदरांवर दाखल होत आहेत. गेल्या पाच दिवसांत रिफायनरीजना दिलेल्या सूचनांनुसार, एलपीजीचे उत्पादन २८ टक्क्यांनी वाढवण्यात आले आहे. भारतात राहणारे ३३ कोटी कुटुंबं जे गरीब आणि दारिद्य रेषेखालील आहेत त्यांना स्वयंपाकासाठी गॅस सिलिंडर मिळाला पाहिजे ही भारत सरकारची प्राथमिकता आहे" असंही पुरी यांनी स्पष्ट केले.(Fuel Crisis)
पुरवठा साखळी पूर्णपणे सुरळीत
"या परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी तीन मंत्र्यांची समिती स्थापन करण्यात आली आहे. सरकार दीर्घकाळापासून अशा परिस्थितींना तोंड देण्यासाठी पूर्णपणे तयार आहोत. गॅस सिलिंडरबाबत लोकांनी घाबरून जाण्याची गरज नाही. केवळ भीतीपोटी मागणी वाढली आहे, मात्र पुरवठा साखळी पूर्णपणे सुरळीत आहे. तसेच गॅसची काळाबाजारी रोखण्यासाठी कडक निर्देश देण्यात आले आहेत", अशी माहिती पुरी यांनी दिली.(Fuel Crisis)
पर्यायी इंधनांचा वापर
एलपीजीवरील ताण कमी करण्यासाठी काही पर्यायी इंधनांचा वापर सुरू केला आहे. उद्योग आणि हॉटेल, रेस्टॉरंट क्षेत्राला एका महिन्यासाठी बायोमास, आरडीएफ पेलेट्स आणि केरोसीन किंवा कोळसा वापरण्याची परवानगी देण्याचा सल्ला पर्यावरण मंत्रालयाने राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळांना दिला आहे, जेणेकरून घरगुती ग्राहकांसाठी अधिक एलपीजी उपलब्ध होऊ शकेल.(Fuel Crisis)
अफवा किंवा खोट्या बातम्या पसरवण्याची ही वेळ नाही
पुढे बोलताना हरदीप सिंग पुरी म्हणाले, "सध्याचा काळ अफवा किंवा खोट्या बातम्या पसरवण्याचा नाही. देश एका मोठ्या जागतिक ऊर्जा संकटाचा सामना करत आहे. इंधन पुरवठा सुरूच आहे, घरे आणि शेतीसाठी गॅसला प्राधान्य दिले जात आहे आणि एलपीजी उत्पादनात २८% वाढ झाली आहे. भारताने ऊर्जा क्षेत्रात काम करणाऱ्यांसोबत, संकटाचे व्यवस्थापन करणाऱ्या संस्थांसोबत आणि राष्ट्रीय हितासाठी एकजूट दाखवली पाहिजे."(Fuel Crisis)
मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\