मुंबई (विशेष प्रतिनिधी) : उत्तर प्रदेशच्या प्रयागराज येथे झालेल्या महाकुंभ मेळ्यात एका व्हायरल व्हिडिओमुळे चर्चेत आलेली मोनालिसा भोसले पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरलीये. मोनालिसाने तिचा प्रियकर फरमान खान याच्याशी विवाह केल्याचे निदर्शनास आल्याने मोठी खळबळ उडाल्याचे दिसून आले. हा विवाह कुटुंबाच्या इच्छेविरुद्ध झाल्याचे सांगितले जात असून त्यानंतर मोनालिसाने आपल्या कुटुंबीयांपासून अंतर ठेवल्याचेही स्प्ष्ट होतंय. विवाहानंतकर दोघांनी केरळ येथे विवाह करून तेथेच राहण्याची योजना आखली असल्याचेही सांगितले जात आहे.
मध्यप्रदेशच्या खरगोन जिल्हा येथील महेश्वर येथे राहणारी मोनालिसा महाकुंभदरम्यान हातात माळा आणि फुले विकताना कॅमेऱ्यात कैद झाली होती. तिच्या निळसर डोळ्यांमुळे आणि निरागस चेहऱ्यामुळे तिचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आणि ती रातोरात इंटरनेटवर लोकप्रिय झाली. दरम्यान मोनालिसाने केरळमध्ये फरमान खान या मुस्लिम तरुणाशी विवाह केल्याच्या काही छायाचित्रे सोशल मीडियावर समोर आली असून त्यानंतर हा विषय अधिक चर्चेत आला आहे. काही जण या विवाहाला प्रेमविवाह मानत आहेत, तर काही जण या प्रकरणास लव्ह जिहादचा प्रकार म्हणतायत.
मोनालिसाचा पती फरमान हा महाराष्ट्रातील अभिनेता आणि मॉडेल आहे. दोघांची भेट एका चित्रपटाच्या सेटवरही झाली होती. मात्र त्यांच्या संवादाची सुरुवात सुमारे दीड वर्षांपूर्वी फेसबुकवरून झाली. तेथूनच त्यांच्या मैत्रीची सुरुवात झाली आणि हळूहळू ते नाते प्रेमसंबंधात बदलले.
मोनालिसाच्या म्हणण्यानुसार, तिची आणि फरमानची काही महिन्यांपूर्वी ओळख झाली आणि सुमारे सहा महिन्यांतच त्यांचे नाते घट्ट झाले. तिचे कुटुंब गावातील एका तरुणाशी तिचे लग्न लावण्याच्या तयारीत होते; मात्र तिने त्यास नकार दिला आणि स्वतःच्या इच्छेने फरमानसोबत आयुष्य घालवण्याचा निर्णय घेतला. फरमानचे याबाबत म्हणणे आहे की, दोघेही अभिनय क्षेत्राशी संबंधित आहेत आणि एका प्रोजेक्टदरम्यान त्यांची ओळख झाली. त्यानंतर मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. सर्वप्रथम मोनालिसानेच त्याला लग्नासाठी विचारले त्यानंतर दोघांनी विवाह करण्याचा निर्णय घेतला. फरमानच्या मते सध्या दोघांनी केरळमध्येच राहण्याचा निर्णय घेतला आहे आणि परिस्थिती अनुकूल राहिली तर पुढे तेथेच कायमस्वरूपी स्थायिक होण्याचाही विचार करतील.
या सर्व प्रकारावर मोनालिसाच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे की, मोनालिसाला अभिनय शिकवण्याच्या नावाखाली केरळमध्ये बोलावण्यात आले होते; मात्र तेथे अचानक विवाहाची बातमी समोर आली. कुटुंबीयांच्या मते तिला अभिनयाचे प्रशिक्षण देण्यासाठी केरळला बोलावले जात असल्याचे सांगण्यात आले होते. त्यामुळे तिचे वडील तिच्यासोबत तेथे गेले मात्र तेथे अचानक परिस्थिती अशी निर्माण झाली की विवाहाची वेळ आली आणि कुटुंबीयांनाही याची आधी कल्पना नव्हती. या प्रकरणात परिस्थिती इतकी बिघडली की मोनालिसाच्या वडिलांना पोलिस ठाण्यात जावे लागले. त्यांच्या म्हणण्यानुसार, काही लोक अचानक गाडी घेऊन आले आणि त्यांना पोलिस ठाण्यात नेले. तेथे मोनालिसाला विचारण्यात आले की ती वडिलांसोबत परत जाण्यास इच्छुक आहे का? त्यावर तिने तिथेच राहण्याची इच्छा व्यक्त केल्यावर पोलिसांनी वडिलांना काही करता येणार नसल्याचे सांगितले.
ही बंडखोरी नसून लव्ह जिहाद!
मोनालिसाला चित्रपटसृष्टीत संधी देण्याची घोषणा करणारे दिग्दर्शक सनोज मिश्रा यांनी या प्रकरणावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्यांनी फेसबुकवर एक लांब पोस्ट लिहून नाराजी व्यक्त करत, ही बंडखोरी नाही तर लव्ह जिहाद असल्याचे त्यांनी म्हटले.
केरळचीच निवड का?
काही लोक या विवाहाला सोशल मीडिया स्टंट किंवा प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न म्हणत आहेत. तर दुसरीकडे, जोडप्याच्या वैयक्तिक निर्णयाला राजकीय किंवा सांस्कृतिक वादाशी जोडणे योग्य नाही, असेही काहीजण म्हणतायत. या संदर्भात लोक अनेकदा 'द केरला स्टोरी' या चित्रपटाचा उल्लेख करतात, ज्यात 'लव्ह जिहाद'चा मुद्दा दाखवला गेला होता. केरळात स्पेशल मॅरेज ॲक्ट, १९५४ लागू आहे. या कायद्यांतर्गत कोणत्याही धर्माच्या किंवा जातीच्या व्यक्ती, कोणत्याही धार्मिक विधीशिवाय, कोर्ट मॅरेजद्वारे विवाह करू शकतात. त्यामुळे मोनालिसा व फरमानने केरळची निवड केली का? असा प्रश्न सध्या उद्भवतोय.
कम्युनिस्ट नेत्यांच्या उपस्थितीत विवाह संपन्न
हा विवाह तिरुवनंतपुरम जिल्हा येथील एका मंदिरात पार पडला. या सोहळ्यास अनेक प्रमुख राजकीय नेते उपस्थित होते. हा विवाह कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (मार्क्सिस्ट)च्या नेत्यांच्या उपस्थितीत आणि आशीर्वादाने पार पडल्याने या घटनेची मोठी चर्चा सुरू झाली आहे. या समारंभाला व्ही. शिवनकुट्टी, एम. व्ही. गोविंदन, ए. ए. रहीम तसेच पक्षाचे इतर नेते उपस्थित होते. या नेत्यांनी सार्वजनिकपणे या जोडप्याला पाठिंबा दर्शवून हा विवाह सामाजिक सौहार्दाचे उदाहरण असल्याचे म्हटले. समारंभादरम्यान बोलताना एम. व्ही. गोविंदन यांनी हा विवाह धर्माच्या सीमांपलीकडील मानवतेच्या भावनेचे प्रतीक असल्याचे सांगितले. त्यांच्या मते, हा विवाह केरळ राज्य मानवी सन्मान आणि आंतरधर्मीय नातेसंबंधांचा आदर राखते, याचे उदाहरण आहे.
केरळ हे मानवी सौहार्दाचे ठिकाण
राज्यसभेचे खासदार ए. ए. रहीम यांनीही माध्यमांशी बोलताना केरळची ओळख लोकांना त्यांच्या घटनात्मक अधिकारांचा वापर निर्भयपणे करता येणारे राज्य म्हणून असल्याचे सांगितले. “केरळ हे मानवी सौहार्दाचे ठिकाण आहे. कोणत्याही धर्माच्या व्यक्तींना या देशात विवाह करण्याचा अधिकार आहे. हा अधिकार संविधानाने दिला आहे. दुर्दैवाने अनेक ठिकाणी ही स्वातंत्र्य मिळत नाही. भीतीशिवाय असा विवाह होऊ शकणारे भारतातील एकमेव राज्य म्हणजे केरळ आहे. विवाह स्वर्गात ठरतात असे म्हटले जाते; आणि तो स्वर्ग म्हणजे केरळ,” असे रहीम म्हणाले.
वयाच्या मुद्द्यावरून वादंग!
प्रयागराजमध्ये २०२५ दरम्यान झालेल्या महाकुंभ मेळा संदर्भातील काही वृत्तांत मोनालिसाचे वय तेव्हा १६ वर्षे असल्याचे नमूद करण्यात आले होते. 'मोनालिसा भोसले' या नावाच्या फेसबुक पेजवर ५ मार्च हा तिचा वाढदिवस दाखवण्यात आला आहे. विविध माध्यमांच्या अहवालांनुसार मार्च २०२६ पर्यंत तिचे वय १७ वर्षे असल्याची शक्यता व्यक्त केली जाते. भारतीय कायद्यानुसार महिलांसाठी विवाहाचे किमान कायदेशीर वय १८ वर्षे, तर पुरुषांसाठी २१ वर्षे आहे. त्यामुळे तिचे वयाबाबतच्या बातम्या खऱ्या ठरल्यास हा विवाह अल्पवयीन विवाहाच्या कायदेशीर प्रश्नांना सामोरा जाऊ शकतो. या घटनेमुळे सोशल मीडियावर तसेच राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली असून, विवाह कोणत्या परिस्थितीत झाला आणि वयासंबंधी कायदेशीर अटींची योग्य पडताळणी करण्यात आली होती का, याबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत.