सायबर फसवणूकीच्या जनजागृतीसाठी ४३ कोटी रुपयांची तरतूद; गृहराज्यमंत्री योगेश कदम

दरोडे कमी आणि सायबर चोऱ्यांचे प्रमाण अधिक...

    11-Mar-2026   
Total Views |
Yogesh Kadam
 
मुंबई : (Yogesh Kadam) सायबर गुन्ह्यांमध्ये आवश्यक उपाययोजना सरकार करत आहे. पण यासंदर्भात जनजागृती खूप महत्वाची आहे. केंद्र सरकारने कोरोना काळानंतर सायबर गुन्ह्यांसंदर्भात जनजागृती कार्यक्रम राबवला होता. राज्य सरकारसुद्धा अशा जनजागृतीसाठी ४३ कोटी रुपयांच्या वेगळ्या निधीची तरतूद करणार असून याद्वारे दर महिन्याला २१ कोटी मेसेज नागरिकांपर्यंत पोहोचवण्यात येणार असल्याची माहिती गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी विधानसभेत दिली.
 
आ. प्रशांत ठाकूर यांनी सायबर सुरक्षेबाबतचा प्रश्न विचारला होता. आ. बबनराव लोणीकर आणि विकास ठाकरे यांनीही या चर्चेत सहभाग घेतला. यावर उत्तर देताना गृहराज्यमंत्री योगेश कदम म्हणाले की, “ऑनलाईन गेमिंगच्या बाबतीत कायद्याचा कडक आधार नव्हता. पण केंद्र सरकारने नवीन कायदा पारित केल्यानंतर ऑनलाईन गेमिंगमध्ये पैशाचा वापर करण्यावर बंदी घातली आहे. त्याआधारे गुन्हे दाखल करून कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. आपण रोज नवीन तंत्रज्ञान वापरतो आहे. सायबर गुन्ह्यांवर आळा घालण्यासाठी वेगळे सायबर सेल तयार केले आहेत. सायबर गुन्ह्यांवर प्रतिबंध घालण्यासाठीची चांगली संस्था महा पे येथे तयार केली असून त्यासाठी जवळपास साडे नऊशे कोटींचा निधी खर्च केला आहे. तसेच राज्यभरात ५० सायबर पोलिस स्टेशन कार्यान्वित केले असून सायबर गुन्हे रोखण्यासाठी पोलिस कर्मचाऱ्यांना विशेष प्रशिक्षण दिले आहे.”
 
हेही वाचा : India Alliance: '...तरी दोषींना कोणीच वाचवू शकणार नाही': रोहित पवार
 
फसवणूक टाळण्यासाठी 'महा सायबर सेफ' ॲप
 
“तसेच ‘महा सायबर सेफ अ‍ॅप’ असे एक सरकारी अ‍ॅप्लिकेशन तयार करत असून त्यावर सायबर फसवणूक कशा पद्धतीने केली जाते, याची सगळी माहिती उपलब्ध होईल. रोज एका नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून चोर चोरी करतात. याला आळा घालण्यासाठी आवश्यक टूल्स उपलब्ध करून दिले आहेत. डिजिटलायझेशनमुळे आता दरोडे कमी आणि सायबर चोऱ्यांचे प्रमाण वाढते आहे. पण या प्रकरणांना आळा घालण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रात आवश्यक ते सगळे तंत्रज्ञान उपलब्ध केले आहे,” असेही त्यांनी सांगितले.
 
 

अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....