सर्वांची सुषमा

    01-Mar-2026
Total Views |

नाशिक येथे ‌‘शंकराचार्य न्यासा‌’च्या गंगापूरच्या बालाजी मंदिरात सारे कसे सुरळीत चालले होते. रविवारी, दि. 28 डिसेंबर 2025 रोजी सकाळी धुंदुर मासाचा कार्यक्रम असल्याने, सारेच अतिशय आनंदात होते. हा कार्यक्रम पार पडला आणि मग तो काळ ठरणारा सोमवार उजाडला. सव्वाचार वर्षांपूव मूळ नागपूरचे, पण मुले आणि व्यवसायामुळे बंगळुरुला स्थायिक झालेले विवेक देशपांडे आणि सुषमा देशपांडे बालाजी मंदिरात आपली सेवा समर्पण करण्यासाठी आले. ते आले. त्यांनी पाहिले, समजावून घेतले आणि मंदिराच्या दैनंदिन आयामात समरस झाले. खरं तर, स्वतःचे घरदार सोडून इतक्या लांब नाशिकमध्ये येऊन, एखाद्या कामात स्वतःला झोकून देणे किती अवघड असते! पण देशपांडे पती-पत्नीने ते अगदी सहजपणे केले. दररोज शेकडोंनी येणारी भक्तमंडळी, 65 ते 70 गायींची गोशाळा, बालाजी मंदिरातील संध्याकाळची सर्व चहा-नाश्ता भोजनाची व्यवस्था आपलेपणाने सांभाळायला दोघांनीही सुरुवात केली. इतके हे दोघे सर्वांमध्ये मिसळून गेले की, सर्वांशीच त्यांचे आपलेपणाचे नाते दृढ झाले. दैनंदिन कामात सुषमा यांनी एक शिस्त आणली. मंदिरातील प्रत्येक वस्तू आणि व्यक्तीकडे त्यांचे लक्ष असे. खरं तर, हे काम कष्टाचे होते, जिकरीचे होते, पण त्यांनी कधीही त्याचा कंटाळा केला नाही किंवा तक्रारही केली नाही.

दि. 29 डिसेंबर रोजीच्या सकाळी त्या नेहमीप्रमाणे उठल्या नाहीत. बेशुद्ध अवस्थेतच त्यांना श्रीगुरुजी रुग्णालयात अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले. हळूहळू बातमी वाऱ्यासारखी सर्व संबंधितांपर्यंत पसरली. लहानांपासून थोरांपर्यंत आणि विश्वस्तांपासून कर्मचारी वर्गापर्यंत सर्वांनाच खूप हळहळ वाटली. त्या लवकर बऱ्या व्हाव्यात, यासाठी प्रत्येकजण परमेश्वराजवळ, बालाजीजवळ प्रार्थना करीत होता. मंदिरातही दुःखाचे सावट सर्वदूर पसरले होते. रुग्णालयातील सर्व डॉक्टरांनी सुषमा यांना बरे वाटावे म्हणून, खूप प्रयत्न केले. पण दैवगती काही वेगळीच होती. दि. 13 जानेवारीची सकाळ उगवली, ती दुःखाचे आणि नैराश्याचे वातावरण घेऊनच. 14-15 दिवस मृत्यूशी झगडणाऱ्या सुषमा यांची प्राणज्योत मालवली. सर्वांचे दुर्दैव इतके की, दि. 29 डिसेंबरला त्यांनी जे डोळे मिटले होते, ते शेवटपर्यंत उघडलेच नाहीत. एक शब्दही त्या कोणाशी बोलल्या नाहीत, मनातले विचार, याताना त्या सांगू शकल्या नाहीत; याचेच राहून राहून फार वाईट वाटते. आपला सर्व प्राणप्रिय संसार व प्राणप्रिय माणसे यांचा विचार सोडून, एखाद्या परक्या गावात वेगळ्याच कार्याची जबाबदारी पार पाडून सर्वांना आपलेसे करणे, हे खूप अवघड काम सुषमा यांनी लिलया करून दाखवले. प्रसंगी, आपले कलेचे विश्वही बाजूला सारले. ही फार फार मोठी अलिप्तता मनापासून स्वीकारून, सामाजिक कार्यकर्त्यांपुढे एक दुमळ आदर्शाचा वस्तुपाठच सुषमा यांनी घालून दिला. त्यांच्या आकस्मिक आणि अनपेक्षितपणे जगाचा निरोप घेण्याने, मन खूप अंतर्मुख होते. सुषमा यांच्या स्मृतींना शतशः वंदन आणि भावपूर्ण श्रद्धांजली.

- डॉ. निशिगंधा मोगल
9371530100