मराठी शाळांची घटती संख्या आणि पालकांचे दायित्व

    01-Mar-2026
Total Views |

नुकत्याच संपन्न झालेल्या ‌‘मराठी भाषा गौरव दिना‌’च्या पार्श्वभूमीवर, मराठी शाळा बंद होण्याचा ज्वलंत प्रश्न विविध स्तरातून मांडण्यात आला. यासाठी सरकार, प्रशासकीय यंत्रणा यांच्यावरच प्रामुख्याने खापर फोडण्यात आले. मात्र, यासंदर्भात सर्वांत महत्त्वाची भूमिका निभावणाऱ्या पालकांकडे काहीसे दुर्लक्ष झालेले दिसते. कारण, जोवर मराठी माध्यमांच्या शाळांचा आग्रह पालक धरणार नाहीत, त्याचे महत्त्व त्यांना समजणार नाही, तोवर हे चित्र कसे बदलेल? त्यामुळे मराठी शाळांचे महत्त्व, मातृभाषेतून शिक्षणाचे फायदे आणि एकूणच आजच्या पालकांचा याविषयीचा दृष्टिकोन याचा ऊहापोह करणारा हा लेख...

काही दिवसांपूव एका परिचित पालकाशी सहज गप्पा रंगल्या होत्या, त्यात विषय निघाला मुलांच्या शिक्षणाचा. मी विचारलं, “कुठे ॲडमिशन घेतलं?” उत्तर क्षणाचाही विलंब न करता आलं, “इंग्रजी माध्यमात.” आजकाल दुसरा पर्याय आहे का? त्या एका वाक्यानेच माझ्या मनात अस्वस्थतेची रेष उमटली. ‌‘दुसरा पर्याय नाही,‌’ याच नेमका अर्थ काय? मराठी शाळा अस्तित्वात आहेतच की, पण त्या आता फक्त ‌‘पर्याय‌’ म्हणून उरल्या असून, ‌‘पहिली निवड‌’ राहिलेल्या नाहीत. इथेच खरा प्रश्न उभा राहतो. आज मराठी शाळांना लागणारे टाळे हा अपघात नाही, दुर्दैवी योगायोगही नाही, हा जाणीवपूर्वक घेतलेल्या निर्णयांचा परिणाम असून, त्या निर्णयांमध्ये सर्वात मोठा वाटा आहे आपला, मराठी पालकांचा.

आपण काय बोलतो आणि काय करतो? आपण अभिमानाने म्हणतो, मराठी माझी मायबोली. मराठीसाठी मोर्चे काढतो, फलकांवर मराठी हवी म्हणून आंदोलन करतो, भाषणांत मराठीचा गौरव करतो पण, जिथे मराठी भाषा खऱ्या अर्थाने घडते, त्या शाळेकडेच आपण पाठ फिरवतो. हा केवळ विरोधाभास नाही, हा स्वार्थ आहे. आपण भाषेला भावनेत जपतो; व्यवहारात मात्र तिला दुय्यम स्थानच देतो.

मराठी शाळा का ओस पडत चालल्या आहेत? कारण, आपणच त्यांना ओस पाडतो आहोत. आज बहुसंख्य मराठी पालक आपल्या मुलांसाठी इंग्रजी माध्यमाची शाळा निवडतात. यामागची कारणे ठरलेली असतात. इंग्रजी भाषेवरील प्रभुत्व म्हणजे नोकरी, पैसा, प्रतिष्ठा. मग मराठी माध्यम? अगदीच पर्याय नसेल तर बघण्याचा विषय.

पण, हा विचार आपण कधी आणि का स्वीकारला? हा अनुभवातून आलेला निष्कर्ष आहे का? की, समाजाने घातलेली भीती? आज आपण इंग्रजी शाळांसाठी लाखो रुपये मोजतो, फी वाढली तरी गप्प बसतो. पण, मराठी शाळा सुधाराव्यात म्हणून कधी ठामपणे उभे राहिलो आहोत का? मराठी शाळा मागे पडल्या नाहीत; मागे पाडल्या गेल्या पालकांनी, समाजाने आणि व्यवस्थेने.

आज इंग्रजी शाळेत समाधान मिळत; मग मराठीमध्ये शिक्षण अडखळत का? इंग्रजी शाळेत मुलगा तुटक इंग्रजी बोलतो, तरी आपण त्यावर समाधान मानतो. पण, तो मराठीत स्वतःचा विचार मांडूच शकत नाही, याची खंत आपल्याला वाटत नाही.

भाषा म्हणजे फक्त संवादाचे साधन नसून, ती विचारांची माती आहे. ज्या भाषेत मुलाचं बालपण घडतं, ज्या भाषेत तो पहिल्यांदा प्रश्न विचारतो, ती भाषाच त्याच्या बौद्धिक-क्षमतेचा पाया असते. जर मुलाला स्वतःच्या मातृभाषेत सखोल विचार करता येत नसेल, तर आपण त्याला खरोखर सक्षम बनवतो आहोत का? हा प्रश्न साहजिकच. ही समस्या केवळ मराठीपुरती आहे का? हा एक महत्त्वाचा प्रश्नही विचारायलाच हवा. या प्रश्नाचे उत्तर आहे ‌’नाही.‌’ आज देशातील अनेक राज्यांत मातृभाषेतील शाळांची संख्या घटताना दिसते. तामिळनाडू, कर्नाटक, पश्चिम बंगाल सर्वत्रच इंग्रजी माध्यमाचा प्रभाव वाढला असून, जागतिकीकरण, खासगी शिक्षण संस्थांचा विस्तार आणि इंग्रजीला मिळालेलं जागतिक महत्त्व या सर्वांचा परिणाम म्हणून ही परिस्थिती निर्माण झाली आहे.

पण, फरक असा आहे की, काही राज्यांनी मातृभाषेबाबत ठाम भूमिका घेतली. तिथे इंग्रजी शिकवली जाते; पण मातृभाषेच्या बदल्यात नाही, तर तिच्या आधारावर. महाराष्ट्रात मात्र आपण इंग्रजीला शिक्षणाचे माध्यम नाही, तर सामाजिक उन्नतीचे प्रमाणपत्र बनवलं आहे. यामुळेच आज मराठी शाळा ‌‘दुसऱ्या दर्जाच्या‌’ ठरत आहेत, खरंतर आपणच त्यांना तसं ठरवलं आहे.

मातृभाषेतील शिक्षणाचा आग्रह ही आजची भावनिक बाब नाही, तर त्यामागे वैज्ञानिक दृष्टीकोन आहे. शिक्षणशास्त्र, मानसशास्त्र आणि मेंदू-विज्ञानातील संशोधन स्पष्ट सांगते की, मुलाची विचारप्रक्रिया ज्या भाषेत घडते, त्या भाषेतच तो अधिक खोलवर अध्ययन करतो.

प्राथमिक व माध्यमिक शिक्षण मातृभाषेत झाल्यास मुलांची आकलनशक्ती, आत्मविश्वास, विलेषण क्षमता आणि सर्जनशीलता यांचा अधिक विकास होतो. अशा विद्यार्थ्यांना पुढे इंग्रजीसह इतर भाषा आत्मसात करणे अधिक सोपे जाते. म्हणजे मातृभाषेतून शिक्षण हे इंग्रजीविरोधी नसून, उलट इंग्रजीसाठी आवश्यक असलेली बौद्धिक पायाभरणी ठरते. तरीही, आपण मराठी माध्यमाला इंग्रजी येणार नाही, या भीतीच्या चौकटीत अडकवतो. हा विरोधाभास नाही का?

यावर समाधान शोधायचे असेल, तर स्वत:ला खरे प्रश्न विचारणे आवश्यक आहे. यश म्हणजे नेमके काय? हा आजचा मुख्य प्रश्न. यश म्हणजे केवळ पगार आहे का? भाषा ही फक्त संवादाचे साधन आहे का? की, ओळखीचा पाया देखील आहे? विचार करता येणे महत्त्वाचे आहे की, फक्त बोलता येणे? आज आपण मुलाला ‌‘जागतिक‌’ बनवण्याच्या नादात त्याच्या मुळाशी तोडतो आहोत का? मराठी माध्यम निवडणे म्हणजे मुलाला मागे ओढणे नसून; त्याला विचारक्षम, आत्मविश्वासी आणि सांस्कृतिकदृष्ट्या सशक्त करणे आहे. पण हा विश्वासच आपण पालक म्हणून आज गमावला आहे.

सध्याच्या या परिस्थितीसाठी केवळ पालकांनाच दोषी धरता येणार नाही. जर मराठी माध्यमाच्या शाळांना दर्जेदार पायाभूत सुविधा, प्रशिक्षित शिक्षक, आधुनिक अभ्यासक्रम आणि डिजिटल साधने मिळाली नाहीत, तर या संस्थांवर पालकांचा विश्वास कसा निर्माण होणार? साहित्यिक, विचारवंत आणि भाषाप्रेमी यांनाही यासाठी आत्मपरीक्षण करावं लागेल. केवळ मराठीच्या गौरवगाथा सांगून उपयोग होणार नाही. मराठी शाळांमध्ये प्रत्यक्ष सहभाग, वाचनसंस्कृती रुजवणे, लेखक-विद्याथ संवाद घडवण्याचे कार्य प्रत्यक्ष घडलं पाहिजे.

आज मराठी भाषेचा प्रश्न अस्तित्वाचा प्रश्न बनला आहे. फलकांवर मराठी हवी, जाहिरातीत मराठी हवी, भाषणांत मराठी हवी; पण शिक्षणात मात्र नको? हा दुटप्पीपणा मराठीला परवडणारा नाही. जेव्हा एखाद्या शाळेला टाळे लागते, तेव्हा ते केवळ इमारतीला लागत नाही; तर त्या वर्गात घडणाऱ्या विचारांवर, प्रश्नांवर आणि पुढील पिढीच्या भाषिक जाणिवेवरही हे टाळे लागते. आज आपल्या मुलाने इंग्रजीत यशस्वी व्हावं अशी इच्छा असणे चुक नाही. इंग्रजी शिकायलाच हवं पण, त्या यशासाठी त्याच्या मातृभाषेला दुय्यम ठरवणं, हा मात्र अन्याय आहे.

मुलाने इंग्रजीत स्वप्ने पाहावीत; पण ती स्वप्ने समजून घेण्याची, त्यांना आकार देण्याची भाषा त्याची मराठी असावी इतकी साधी अपेक्षा आपण ठेवू शकत नाही का? मराठी भाषा वाचवायची असेल, तर ती घोषणांत नाही, शाळांमधूनच वाचवावी लागेल. मराठी शाळा वाचवायच्या असतील, तर त्या आपल्या निवडीने वाचवाव्या लागतील. आज पालक म्हणून आपण घेतलेला एक निर्णयच, उद्याच्या मराठी समाजाचा इतिहास लिहिणार आहे. प्रश्न एवढाच आहे की, तो इतिहास मराठी भाषेत लिहिला जाणार आहे का? की, केवळ तिच्या आठवणींत?

- प्रा. प्रतिभा बिस्वास