मुद्रित मराठी साहित्याचे भविष्य काय?

    01-Mar-2026   
Total Views |

मराठी भाषा, मराठी साहित्य आदी गोष्टींवर चर्चा सुरू झाली की आपसूकच चर्चा होते, ती पुस्तकांची. ‌‘आम्हा घरी धन, शब्दांचीच रत्ने‌’ म्हणणाऱ्या तुकोबांच्या महाराष्ट्राला पुस्तकसंपदेचा समृद्ध वारसा लाभलेला. 21व्या शतकाच्या उंबरठ्यावर तंत्रज्ञानाच्या आगमनामुळे वाचनसंस्कृती आणि पुस्तकविश्व संपुष्टात येईल, असा विचार काहींनी मांडला. ‌‘एआय‌’च्या उंबरठ्यावर असेच आणखी नवे प्रवाद जन्माला येत आहेत. अशातच मुद्रित अर्थात छापील मराठी साहित्याचे भविष्य नेमके काय असेल, याविषयी नुकत्याच संपन्न झालेल्या ‌‘मराठी भाषा गौरव दिना‌’च्या औचित्याने प्रकाशन क्षेत्रातील मान्यवरांशी दै. ‌‘मुंबई तरुण भारत‌’ने साधलेला विशेष संवाद.

पुस्तकांचे महत्त्व कमी होणार नाही

मुद्रित अक्षरांना सहा हजार वर्षांचा इतिहास आहे. त्यावर झालेली विविध प्रकारची आक्रमणं इतिहासाने बघितली आहेत. तरीही ही अक्षरं अजूनही टिकून आहेत. काळाच्या ओघात त्याचे स्वरूप बदलत आले, एवढेच. हल्ली सुरू असलेला ‌‘डिजिटल विरुद्ध छापील‌’ हा वादसुद्धा त्यांपैकीच एक. गेल्या दोन-तीन दशकांत उदयाला आलेल्या ‌‘ई-बुक्स‌’ संस्कृतीमुळे छापील पुस्तकाचं भविष्य धोक्यात आलं आहे, असं वारंवार बोलून दाखवलं जातं. पण, शेवटी पुस्तकांची खरेदी-विक्री हासुद्धा एक व्यवहार आहे. त्यात पैशाच्या मोबदल्यात ग्राहकाला घन स्वरूपात वस्तू अपेक्षित असते. ती अपेक्षा डिजिटल पुस्तकं कधी पूर्ण करू शकणार नाही व त्यामुळे ग्राहक (वाचक) पूर्णपणे संतुष्ट होण्याची क्रिया तिथे संभवत नाही. ‌‘ई-बुक्स‌’ ही एक सोय आहे. सोयीनुसार काही वाचक त्याकडे वळतीलच. पण, त्यांच्या उणिवांमुळे छापील पुस्तकांचे महत्त्व आणि स्थान कायम अधोरेखित होत राहील, भाषा कुठलीही असो.
- भूषण कोलते,
प्रकाशक, पपायरस प्रकाशन


माध्यमांतरं होत राहणार

मराठीतील छापील साहित्याला भविष्य आहे. मागच्या काही काळामध्ये या संदर्भातील मागणी कमी होती, मात्र आता असं नाही. लोक इतर माध्यमांबरोबर पुस्तकंसुद्धा विकत घेऊन वाचत आहेत. हे म्हणजे असं आहे की, ‌‘नेटफ्लिक्स‌’ जरी आपल्या जीवनाचा भाग असलं, तरी थिएटर्ससुद्धा अस्तित्वात आहेत. त्यामुळे माध्यमांतरं होत राहणार आहेत. प्रकाशन व्यवसायाकडे आपण व्यवसाय म्हणूनच बघितलं पाहिजे. एका बाजूला लोकांना नेमकं काय अपेक्षित आहे, त्याचबरोबर गुणवत्तापूण साहित्य या दोन्हीचा मिलाप घडवून लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. त्याचबरोबर नवीन माध्यमांचासुद्धा वापर करायला हवा. काळाचा ओघ लक्षात घेऊन योग्य भांडवल, पैसा, वेळ, विचार योग्य दिशेने वळवले, तर यश नक्की मिळेल.
- रोहन चंपानेरकर, प्रकाशक,
रोहन प्रकाशन


व्यवसायाचा परीघ विस्तारणे, ही काळाची गरज

साधारण 2011-12 पर्यंतचा जो काळ होता, तो मराठी प्रकाशनासाठी सुवर्ण काळ होता, असं मला वाटतं. आजच्या काळात आपल्या एकूणच मराठी संस्कृतीचा बाज बदलला आहे, हे आपल्या लक्षात येईल. त्याचबरोबर माध्यमांचे अतिक्रमण झाल्यामुळे अर्थातच वाचनसंस्कृतीवर परिणाम होत आहे. अशा परिस्थितीमध्ये प्रकाशकांनासुद्धा आपल्या व्यवसायाचा परीघ विस्तारण्याची गरज आहे, असं मला वाटतं. म्हणजे, मराठी पुस्तकांसोबतच व्यवसायाच्या दृष्टीने हिंदी आणि इंग्रजी पुस्तकांकडे आपल्याला वळावं लागणार आहे. काही प्रकाशनांनी यासंदर्भात पाऊलंसुद्धा उचलली आहेत.
-चेतन कोळी,
संपादक-प्रकाशक

छापील साहित्याची भुरळ कायम

मराठीतील छापील साहित्याचे भविष्य उज्ज्वलच आहे. मागच्या काही काळापासून काही समदुःखी लोकांकडून ‌‘वाचनसंस्कृती कमी होतेय,‌’ अशा अफवा पसरविल्या जाऊ लागल्या; पण त्या सातत्याने खोट्या ठरल्या. दरवष मराठीत प्रकाशित होणारी शब्दशः शेकडो पुस्तके त्याची साक्ष देऊ लागली. याच पुस्तकांवरून चित्रपट, नाटकांची निर्मिती होऊ लागली. समाजमाध्यमांमुळे युवा पिढीचं वाचन कमी होतंय, असे ठोकताळेही काहींनी मांडले; मात्र तेही तथ्यहीन आहेत. उलट व्हॉट्सॲप, फेसबुक, ब्लॉग, वेबसाईट, युट्यूब या व अशा माध्यमातून आम्हा प्रकाशकांना, लेखकांना आमची पुस्तके अधिकाधिक वाचकांपर्यंत पोहोचविणे आणि जगभरातील मराठी वाचकांपर्यंत एका क्लिकवर जाणे सहजशक्य झाले. अनेकांची वाचनाची अभिरुची, कल बदललाय; पण छापील साहित्य अजूनही अनेकांना भुरळ घालते. टीव्हीवर एखादी बातमी बघितल्यानंतरही अनेकजण दुसऱ्या दिवशी वृत्तपत्रात बघून खातरजमा करून घेतात, यातच सगळे आले. आपल्या बोलण्यातून, वाचण्यातून आपले भाषिक संस्कार पाझरत असतात. त्यामुळेच प्रकाशित, छापील साहित्याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. कोणी कितीही चिंता व्यक्त केली, तरी आपली समृद्ध भाषा आणि त्या भाषेतील छापील साहित्य चिरकाल टिकणारे आहे.
-घनश्याम पाटील,
संचालक, चपराक प्रकाशन, पुणे


पुस्तकं येत राहणार; गावं वाचत राहणार!

माध्यमांमधील संक्रमणामुळे बऱ्याचदा मुद्रित माध्यमांवर शिंतोडे उडवले जातात. मात्र, मुद्रित माध्यमाला पर्याय नाही, हेच सत्य आहे. आपण कितीही डिजिटल झालो, तरी स्क्रीनवर फार काळ वाचन करू शकत नाही. आज गावांमध्येसुद्धा मोठ्या प्रमाणात लोक पुस्तकांचेच वाचन करतात. मध्यंतरी ‌‘कोविड‌’च्या काळामुळे आपल्याला बदल बघायला मिळाला; मात्र तितक्याशा प्रमाणात गावांमध्ये इंटरनेटचा शिरकाव नाही. मात्र, खेडोपाडी आजही वृत्तपत्र असेल, पुस्तक असेल, यांचं वाचन होतं. पुणे पुस्तक महोत्सवासारख्या ठिकाणी कोट्यवधी रुपयांची पुस्तके विकली जातात. वाचकांची संख्या ज्या प्रकारे वाढली आहे, त्याच प्रकारे लिहिणारे हातसुद्धा वाढले आहेत. त्यामुळे वाचनाचा परीघ विस्तारला आहे, हेसुद्धा आपण लक्षात घेतलं पाहिजे.
-संदीप तापकीर,
संपादक, विश्वकर्मा पब्लिकेशन

समीकरण जुळवता आलं पाहिजे


मराठीतील मुद्रित साहित्याला उज्ज्वल भविष्य आहे, यामध्ये शंका नाही. आपण व्यायामाचे कितीही प्रकार केले, तरी शेवटी योगासने ही योगासनेच असतात; त्यांना पर्याय नसतो. याच प्रकारे पुस्तकालासुद्धा पर्याय नाही. ‌‘कोविड‌’ काळानंतर अनेकांनी छापील साहित्याला पसंती दिली आहे. अर्थात, लोकांना अपेक्षित असणारा कंटेंट महत्त्वाचा. आजच्या काळात लोकांकडे खूप वेगवेगळे पर्याय उपलब्ध झाले आहेत. त्यामुळे या प्रवाहात टिकून राहण्यासाठी तेवढ्या ताकदीचे लेखन आपल्याला करावं लागेल. मी 2014 पासून लिखाण करत आहे आणि प्रकाशन क्षेत्रात मागची दोन वर्षे कार्यरत आहे. 500 दिवसांत एक लाख पुस्तकांच्या विक्रीचा उपक्रम आम्ही केला. नव्या पिढीच्या अपेक्षा वेगळ्या आहेत. त्यांना त्यांच्या पद्धतीने आपण गोष्टी सांगितल्या पाहिजेत. नुसतीच पुस्तकं छापली आहे आणि विक्रीसाठी काढली, असं व्हायला नको. नेमके समीकरण जुळवून, व्यवसायाचे नियोजन करून लोकांनी काम करणं गरजेचं आहे.
-नितीन थोरात,
लेखक, प्रकाशक रायटर पब्लिकेशन




मुकुल आव्हाड

मुंबईच्या डी.जी. रुपारेल महाविद्यालयातून इतिहास आणि राज्यशास्त्र विषयात पदवी प्राप्त.
राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण. आकाशवाणीच्या युवा वाणी साठी विविध विषयांवर कार्यक्रम सादर केले.वाचनाची आवड. कथाकथन, काव्य वाचन,कथा लेखन यात विशेष रुची तसेच पुरस्कार प्राप्त. महाविद्यालयात असताना, नाटकात काम केले त्याच सोबत नाट्यलेखनाचा अनुभव.