Iran Supreme Leader: इराणचा नवा सुप्रीम लीडर कोण? खामेनींच्या मृत्यूनंतर देशाची कमान कोणाकडे जाणार?

    01-Mar-2026   
Total Views |
Iran Supreme Leader
 
तेहरान : (Iran Supreme Leader) इराणच्या सत्ताकारणात मोठी उलथापालथ झाल्याची अधिकृत माहिती समोर आली आहे. २८ फेब्रुवारी २०२६ रोजी झालेल्या इस्रायली हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचे निधन झाल्याची घोषणा करण्यात आली आहे. त्यांच्या निधनानंतर देशभरात ४० दिवसांचा राष्ट्रीय शोक जाहीर करण्यात आला असून राजधानी तेहरानसह प्रमुख शहरांमध्ये कडक सुरक्षा तैनात करण्यात आली आहे. सरकारी इमारतींवर लष्करी बंदोबस्त वाढवण्यात आला असून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.
 
१९८९ पासून सर्वोच्च नेते म्हणून कार्यरत असलेल्या खामेनी यांनी तीन दशकांहून अधिक काळ देशाचे नेतृत्व केले. त्यांच्या कार्यकाळात इराणने प्रादेशिक राजकारणात ठाम भूमिका घेतली आणि अनेक आंतरराष्ट्रीय निर्बंध, अणुकरार तसेच भू-राजकीय तणावांचा सामना केला. त्यांच्या निधनामुळे मध्य पूर्वेतील राजकीय समीकरणांमध्ये मोठी अनिश्चितता निर्माण झाली आहे.
 
मोजतबा खामेनींच्या नावाची चर्चा
दरम्यान, खामेनी यांचे धाकटे पुत्र मोजतबा खामेनी यांनी देशाची सूत्रे हाती घेतल्याचे वृत्त समोर आले आहे. १९६९ मध्ये मशहद येथे जन्मलेले मोजतबा गेल्या अनेक वर्षांपासून धार्मिक आणि राजकीय वर्तुळात सक्रिय असल्याचे मानले जाते. पडद्यामागून प्रभावी भूमिका बजावणारे व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची ओळख आहे. इराण-इराक युद्धकाळात त्यांनी सैन्यात सेवा बजावल्याची नोंद असून त्यांचे रिव्होल्यूशनरी गार्ड्सशी निकट संबंध असल्याचे सांगितले जाते.
 
तथापि, इराणच्या राज्यघटनेनुसार सर्वोच्च नेत्याची औपचारिक निवड Assembly of Experts या धार्मिक तज्ज्ञांच्या मंडळामार्फत केली जाते. त्यामुळे अधिकृत प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच नव्या नेतृत्वाबाबत अंतिम स्पष्टता येणार आहे. सध्याच्या परिस्थितीत नेतृत्वाचा प्रश्न अत्यंत संवेदनशील बनला असून राजकीय घडामोडींवर जगभरातून लक्ष ठेवले जात आहे.
 
कुटुंबीयांचाही मृत्यू?
या हल्ल्यात खामेनी यांच्या कुटुंबीयांचाही मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्या मुलगी, जावई, सून आणि नातवाचाही या कारवाईत बळी गेल्याचे सांगितले जात आहे. या घटनेमुळे देशात शोककळा पसरली असून अनेक ठिकाणी श्रद्धांजली कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत. इराणी अधिकाऱ्यांनी परिस्थिती नियंत्रणात असल्याचे सांगितले असले तरी तणाव कायम आहे.
 
पुढील दिशा काय?
सध्या इराणमध्ये राजकीय आणि लष्करी हालचाली वाढल्या आहेत. इस्रायली हल्ल्याला इराणने प्रत्युत्तर दिल्याची माहिती आहे. नव्या नेतृत्वाखाली देशात स्थैर्य निर्माण होईल का, की संघर्ष अधिक तीव्र होईल, याकडे जगाचे लक्ष लागले आहे. पुढील काही दिवस इराणच्या भवितव्यासाठी निर्णायक ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दिनेश दानवे

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर येथून पदवी आणि मराठवाडा मित्र मंडळाचे वाणिज्य महाविद्यालय, पुणे येथून पत्रकारिता अभ्यासक्रमात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. डिजिटल आणि सोशल मीडिया हाताळण्याचा अनुभव असून राजकारण, मनोरंजन आणि शेती या विषयांमध्ये विशेष रस आहे. प्रिंट आणि डिजिटल माध्यमांमध्ये इंटर्नशिपचा अनुभव घेतला असून सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत आहेत.