या देशामध्ये तलवारीच्या धाकेवर धर्मांतर घडवणारे अनेक परकीय शासक आले. मात्र, प्रत्येक वेळी याला विरोध करणारा खंबीर उभा राहिलाच. शिखांचे नववे गुरू परमपूज्य श्री गुरू तेग बहादूर देवजी यांचे कार्यही तसेच. मुस्लीम शासकांच्या या अन्यायाचा विरोध त्यांनी प्राणपणाने केला. सध्या ‘हिंद-दी-चादर’ या कार्यक्रमाचे आयोजन शीख आणि बंजारा समाजाच्या ऐक्याचे प्रतीक म्हणून सरकारमार्फत करण्यात आले होते. याच पार्श्वभूमीवर श्री गुरू तेग बहादूर देवजी यांच्या कार्याचा, त्यांच्या विचारांचा तसेच त्यांच्या साथीदारांच्या कार्याचा घेतलेला मागोवा...
इहवाद म्हणजेच ’सेक्युलॅरिझम’. राजाने धर्मात हस्तक्षेप करू नये. राजाची दोन कर्तव्ये असतात एक म्हणजे त्याने समाज, जाती, धर्म आणि कुलधर्माला सुरक्षित ठेवणे. म्हणजेच धर्मप्रमुख जे आज्ञा देतील, तशी आज्ञा राजाने देऊ नये. धर्माच्या कारभारात राजाने हस्तक्षेप करू नये, राजाचे क्षेत्र निराळे आणि धर्माचे क्षेत्र निराळे. राजाने धर्माचे काम करू नये. कौटिल्यापासून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत ही कल्पना मान्य आहे. त्यात वाद नाही परंतु, ही कल्पना सर्वमान्य आहे, असं मानणेही सर्वमान्य नाही. ’सेक्युलॅरिझम’च्या अनेक कल्पना होऊ शकतात किंवा आहेत. धर्म आणि राज्य यांनी आपआपली कक्षा निर्माण करून धर्माला पूर्ण स्वतंत्र, सुरक्षित करायला पाहिजे. धर्माचा परिघ ओलांडल्यावर उरलेले भाग राजसत्तेचे आहेत. ’सेक्युलॅरिझम’ची कल्पना धर्माला स्वातंत्र्य देते. जीवनमूल्ये, समाजरचना, नैतिक मूल्ये आणि परमेश्वराची भीती निर्माण करून, धर्मगुरू जनतेवर नियंत्रण ठेवू शकतात. धर्माला स्वतंत्र करून त्यांच्या हाती जनतेला सोपवणे, म्हणजे पूर्ण स्वातंत्र्य नाही. भक्त तरी कुठे स्वतंत्र असतात? त्यांना धर्मगुरूंच्या आज्ञेपलीकडे जाता येत नाही.
’सेक्युलॅरिझम’ची दुसरी कल्पना संविधानाने निश्चित केलेली आहे की, राजसत्ता धर्माबाबत तटस्थ राहणे म्हणजे धर्मनिरपेक्षता. यामध्ये राजसत्तेने कोणत्याच धर्मात हस्तक्षेप न करणे अभिप्रेत आहे. तिसरी कल्पना आपोआप जन्माला येते की, जर धर्मात हस्तक्षेप करायचा नाही, तर धर्म ठेवायाचाच कशाला? सर्व पूजास्थाने आणि धार्मिक व्यवहार समाप्त करून टाकायला पाहिजेत! ‘कम्युनिझम’मधला ’सेक्युलॅरिझम’ असा होऊ शकतो परंतु, भारतात असं नाही. भारतात लोकशाही आहे आणि ती ’इहवादी’ अर्थात ’सेक्युलर’ आहे. खूप लोकांना असे वाटते की, सरकारने धार्मिक उत्सव, पूजास्थळे आणि धर्मगुरूंच्या कार्यात हस्तक्षेप करू नये कारण, सरकार हे तटस्थ असते. सरकारला तटस्थ राहणे जरूरीचे आहे. संविधान सांगते की, आरोग्य, नैतिकता आणि सार्वजनिक व्यवस्थेबाबत सरकार धार्मिक क्षेत्रात हस्तक्षेप करूच शकते; जसं आपण ‘कोविड 19’च्या वेळेेस अनुभवलेच आहे.
इतिहास बघितला तर असे लक्षात येईल की, सरकार धर्मनिरपेक्ष राहू शकते; पण व्यक्ती धर्मनिरपेक्ष राहू शकत नाही; भारतात तर नाहीच नाही! मंत्री-संत्री, अधिकारी धर्मनिरपेक्ष जरी असले, तरी जनता ही धार्मिक असतेच. लोकशाहीची कल्पना संविधानाने दिली. त्या कल्पनेमुळे जनता आणि राजसत्ता जनतेपासून तटस्थ राहू शकत नाही. राजसत्ता ’सेक्युलर’ आहे, जनता नाही. सरकारला जनतेचे कार्य धर्मक्षेत्राबाहेर राहून करणे तर जरूरी आहेच, त्याचबरोबर धर्मक्षेत्राबाबत हरकत न घेता धर्मासाठी कार्य करणेही भाग आहे. धर्मगुरू तर त्यांचे भक्त आणि धर्मावर आस्था ठेवणाऱ्या जनतेला धर्मात हस्तक्षेप करू देत नाहीत, आणि सरकारला तसा हस्तक्षेप करण्याचा अधिकारच नाही. ’सेक्युलर’ सरकार जर धार्मिक कार्य, धार्मिक उत्सवांमध्ये भाग घेत असेल, तर याला अनीतिमूल्य कल्पना सांगता येणार नाही. पूजास्थळे, पुरातन धार्मिक स्थळांचा सांभाळ करणेसुद्धा सरकारच्याच कार्यक्षेत्रात मोडते. ही कार्ये राजसत्तेसाठी निजव कार्ये असतील; परंतु अनेक पंथ आणि जातींना एकत्रित आणून धार्मिक कार्य करणे, म्हणजेच जिवंत कार्य आहे. परमपूज्य शहीद गुरू तेग बहादूर साहिब, भाई मतिदास, भाई सतीदास आणि महापुरुष लखीशाह यांच्या इतिहासाची पुनरावृत्ती सरकार करत आहे. याला कोणीच आक्षेप घेण्याचे कारण नाही. परमपूज्य गुरू तेग बहादूर साहिबांनी हिंदू धर्मक्षेत्रात हस्तक्षेप करण्यास एका मुस्लीम निरंकुश शासकाला विरोध केला. राज्यात एकच धर्म असणे उत्तम आणि तो धर्म फक्त इस्लाम राहू शकतो, ही राजाज्ञा! राजाज्ञेविरोधात जाणे, म्हणजे मृत्युदंड! मुस्लीम निरंकुश शासकाची मृत्युदंड म्हणजे शरीराचे तुकडे करणे; उकळत्या पाण्यात टाकणे आणि शरीराचे दोन तुकडे करणे आणि शिर धडापासून वेगळे करणे; गरम माती अंगावर टाकणे, हत्तीच्या पायाखाली तुडवणे, उंच पर्वतावरून फेकून देणे इत्यादि. शिक्षेचे प्रकार परमपूज्य गुरू तेग बहादूर साहिबांना माहीत असतानाही, त्यांनी धर्मपरिवर्तनाविरोधात ठाम भूमिका घेतली. 1675 मध्ये दिल्लीतील लाल किल्ल्यासमोर त्यांना फाशी देण्यात आले. उच्च ब्र्राह्मण कुळातील असलेल्या त्यांचे भक्त भाई मतिदास, भाई सतीदास आणि भाई दयालाजी-कंबोज कुळाचे यांनी गुरू तेग बहादूर साहिबांबरोबर बलिदान दिले. गुरू देग बहादूर साहिबांच्या बलिदानानंतर त्यांचे पार्थिव शरीर शिक्षेच्या जागेपासून घेऊन त्यावर अंत्यसंस्कार करणे, म्हणजे फाशीच्या शिक्षेला पात्र! कोण हे कार्य करणार? कोणीही या कार्यासाठी तयार होणे म्हणजे जणू मरण स्वीकारणेच! शेवटी वीर बाहदूर बंजारा भक्त लखीशाह यांनी मोठ्या हिमतीने जिवाची पर्वा न करता गुरू साहिबांचे पार्थिव शरीर उचलून बैलगाडीत टाकले आणि आपल्या घरी नेले. सरकारी सैनिक येण्याआगोदर या वीरभक्ताने आपले घर आगीच्या स्वाधीन करून टाकले आणि याप्रकारे गुरू साहिबांचे अंत्यसंस्कार केले. दिल्लीतील त्या जागेवर आज पवित्र रकाबगंज साहेब गुरुद्वारा आहे. सर्व शीख आज रकाबगंज साहेब गुरुद्वाराचे दर्शन घेत असतात. भाई मतिदास, भाई सतीदास आणि भाई दयालाजींच्या समाधीचे दर्शन सर्व शीख खूप आदराने घेतात. ’सेक्युलॅरिझम’च्या एक पाऊल पुढे येऊन, सरकार धार्मिक भावाने आस्था आणि भारतीय संस्कृतीची सुरक्षा करत आहे. धर्माचा भाग सार्वजनिक जीवनाशी जोडलेला असतो. त्याचा धार्मिक आशय कमी करणे म्हणजे, राष्ट्रीय एकतेकडे वाटचाल करणे आहे. गुरू साहिबांचे उपदेश एकाच समाजापुरते मर्यादित राहण्यापेक्षा, अन्य समाजांपर्यंतसुद्धा पोहोचविण्याचे कार्य स्तुत्य आहे. लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाचा उपयोग राष्ट्रीय कार्यासाठी केला होता. शहिदी गुरपुरबला राष्ट्रीय उत्सव म्हणून साजरा करणे योग्य आहे. याला मी नमन करत आहे.
- परमजोत सिंह चाहेल
(लेखक निवृत्त न्यायाधीश आहेत.)
9869946886