समुद्रापलीकडचा गोमांतक

    01-Mar-2026
Total Views |

गोवा हे केवळ समुद्र, किनारे आणि पाट संस्कृती यांच्यासाठी प्रसिद्ध नाही; या छोट्या किनारपट्टीतील प्रदेशात हिंदू धर्मपरंपरेचा सखोल इतिहास, स्थापत्य कला आणि धार्मिक आशयाची समृद्ध परंपरा आहे. कोकणातील निसर्गरम्य प्रदेशात, समुद्राच्या किनाऱ्यापेक्षा आत, गोव्यातल्या वाड्यांच्या, डोंगरांच्या कुशीत दडलेली काही मंदिरे अस्तित्वाची अनन्य सांस्कृतिक ओळख उभी ठेवतात. त्यापैकी महत्त्वाची आणि अत्यंत रुचीची दोन स्थळे आहेत- श्री सप्तकोटेश्वर मंदिर (नर्वे) आणि ब्रह्मा मंदिर, करमाळी. ही मंदिरे गोव्याच्या शाश्वत श्रद्धेचा आणि सामूहिक इतिहासाचा एक अद्भुत अध्याय उलगडतात. आज या दोन मंदिराविषयी जाणून घेऊया...

श्री सप्तकोटेश्वर मंदिर

श्री सप्तकोटेश्वर हे हिंदू धर्मातील महत्त्वाचे शिवस्थान आणि कोकणाच्या सहा प्रमुख शिव मंदिरांपैकी एक मानले जाते. इ.स. 11-12व्या शतकात ‌‘कदंब‌’ राजवंशाने ‌‘लोकदेवता‌’ म्हणून या अवताराला प्रतिष्ठा दिली आणि हे मंदिर त्यांचे कुटुंब-देवता म्हणून याला विशेष स्थान प्राप्त झाले. या देवतेचे नाव ‌‘सप्तकोटेश्वर‌’ आहे. कारण, पौराणिक कथेनुसार सात ऋषींनी सात कोटी वर्षे तपश्चर्या करून येथे भगवान शिवाला प्रकट होण्याची प्रार्थना केली होती आणि त्यानंतर शिवांनी या स्थानाला निवास केला. या ठिकाणी ‌‘सात कोटी‌’ हा फक्त आकडा म्हणून गृहीत न धरता, सातप्रकाराने केलेली तपश्चर्या, असादेखील अर्थ होऊ शकतो.

सप्तकोटेश्वर मंदिराचा इतिहास संघर्षाने भरलेला आहे. तुम्ही कितीदा पडता, यापेक्षा पडल्यावर तुम्ही किती ताकदीने उभे राहता, ही सर्वात महत्त्वाची गोष्ट. ‌‘कदंब‌’ राजांनी बांधलेले मंदिर बहमनी सुलतानांच्या आक्रमणात नष्ट झाले आणि शिवलिंगदेखील फोडले गेले. पण, स्थानिक भक्तांनी त्याचे रक्षण करून ते पुढे नर्वे (Bicholim) येथे हलवले आणि विजयनगर साम्राज्याच्या काळात इथे मंदिराची निर्मिती झाली. पुढे पोर्तुगीजांनी हे मंदिर परत फोडले. घोर काळ्या रात्रीनंतर भारताने पाहिलेला स्वच्छ पवित्र सूर्योदय म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. महाराजांनी त्यांच्या दिग्विजयात, 1668 साली या मंदिराचे पुनर्वसन केले आणि शिवलिंग योग्य स्थानी प्रतिष्ठापित केले. आजही मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ त्या काळचा शिलालेख पाहायला मिळतो. महाराजांनी मंदिराचा जीर्णोद्धार केला, शिव शिवाशी जोडला गेला.

मुखमंडप, सभामंडप, अंतराळ आणि गर्भगृह असे या मंदिराचे मुख्य भाग आहेत. सभामंडपाच्या खांबांवर स्थानिक ‌‘कावी‌’ शैलीमध्ये आकृती काढलेल्या दिसतात. प्रदक्षिणापथावरून चालताना मागे गेल्यावर जुने जांभा दगडातले स्थापत्यदेखील इथे बघायला मिळते. साधनेसाठी गर्भगृहाच्या वरच्या बाजूला एक खोली आहे, तिथे जाणारा जिनादेखील मागच्या बाजूने दिसतो. सभोवताली अनेक दगडी गुहा दिसतात आणि मंदिराच्या जवळ एक पंचगंगा तीर्थ आहे, जेथे दरवष महाशिवरात्रीच्या निमित्ताने भक्त स्नान करतात. या सर्व घटकांनी मंदिराचे भौगोलिक, पुरातात्त्विक आणि धार्मिक महत्त्व अधिक स्पष्ट होते. नुकतेच गोवा राज्य सरकारच्या माध्यमातून या मंदिराचा विकसन प्रकल्प पार पडला. याच्या मंदिराच्या शेजारी आर्यादुर्गा मंदिरदेखील बघायला मिळते.

आज सप्तकोटेश्वर मंदिर हे समुद्र-पर्यटनाच्या लोकप्रिय ठिकाणांपेक्षा शांती, भक्ती आणि प्राचीन श्रद्धेचा अनुभव देणारे स्थुळ आहे. तो केवळ दगड किंवा दीपस्तंभ नाही, तर भक्तांच्या श्रद्धेचा, कठीण इतिहासाचा आणि पुनर्जन्म घेत असलेल्या श्रद्धेच्या अनंततेचे प्रतीक आहे.

ब्रह्मा मंदिर, करमाळी - सृष्टीकर्त्याचे दुमळ देवस्थान

भारतात ब्रह्मदेवाची नित्यस्थानी पूजित मंदिरे अगदी विरळ आहेत. पारंपरिक परंपरेनुसार, ब्रह्माचे एकच मंदिर पुष्कर(राजस्थान)मध्ये असल्याचे मानले जाते. मात्र, गोव्यातील ब्रह्मा मंदिर, करमाळी हा त्या दुमळ परंपरेचा अपवाद आहे. भारताच्या काही क्वचित ब्रह्मा मंदिरांपैकी एक.

हे मंदिर जरी आधुनिक असले, तरी आतमध्ये असणारी मुख्य मूत ही ‌‘कदंब‌’ काळातील (पहिले शतक) कलात्मकतेचे प्रतीक आहे. गर्भगृहात असणारी काळ्या पाषाणात कोरलेली मूत ही अप्रतिम कलात्मकतेचा आविष्कार आहे. या मूततील ब्रह्माचे चार हात आहेत- उच्च उजव्या हातात स्त्रुवा (पळी), डाव्या वरच्या हातात ‌‘वेद‌’, खालच्या डाव्या हातात कमंडलू आणि खालच्या उजव्या हातात अक्षमाला (जपमाळ) आहेत; ही प्रतिमा खूप विशेष आहे. कारण, इथे ब्रह्माचे चौथे मुखदेखील कोरलेले आहे. प्रदक्षिणा घेताना मागून आपल्याला या चेहऱ्याचेदेखील दर्शन घेता येते. आता जिथे मूत आहे, तिथून काही किलोमीटर अंतरावर या देवतेचे मुख्य मंदिर होते. त्या भागातली मंदिरे पोर्तुगीजांनी पाडायला सुरू केल्यावर ही मूत या भागात आणली गेली आणि आधी मंदिर असलेल्या भागाच्या नावानेच हा भाग ओळखला जाऊ लागला. अजिबात क्षतिग्रस्त नसलेली ही मूत खूप बोलकी आहे. कलाकाराने आपले प्राण फुंकून कोरलेली आहे ही मूत, हे क्षणोक्षणी जाणवते.

मंदिराच्या स्थापनेचा इतिहास अनेक आध्यात्मिक, सांस्कृतिक आणि पुरातात्त्विक संदर्भांनी भरलेला आहे. ब्रह्मा देवता हिंदू त्रिमूततील ‌‘सृष्टीकर्ता‌’ म्हणून मानली जाते; परंतु त्यांच्या मंदिरांची संख्या अत्यंत कमी असल्यामुळे हे देवस्थान अधिक महत्त्वाचे बनते. गावाच्या सान्निध्यातील निसर्ग, तलाव आणि शांतता या सर्वांनी हा परिसर एक विविधाथ धार्मिक आणि सांस्कृतिक स्थळ म्हणून जिवंत ठेवला आहे.

श्री सप्तकोटेश्वर आणि ब्रह्मा, करमाळी ही दोन्ही मंदिरे गोव्यातील कदंब, विजयनगर, मराठा आणि प्रादेशिक परंपरांचा संगम दर्शवितात. कदंब राज्यकाळातील देवस्थानांची निर्मिती, विजयनगर साम्राज्याने केलेले पुनर्वसन आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे धार्मिक संरक्षक म्हणून योगदान, हे सर्व या स्थळांच्या इतिहासाचा अविभाज्य भाग आहे.

आज ही मंदिरे आधुनिक गोव्याच्या नकाशात केवळ ऐतिहासिक स्थळे नाहीत; तर ती जागतिक पातळीवरील श्रद्धेची, स्थापत्याबद्दलच्या अंतर्दृष्टीची आणि भारतीय सांस्कृतिक विविधतेचा अनुभव देणारी केंद्रे आहेत.

गोव्याला दरवष लाखोंच्या संख्येने पर्यटक जातात. तुम्ही जेव्हा कधी परत गोव्याला जाल, त्यावेळी या जागा बघायला, अनुभवायला विसरू नका. या दोन्ही जागा पणजीपासून अगदी तासाभराच्याच अंतरावर आहेत. दगडांमध्ये कोरलेल्या या कविता आपल्या मनात सतत गुणगुणत राहतील.

- इंद्रनील बंकापुरे
7841934774