PM Modi : २०१५ नंतर प्रथमच पंतप्रधान मोदी मलेशिया दौऱ्यावर; १० वर्षांपासून फरार झाकीर नाईकचा मुद्दा उपस्थित करणार, उद्या सीईओ फोरममध्ये सहभाग

    07-Feb-2026   
Total Views |
PM Modi
 
मुंबई : ( PM Modi ) पंतप्रधान नरेंद्र मोदी ७ फेब्रुवारी रोजी दोन दिवसांच्या अधिकृत दौऱ्यासाठी मलेशियाला रवाना झाले आहेत. मलेशियाचे पंतप्रधान दातो सेरी अन्वर इब्राहिम यांच्या निमंत्रणावरून हा दौरा होत असून, २०१५ नंतर पंतप्रधान मोदी मलेशिया दौऱ्यावर आहेत. भारत–मलेशिया द्विपक्षीय संबंधांच्या दृष्टीने हा दौरा महत्त्वपूर्ण मानला जात आहे.
 
परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव पी. कुमारन यांनी सांगितले की, भारताचे ASEAN देशांशी संबंध अधिक बळकट करणे आणि मलेशियासोबतचे सहकार्य वाढवणे हा या दौऱ्याचा प्रमुख उद्देश आहे. या पार्श्वभूमीवर हा दौरा भारताच्या परराष्ट्र धोरणासाठी महत्त्वाचा ठरणार आहे.
 
झाकीर नाईकचा मुद्दा चर्चेत
या दौऱ्यात गेल्या १० वर्षांपासून मलेशियात वास्तव्यास असलेल्या फरार धर्मगुरू झाकीर नाईकच्या मुद्द्यावरही चर्चा होणार आहे. भारताने यापूर्वी विविध प्रसंगी हा विषय मलेशियासमोर मांडला असून, यावेळीही या संवेदनशील प्रकरणावर चर्चा होण्याची शक्यता आहे.
 
सीईओ फोरममध्ये पंतप्रधानांचा सहभाग
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यादरम्यान ८ फेब्रुवारी रोजी कुआलालंपूर येथे भारत–मलेशिया सीईओ फोरमची १० वी बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत दोन्ही देशांतील प्रमुख उद्योगपती, गुंतवणूकदार आणि व्यावसायिक नेते सहभागी होणार आहेत. यासोबतच पंतप्रधान मोदी मलेशियातील आघाडीच्या उद्योगसमूहांच्या प्रतिनिधींशीही चर्चा करणार आहेत.


पंतप्रधान मोदी–अनवर इब्राहिम यांच्यात द्विपक्षीय चर्चा
या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मलेशियाचे पंतप्रधान अनवर इब्राहिम यांच्यात द्विपक्षीय बैठक होणार आहे. या बैठकीत भारत–मलेशिया ‘कॉम्प्रिहेन्सिव्ह स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप’अंतर्गत आतापर्यंत झालेल्या प्रगतीचा आढावा घेतला जाणार असून, पुढील सहकार्याबाबत चर्चा होईल.
 
परराष्ट्र मंत्रालयाच्या माहितीनुसार, व्यापार व गुंतवणूक, संरक्षण व सुरक्षा, सेमीकंडक्टर, डिजिटल तंत्रज्ञान, नवीकरणीय ऊर्जा, शिक्षण, आरोग्य, पर्यटन आणि लोकांमधील परस्पर संपर्क या महत्त्वाच्या क्षेत्रांवर चर्चा होणार आहे.
 
पायाभूत सुविधा आणि शिक्षण सहकार्यावर भर
पी. कुमारन यांनी सांगितले की, दोन्ही देश रेल्वेसारख्या पायाभूत सुविधा प्रकल्पांवर, नवीकरणीय ऊर्जा आणि इतर सहकार्याच्या क्षेत्रांमध्ये संयुक्तपणे काम करण्याचा विचार करत आहेत. याशिवाय विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्तीची संख्या वाढवणे आणि मलेशियामध्ये ‘थिरुवल्लुवर सेंटर फॉर इंडियन स्टडीज’ स्थापन करण्याबाबतही चर्चा सुरू आहे.

मलेशियामध्ये २९ लाख भारतीय वास्तव्यास
या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान मोदी मलेशियामध्ये राहणाऱ्या भारतीय समुदायाला भेट देणार असून, त्यांना संबोधित करणार आहेत. मलेशियामध्ये सुमारे २९ लाख भारतीय वंशाचे लोक वास्तव्यास आहेत, जो जगातील तिसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा भारतीय प्रवासी समुदाय आहे.
 
परराष्ट्र मंत्रालयानुसार, भारत आणि मलेशियाचे संबंध इतिहास, संस्कृती आणि सभ्यतेशी खोलवर जोडलेले आहेत. मलेशियामधील भारतीय समुदायाने भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतही महत्त्वाची भूमिका बजावली होती.
 
ASEAN च्या दृष्टीने दौऱ्याचे महत्त्व
मलेशिया ASEAN चा एक महत्त्वाचा सदस्य देश आहे. भारताच्या ‘ॲक्ट ईस्ट पॉलिसी’मध्ये ASEAN कायमच केंद्रस्थानी राहिला असून, मलेशिया भारताचा विश्वासार्ह भागीदार मानला जातो. भारत सध्या ASEAN सोबत AITIGA फ्री ट्रेड करार अद्ययावत करण्याचा प्रयत्न करत आहे.
 
२०२२-२३ मध्ये भारताची ASEAN देशांशी व्यापार तूट सुमारे ४३ अब्ज डॉलरपर्यंत पोहोचली होती. अशा परिस्थितीत पंतप्रधान मोदींचा हा दौरा AITIGA अधिक संतुलित आणि आधुनिक बनवण्यासाठी उपयुक्त ठरू शकतो.
 
झाकीर नाईकमुळे भारत–मलेशिया संबंधांत तणाव
झाकीर नाईक हा भारत आणि मलेशियाच्या संबंधांमध्ये वारंवार तणावाचा मुद्दा ठरतो. भारतात त्याच्यावर मनी लॉन्ड्रिंग आणि कट्टरतावाद पसरवल्याचे गुन्हे दाखल आहेत. अटकेच्या भीतीने तो २०१६ मध्ये मलेशियाला पळून गेला होता. जून २०१७ मध्ये न्यायालयाने त्याला गुन्हेगार घोषित केले होते.

झाकीर नाईकवर मलेशियातील अल्पसंख्याक हिंदू आणि चिनी समुदायाच्या भावना दुखावल्याचेही आरोप आहेत. भारत त्याचे प्रत्यार्पण करण्याची मागणी करत आहे, मात्र त्याला मलेशियामध्ये कायमस्वरूपी निवास परवानगी मिळाल्याने हा मुद्दा अधिक संवेदनशील ठरला आहे.

दिनेश दानवे

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर येथून पदवी आणि मराठवाडा मित्र मंडळाचे वाणिज्य महाविद्यालय, पुणे येथून पत्रकारिता अभ्यासक्रमात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. डिजिटल आणि सोशल मीडिया हाताळण्याचा अनुभव असून राजकारण, मनोरंजन आणि शेती या विषयांमध्ये विशेष रस आहे. प्रिंट आणि डिजिटल माध्यमांमध्ये इंटर्नशिपचा अनुभव घेतला असून सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत आहेत.