Bill Gates Epstein Files Reaction: एपस्टाईन फाइल्सवर बिल गेट्स यांची पहिली प्रतिक्रिया; "त्याच्याबरोबर...

    05-Feb-2026   
Total Views |

Bill Gates Epstein Files Reaction

मुंबई : (Bill Gates Epstein Files Reaction) अल्पवयीन मुलींच्या लैंगिक तस्करीप्रकरणी आरोपी असलेल्या जेफ्री एपस्टाईनशी संबंधित प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. अमेरिकेच्या न्याय विभागाने अलीकडेच सुमारे ३० लाख पानांची ‘एपस्टीन फाइल्स’ (Epstein Files) संबंधित नवीन कागदपत्रे सार्वजनिक केली असून, त्यामध्ये अनेक नामांकित व्यक्तींची नावे समोर आली आहेत. यामध्ये मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांच्याही नावाचा उल्लेख असल्याचे म्हटले जात आहे. यावर बिल गेट्स यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यांनी जेफ्री एपस्टाईनशी केलेल्या मैत्रीबाबत पश्चात्ताप व्यक्त केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, त्यांना त्याच्यासोबत घालवलेल्या प्रत्येक मिनिटाचा पश्चात्ताप होतो आहे.(Bill Gates Epstein Files Reaction)
नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत गेट्स म्हणाले, "एपस्टाईनसोबत घालवलेल्या प्रत्येक मिनिटाचा मला पश्चात्ताप होत आहे. मी डिनरसाठी गेलो होतो हे खरं आहे. पण मी कधीही एपस्टाईनच्या बेटावर गेलो नाही किंवा कोणत्याही महिलांना भेटलो नाही. जसजशी अधिक माहिती समोर येईल तसतसे हे स्पष्ट होईल की एपस्टाईनसोबत घालवलेला वेळ ही मोठी चूक होती." ड्राफ्ट ईमेलमधील आरोप फेटाळून लावत ते म्हणाले, "तो ईमेल कधीही पाठवला गेला नाही. तो ईमेल खोटा आहे." गेट्स पुढे म्हणाले, "त्यावेळी त्याचा विचार काय होता, हे मला माहीत नाही. तो कोणत्यातरी प्रकारे माझ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करत होता का?"(Bill Gates Epstein Files Reaction)
गेट्स-एपस्टाईन यांची पहिली भेट
गेट्स यांनी ९ न्यूजला सांगितले की, त्यांची एपस्टाईनशी पहिली भेट २०११ मध्ये झाली होती आणि त्यानंतर तीन वर्षांच्या कालावधीत त्यांनी त्याची अनेक वेळा भेट घेतली होती. त्यांनी सांगितले की, त्यांनी एपस्टाईनच्या कॅरिबियन बेटाला कधीही भेट दिली नाही आणि महिलांशी संबंध ठेवल्याचे त्यांनी नाकारले. ते म्हणाले, "महत्त्वाचा मुद्दा हा होता की, त्याला अनेक श्रीमंत लोक ओळखत होते आणि तो म्हणत होता की, तो त्यांना जागतिक आरोग्यासाठी आर्थिक मदत देण्यास तयार करू शकतो. आता मागे वळून पाहता, तो एक निष्फळ प्रयत्न होता."(Bill Gates Epstein Files Reaction)
गेल्या आठवड्यात अमेरिकन न्याय विभागाने प्रसिद्ध केलेल्या कागदपत्रांमध्ये एपस्टाईन आणि अनेक हाय-प्रोफाइल व्यक्तींशी संबंधित ईमेल्स समाविष्ट आहेत. त्यापैकी काही ईमेल्स वैयक्तिक संबंध, आर्थिक व्यवहार आणि खाजगी देवाणघेवाण सूचित करतात. एका कागदपत्रात जेफ्री एपस्टाईनचा एक ड्राफ्ट ईमेल आढळून आला आहे. या ईमेलमध्ये एपस्टाईनने बिल गेट्स यांच्यावर विवाहबाह्य संबंधांचा आरोप केला होता.(Bill Gates Epstein Files Reaction)


अनिशा डुंबरे

मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\