जामीनावर बाहेर असलेला माओवादी आनंद तेलतुंबडेचा कार्यक्रम रद्द; काळा घोडा कला महोत्सवात 'तुरुंगातील भिंतीआडच्या कथा' नावाने आयोजित करण्यात आलेला कार्यक्रम

Total Views |

मुंबई : भीमा कोरेगाव प्रकरणात कट रचण्याच्या आरोपाखाली अटक झालेला आणि जामीनावर बाहेर असलेला माओवादी आनंद तेलतुंबडे याचा मुंबईत काळा घोडा कला महोत्सवात आयोजित करण्यात आलेला कार्यक्रम समाज माध्यमांवरील तीव्र विरोधानंतर रद्द करण्यात आला आहे.

माओवादी नेता आनंद तेलतुंबडे याला महाराष्ट्र पोलिसांनी देशाविरुद्ध युद्ध पुकारण्यासारख्या गंभीर आरोपाखाली म्हणजेच UAPA कलमा अंतर्गत अटक केलेली आहे. सध्या तो जामिनावर तुरुंगाबाहेर आहे. अशा परिस्थितीत मुंबईतील प्रसिद्ध काळा घोडा कला महोत्सवात त्याचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता.

याबाबत आयोजकांनी सांगितले की, मुंबई पोलिसांच्या आदेशानुसार कार्यक्रम रद्द करण्यात आला असून सहभागींना कार्यक्रमाबद्दलच्या सोशल मीडिया पोस्ट देखील हटवण्याचे सांगण्यात आले आहे. कार्यक्रमात तेलतुंबडे सोबतच लेखिका नीता कोल्हटकर यांचेही भाषण होणार होते. तसेच स्क्रोल या वेब संकेतस्थळाचे संपादक नरेश फर्नांडिस हे सूत्रसंचालन करणार होते.
 
या कार्यक्रमात तो 'तुरुंगातील भिंतीआडच्या कथा' या शिर्षकाखाली त्याच्यावर तुरूंगात होत असलेला व्यवहार सांगून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करेल असे शहरी माओवादाविरूद्ध कार्य करणाऱ्या व्यक्तींनी सांगितले. त्यामुळे राज्यातील भारतीय जनता पक्षाकडून याची गांभीर्याने दखल घेत आयोजकांना कार्यक्रम रद्द करण्यास भाग पाडले.

सदर आनंद तेलतुंबडे याला महाराष्ट्र पोलिसांनी देशा विरुद्ध युद्ध पुकारण्यासारख्या गंभीर आरोपाखाली UAPA कलमा अंतर्गत अटक केलेली आहे. सध्या तो जामिनावर तुरुंगाबाहेर आहे. अशा परिस्थितीत महाराष्ट्र पोलीस, महाराष्ट्र सरकार यांचे प्रायोजकत्व असलेल्या काला घोडा कला महोत्सवात देशद्रोहाच्या गुन्ह्यातील आरोपी 'अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गळा घोटण्यासाठी सरकार प्रायोजित तुरुंगवास' यावर व्याख्यान देणार आहेत. महाराष्ट्र सरकारने काला घोडा कला महोत्सवाच्या प्रायोजकत्वावर पुन्हा विचार करावा आणि संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करावी.
तुषार दामगु़डे
अँटी टेरर फोरम,
अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य

कम्युनिस्ट विचारांचे शहरी माओवादी इकोसिस्टीम मधील कॉम्रेड्स विविध ठिकाणी घुसखोरी करून त्यांचा अजेंडा अत्यंत हुशारीने राबविताना दिसतात. UAPA सारख्या गंभीर गुन्ह्यात आरोपी असलेल्या व सध्या जामिनावर तुरुंगाबाहेर असणाऱ्या आनंद तेलतुंबडे चा खुलेआम कार्यक्रम अचानक लावला जातो. समाजातून मोठा विरोध झाल्यानंतर मात्र जनतेच्या भावना लक्षात घेऊन आयोजकांनी शहरी माओवाद्यांचे उदात्तीकरण करणारा हा कार्यक्रम रद्द केला, हे योग्य आणि स्वागतार्ह पाऊल आहे. नक्षली विचारांचे गौरवीकरण होऊ शकत नाही. लोकशाही, संविधान आणि देशविरोधी कारवायांबाबत समाजाने स्पष्ट व ठाम भूमिका घेणे आवश्यक आहे.
सागर शिंदे
राज्य संयोजक, विवेक विचार मंच

चारूदत्त टिळेकर

बारामती येथील तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयात वाणिज्य विषयामध्ये पदवीचे शिक्षण. पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूट येथून संज्ञापण आणि वृत्तपत्रविद्येमध्ये पदव्युत्तर पदवी. अनेक राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धांमध्ये सहभाग. रानडे इन्स्टिट्यूट येथे 'पश्चिम महाराष्ट्रातील वक्तृत्व स्पर्धांची परंपरा, समस्या आणि परिणाम' या विषयात सखोल अहवाल सादर. सध्या मुंबई तरुण भारत येथे पत्रकार म्हणून कार्यरत.