लबाना समाज आणि गुरु तेग बहादुर : एक ऐतिहासिक आणि अतूट नाते

    28-Feb-2026
Total Views |
The Labanas and Guru Tegh Bahadur
 
भारताच्या धर्म-शौर्य संस्कृतीमध्ये शीख समाजाचे अभूतपूर्व येागदान आहे. या अनुषंगाने शीख समाजाचे आणि लबाना समाजाचे नातेही तितकेच महत्त्वाचे. लबाना समाजाने शीख समाजाच्या रक्षणासाठी आणि प्रसारासाठी मोलाचे कार्य केले. लबाना समाज आणि गुरू तेग बहादूर यांचे असे हे ऐतिहासिक आणि अतूट नाते. त्या नात्याचे बंध या लेखात उलगडण्याचा प्रयत्न केला आहे.
शीख इतिहासामध्ये लबाना समाजाचे स्थान अत्यंत महत्त्वाचे आणि सन्माननीय आहे. या समाजाने केवळ व्यापार आणि उद्योगातच नव्हे, तर शीख धर्माच्या रक्षणासाठी आणि प्रसारासाठी मोलाचे योगदान दिले आहे. विशेषतः गुरू तेग बहादूर सिंग (शीखांचे नववे गुरू) आणि लबाना समाज यांच्यातील नाते हे श्रद्धा आणि सत्याचा शोध यावर आधारित आहे.
 
लबाना समाजाची ऐतिहासिक पार्श्वभूमी
 
‘लबाना’ हा शब्द प्रामुख्याने दोन शब्दांपासून बनला आहे, ‘लुण’ (मीठ) आणि ‘वाणा’ (व्यापार). ऐतिहासिकदृष्ट्या हा समाज मीठ आणि इतर जीवनावश्यक वस्तूंचा व्यापार करणारा समाज होता. प्राचीन आणि मध्ययुगीन काळात, जेव्हा वाहतुकीची साधने कमी होती, तेव्हा हा समाज बैलांवरून मालाची ने-आण करत असे. परंतु, ते केवळ व्यापारी नव्हते, तर ते शूर योद्धेदेखील होते. मुघल काळात आणि त्यानंतरच्या लढायांमध्ये त्यांनी आपल्या शौर्याने अनेकदा स्वतःला सिद्ध केले आहे. शीख धर्माच्या संपर्कात आल्यानंतर हा समाज गुरूंच्या शिकवणुकीशी एकरूप झाला.
 
गुरू तेग बहादूर आणि लबाना समाज : ‘बाबा बकाला’ प्रसंग
 
गुरू तेग बहादूर आणि लबाना समाज यांच्यातील संबंधांचा सर्वांत मोठा आणि ऐतिहासिक दुवा म्हणजे भाई मखन शाह लबाना. हे एक श्रीमंत व्यापारी आणि गुरूंचे निस्सीम भक्त होते. ही घटना शीख इतिहासाला कलाटणी देणारी ठरली. एकदा मखन शाह लबाना यांचे जहाज सामान घेऊन प्रवास करत असताना भयंकर वादळात सापडले. जहाज बुडण्याची भीती निर्माण झाली, तेव्हा मखन शाह यांनी मनोमन प्रार्थना केली की, "जर माझे जहाज आणि जीव वाचले, तर मी गुरूंच्या चरणी ५०० सुवर्णमुद्रा अर्पण करेन.” जहाज वाचले आणि मखन शाह यांनी शब्द दिल्याप्रमाणे गुरूंचा शोध सुरू केला.
 
त्याकाळात आठवे गुरू, गुरू हरिकृष्ण यांनी देह ठेवण्यापूर्वी केवळ ‘बाबा बकाला’ असे शब्द उच्चारले होते (याचा अर्थ पुढचे गुरू ‘बकाला’ या गावी आहेत.) जेव्हा मखन शाह बकाला येथे पोहोचले, तेव्हा तिथे स्वतःला गुरू म्हणवून घेणारे तब्बल २२ तोतया धर्मगुरू गादी मांडून बसले असल्याचा अनुभव आला. हे पाहून मखन शाह गोंधळले, पण त्यांनी हुशारीने एक युक्ती शोधली. ते प्रत्येक तोतया गुरूच्या समोर गेले आणि ५०० मुद्रांऐवजी केवळ दोन सुवर्णमुद्रा ठेवल्या. प्रत्येकाने त्या दोन मुद्रा स्वीकारल्या आणि आशीर्वाद दिला. मखन शाह यांना समजले की, हे खरे गुरू नाहीत, कारण खर्‍या गुरूंना माझ्या संकल्पाची (५०० मुद्रांची) जाणीव असायला हवी होती. शेवटी, त्यांना कळले की, एक तपस्वी ‘तेगा’ (गुरू तेग बहादूर) एका तळघरात ध्यानसाधना करत आहेत. मखन शाह तिथे गेले आणि त्यांनी दोन सुवर्णमुद्रा त्यांच्या समोर ठेवल्या. तेव्हा गुरू तेग बहादूर यांनी डोळे उघडले आणि शांतपणे म्हटले, "भाई मखन शाह, तू तर ५०० मुद्रांचे वचन दिले होतेस, मग केवळ दोन का?” हे ऐकताच मखन शाह यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. ते तडक घराच्या छतावर धावत गेले आणि तिथून त्यांनी मोठ्याने ओरडून जगाला सांगू लागले ‘गुरू लाधो रे! गुरू लाधो रे!’ म्हणजेच खरा गुरू सापडला! या घटनेमुळे जगाला नववे गुरू, गुरू तेग बहादूर यांची ओळख झाली. लबाना समाजाने जगाला खर्‍या गुरूंची ओळख करून दिली, हे या समाजाचे शीख धर्मावर मोठे ऋण मानले जाते.
 
लखी शाह बंजारा/लबाना यांचे बलिदान
 
केवळ गुरूंचा शोधच नव्हे, तर गुरूंच्या अंत्यसंस्कारांतही या समाजाचा (विशेषतः बंजारा/लबाना गटाचा) मोठा वाटा आहे. जेव्हा औरंगजेबाने दिल्लीच्या चांदणी चौकात गुरू तेग बहादूर यांचा शिरच्छेद केला, तेव्हा त्यांचे पार्थिव उचलण्याचे धाडस कोणामध्येही नव्हते. अशा वेळी भाई लखी शाह बंजारा (काही संदर्भांत लबाना समाजाशी संबंधित मानले जातात) यांनी अंधाराचा फायदा घेऊन आणि आपल्या बैलगाड्यांच्या ताफ्यातून गुरूंचे धड उचलले. मुघल सैन्याला संशय येऊ नये, म्हणून त्यांनी गुरूंच्या सन्मानार्थ स्वतःच्या घरालाच आग लावली आणि तिथेच गुरूंच्या देहावर अंत्यसंस्कार केले. आज ती जागा ‘गुरुद्वारा रकाब गंज साहिब’ (नवी दिल्ली) म्हणून ओळखली जाते.
 
सत्याची ओळख : मखन शाह लबाना यांच्यामुळे शीख पंथाला त्यांचे नववे गुरू मिळाले.
समर्पण : संपत्तीपेक्षा श्रद्धेला महत्त्व देणारा हा समाज आहे.
सेवाभाव : गुरूंच्या सेवेसाठी आणि धर्माच्या रक्षणासाठी या समाजाने नेहमीच पुढाकार घेतला आहे.
यावरून लबाना समाजाचा इतिहास आणि गुरू तेग बहादूर यांचे अतूट बंधन दिसून येते. आजही लबाना समाज गुरू तेग बहादूर यांना आपले दैवत मानतो आणि बाबा मखन शाह लबाना यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करतो. हा इतिहास केवळ एका समाजाचा नसून, निस्सीम भक्ती आणि धैर्याचे प्रतीक आहे.
 
- प्रशांत सातपुते
(लेखक जिल्हा माहिती अधिकारी, रत्नागिरी आहेत.)