Rashtriya e-Pustakalaya : २३ भाषा आणि हजारो पुस्तकांचा खजिना! 'राष्ट्रीय ई-पुस्तकालय' अ‍ॅप कसं वापरायचं?

    28-Feb-2026
Total Views |

e pustak

मुंबई (Rashtriya e-Pustakalaya) : वाचन संस्कृतीला चालना देण्यासाठी आणि देशातील प्रत्येक विद्यार्थ्याला दर्जेदार पुस्तके विनामूल्य उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने ‘राष्ट्रीय ई-पुस्तकालय’ हे विशेष डिजिटल व्यासपीठ सुरू केले आहे. नॅशनल बुक ट्रस्ट (NBT) द्वारे संचालित हे अ‍ॅप आता वाचक आणि विद्यार्थ्यांसाठी प्ले स्टोअर आणि अ‍ॅपल स्टोअरवर उपलब्ध झाले आहे.

राष्ट्रीय ई-पुस्तकालय हे एक विनामूल्य डिजिटल वाचनालय आहे, जिथे प्राथमिक स्तरापासून ते महाविद्यालयीन स्तरापर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी विविध विषयांवरील पुस्तके उपलब्ध आहेत. हे अ‍ॅप केवळ पाठ्यपुस्तकांतील ग्रंथांपुरते मर्यादित नसून, त्यात कथा, कादंबऱ्या आणि अवांतर वाचनाचाही मोठा साठा उपलब्ध आहे.

अ‍ॅपची प्रमुख वैशिष्ट्ये काय?
या अॅपमध्ये मराठीसह भारतातील २३ प्रमुख भाषांमध्ये पुस्तके उपलब्ध आहेत. कथा, विज्ञान, इतिहास आणि शैक्षणिक अशा विविध विषयांवरील ५ हजारांहून अधिक पुस्तकांचा संग्रह इथे वाचकांना निशुल्क स्वरुपात उपलब्ध आहे. ८० हून अधिक नामवंत प्रकाशकांची प्रकाशनं आपल्याला या ठिकाणी उपलब्ध होतात.

अ‍ॅप कसे वापरावे?
गुगल प्ले स्टोअर किंवा अ‍ॅपल अ‍ॅप स्टोअरवरून 'Rashtriya e-Pustakalaya' अ‍ॅप डाउनलोड करा. त्यामध्ये आवश्यक माहिती भरुन, नोंदणी प्रक्रिया पूर्ण करुन, आवडीचा विषय किंवा भाषा निवडून पुस्तके शोधा. यानंतर आपण दिलेल्या माहितीच्या आधारे तुमचे वैयक्तिक डिजिटल लायब्ररी कार्ड तयार होईल. या संदर्भातील अधिक माहितीसाठी https://ndl.education.gov.in/ या संकेतस्थळाला भेट द्या व आपली वाचनयात्रा त्वरित सुरु करा.