आम्ही सर्व पुण्याचे...

    28-Feb-2026
Total Views |
pune
 
गेल्या दीड वर्षांत पुण्यात अनेक स्थित्यंतरे दिसून आली. जशा माध्यमांकडून राजकीयदृष्ट्या पुण्यातील घडामोडी अधिकाधिक अधोरेखित झाल्या, तितक्याच अन्य हालचालीदेखील केंद्रस्थानी राहिल्या. जी काही राजकीय-प्रशासकीय अस्थिरता होती, ती आता जवळपास सर्वच निवडणुका आटोपल्याने संपुष्टात आली आहे. लोकसभा, विधानसभा, विधान परिषद, ग्रामपंचायती, नगरपालिका, नगरपंचायती, तसेच जिल्हा परिषदांच्या निवडणुकादेखील आटोपल्याने पुण्यात आणि जिल्ह्यात सगळे कारभारी कामाला लागले आहेत. त्यामुळे आधीच सुरू असलेल्या अनेक विकासकामांंना आता गती मिळेल, यात संदेह बाळगण्याचे कारण नाही. हे सगळेजण ‌‘आम्ही सर्व पुण्याचे‌’ म्हणून कामाला लागलेले पाहायला मिळत आहेत. महापालिकांच्या निवडणुकांनंतर हे चित्र अधिक स्पष्ट झाले आहे.
 
लोकसभा निवडणुकांनंतर आणि आधीदेखील अनेक पायाभूत प्रकल्पांच्या कामांनादेखील सुरुवात झालेली आपण पाहिली. त्यामुळे मेट्रो अधिक सक्षमतेने धावू लागली, बोगद्यातूनदेखील तिचा प्रवास सुरळीत आहे. विकासकामांसोबतच शासकीय नोकऱ्यांमध्ये अनेक तरुणांना सामावून घेण्याच्या कृतीतही पुण्याने आघाडी घेतली. अलीकडील काळात सर्वाधिक महसूल शासनाला मिळवून देण्यातदेखील पुणे विभागाचीच कामगिरी उल्लेखनीय. दोन्ही महापालिकांनीदेखील स्वच्छताविषयक कामांमध्ये पारितोषिके पटकावली आहेत. मेट्रोतून मिळणारा महसूल हा सरकारच्या उत्तम कामाची साक्ष देणारा आहे. आता आगामी काळात जवळपास सर्वच कार्य करणाऱ्या या संस्थांत पदाधिकारी आल्याने या कामांना गती येईल आणि प्रगतीचे-विकासाचे मार्ग प्रशस्त होताना दिसतील, अशी आशा बाळगायला हरकत नाही. येणाऱ्या काळात ‌‘मिसिंग लिंक‌’ प्रकल्प सुरू होणार असल्याने मुंबई-पुणे महामार्गावरील वाहतुककोंडी, लागणारा वेळ यात फरक दिसेल, असे मानायला हरकत नाही. मेट्रो काही दिवसांत पूर्व-पश्चिम धावू लागेल. वाहतुककोंडी सोडविण्याचे उपाय प्रभावी ठरले, तर वाहतुकीचा प्रश्न सुटणार आहे. महापालिकेचे कारभारी कामाला लागले असल्याने प्रभाग आणि परिसर स्वच्छ दिसायला सुरुवात झाली आहे. एकूणच, येणारा काळ राजकारण करून विचका करायचा नसून, ‌‘नॅरेटिव्ह‌’ निर्माण करणाऱ्यांना विकासकामातून हिसका दाखवायचा आहे.
 
काम करू ‌‘पुण्या‌’चे
 
निवडून आलेल्या सर्वांना आता ‌‘पुण्या‌’चे काम करायची भावना निर्माण झाली आहे. पाप करण्याचे कृत्य केले; तर जनता आम्हाला स्वीकारणार नाही, हे सर्वांना कळून चुकले आहे. जनतेने किंवा मतदारांनी ज्या विश्वासाने आम्हाला निवडून दिले आहे, त्या विश्वासाला पात्र ठरण्याशिवाय गत्यंतर नाही, याची जाणीव काळे कृत्य करणाऱ्यांना झाली आहे. जी काही गैरकृत्ये पुणे परिसरात झालीत, त्यांना वठणीवर आणण्यासाठी केंद्रापासून राज्यापर्यंत आणि सर्व यंत्रणा सक्रिय झाल्या होत्या. गुन्हेगारीने क्रूरतेचा कळस गाठला होता. ‌‘कोयता गँग‌’ने धुमाकूळ घातला होता. अमली पदार्थ पुरविणारे छुप्या पद्धतीने सक्रिय होते. ‌‘लव्ह जिहाद‌’, धर्मांतर करणारे डोके वर काढत होते, गोवंशांची सर्रास कत्तल करण्याचे, गोमांस-विक्रीचे छुपे धंदेदेखील चालायचे. ज्यांच्या काळापासून या सर्वांना राजाश्रय होता, तेच नंतर केंद्रातील मोदी आणि राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार जबाबदार असल्याचा आव आणीत होते. तथापि, याच सरकारांनी या सगळ्या खोटारड्या आणि घाणेरडी पापे करणाऱ्यांच्या मुसक्या आवळण्याचा सपाटा लावला. त्यामुळे आता याच सरकारांचे प्रतिनिधी सर्वच पातळ्यांवर सत्तेत असल्याने अशी पापाची कामे करता येणार नाहीत, ही जाणीव या लोकांना झाली असेल; असे मानायला हरकत नाही.
 
त्यामुळे आपण कामे करताना ‌‘पुण्या‌’चीच करू, हा निर्धार किंवा ही भावना समाजातून निर्माण होत असेल; तर ते या पुण्यनगरीच्या लौकिकात भर टाकणारे असेल. सुदैवाने या राज्यात नेतृत्व करणारे देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या सरकारमधील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार हे कार्यक्षम आहेत. त्यामुळे आगामी काळात विकासाच्या वाटा अधिक चकाकलेल्या दिसतील. गुन्हेगारी आणि सरकारला बदनाम करणारे आता यातून धडा घेतील आणि त्यांनी डोके वर काढलेच; तर त्यांची पाचावर धारण बसविण्यास सर्व निवडून आलेले प्रतिनिधी, विशेषतः महिला प्रतिनिधी या लोकांना सोडणार नाहीत,
हे कुरापती करणाऱ्यांनी लक्षात घ्यावे, एवढेच येथे सुचविणे रास्त ठरेल.
 
- अतुल तांदळीकर