तेल अविव : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नुकत्याच संपन्न झालेल्या इस्रायल दौर्यामध्ये जवळपास २७ तासांमध्ये २७ करार केले असून, यामुळे दोन्ही देशांतील संबंध एका नव्या उंचीवर पोहोचले आहेत. पंतप्रधान पदाच्या कार्यकाळात पंतप्रधान मोदी यांचा हा दुसरा इस्रायल दौरा असून, या दौर्यामध्ये पंतप्रधान मोदींचे स्वागत करण्यासाठी आणि त्यांनी निरोप देण्यासाठी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू सहपत्नीक विमानतळावर उपस्थित राहिले होते.
पंतप्रधान मोदींच्या या इस्रायल दौर्यामध्ये भारताकडून इस्रायलबरोबर धोरणात्मक भागीदारी अधिक मजबूत करण्याकडे लक्ष देण्यात आले. या दौर्यामध्ये भारताने २७ क्षेत्रांमध्ये इस्रायल बरोबर भागीदारी करताना, विविध क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवण्याचा प्रयत्न करण्यात आला. यामध्ये सर्वाधिक महत्त्वाचे म्हणजे, सायबर सुरक्षा, कृषी, संरक्षण क्षेत्रातील सहकार्य, कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रातील सहकार्य, अंतराळ क्षेत्र, तंत्रज्ञान देवाणघेवाण अशा विविध क्षेत्रात सहकार्य वाढवण्याचे करार केले.
या दौर्यात झालेल्या करारानुसार, इस्रायल भारतात एक अत्याधुनिक सायबर सुरक्षा केंद्र स्थापन करण्यासाठी सहकार्य करणार असून, देशातील ग्रामीण भागामध्ये एआय तंत्रज्ञान पोहोचवण्यासाठीही इस्रायली तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. तसेच, संरक्षण क्षेत्रातील ड्रोन, क्षेपणास्त्रे, रोबोटिक्स यांच्या संयुक्त उत्पादनालाही चालना देण्याचे करार दोन्ही देशांमध्ये करण्यात आले असून, यामध्ये तंत्रज्ञान हस्तांतरणाचाही समावेश करण्यात आला आहे. तसेच, या दौर्यामध्ये मुक्त व्यापार कराराला आकार देण्याबाबतही दोन्ही देशातील नेत्यांमध्ये चर्चा या दौर्यामध्ये करण्यात आली.
या दौर्यामध्ये पंतप्रधान मोदी यांनी इस्रायलच्या संसदेला संबोधित केले असून, त्यांना इस्रायलच्यावतीने संसदेचा सर्वोच्च पुरस्कार ‘स्पीकर ऑफ द क्नेसेट’ पुरस्काराने गौरवण्यात आले. तसेच, भाषणादरम्यान पंतप्रधान मोदी यांनी भारत आणि इस्रायल यांच्यातील दीर्घ मैत्रीवर प्रकाश टाकला. तसेच, भाषणामध्ये ‘हमास’च्या कृत्याचा उल्लेख दहशतवादी असा करताना, आज जगाला शांततेची गरज असून माणुसकीला कोणी बंधक करु शकत नसल्याचे म्हटले आहे. तर, इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू यांनी देखील त्यांच्या मनामध्ये भारताविषयी असलेल्या जिव्हाळ्याचा उल्लेख त्यांच्या भाषणादरम्यान केला. पंतप्रधान मोदी यांच्या या दौर्यामध्ये जागतिक मंचावरील सहकार्यामध्ये वृद्धी करण्याबाबतही दोन्ही नेत्यांमध्ये सहमती झाली.
विरोधीपक्षांनी आळवला ‘मोदी तुझसे बैर नही’चा आलाप...
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या इस्रायल दौर्यादरम्यान इस्रायलच्या विरोधी पक्षांने इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू यांच्या धोरणांचा विरोध करण्यासाठी संसदेचा त्याग केल्याने, गोंधळ निर्माण झाला होता. मात्र, हा त्याग प्रतिकात्मक असून, काही वेळातच विरोधक मोदींचे संबोधन ऐकण्यासाठी संसदेत पुन्हा आले होते. यावरुन भारतातील विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसने पंतप्रधान मोदींवर टीका केली होती. मात्र, इस्रायलचे विरोधी पक्ष नेते लायर लैपीड यांनी पुढे येऊन आमचा संसदत्याग हा पंतप्रधान मोदींसाठी नसून, संपूर्ण इस्रायल संकट काळात मोदींच्या भक्कम पाठिंब्यासाठी त्यांचा आभारी असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे एकप्रकारे इस्रायलमधील विरोधक ‘मोदी तुझसे बैर नही’ हाच आलप आळवत असल्याचे चित्र दिसून आले.