मंत्र्यांचे आदेश न मानणाऱ्या 'आयएएस' अधिकाऱ्याची उचलबांगडी

    28-Feb-2026   
Total Views |

मुंबई : पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी ब्रीफिंगसाठी वारंवार बोलावूनही महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव एम. देवेंद्र सिंग उपस्थित न राहिल्याने त्यांचे थेट निलंबन करण्यात आले. महाराष्ट्र विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान ही कारवाई करण्यात आली आहे.

गुरुवारी सभागृहात चंद्रपूरमधील आमदारांनी पर्यावरणासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर मंत्री पंकजा मुंडे यांना तत्काळ उत्तर देता आले नाही. त्या म्हणाल्या की, "संबंधित अधिकाऱ्याला याबाबत पूर्वकल्पना देऊन ब्रीफिंगसाठी बोलावण्यात आले होते. मात्र, त्यांनी ब्रीफिंग दिले नाही आणि वारंवार बोलावूनही ते उपस्थित राहिले नाहीत. तालिका अध्यक्ष दिलीप लांडे यांनी या बाबीची गंभीर दखल घेत तत्काळ निलंबनाचे आदेश दिले. त्यानुसार शुक्रवारी सामान्य प्रशासन विभागाकडून अतिरिक्त सचिव व्ही. राधा यांच्या सहीने आदेश जारी करण्यात आला आहे. अखिल भारतीय सेवा (शिस्त व अपील) नियम, १९६९ मधील नियम ३(१)(a) अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे.

दरम्यान, निलंबन काळात एम. देवेंद्र सिंग यांचे मुख्यालय मुंबई राहील. कोकण विभाग, मुंबई विभागीय आयुक्तांची पूर्वपरवानगी घेतल्याशिवाय त्यांना मुख्यालय सोडता येणार नाही. या कालावधीत कोणतीही खासगी नोकरी, व्यापार किंवा व्यवसाय करता येणार नाही. निलंबन काळात त्यांना निर्वाह भत्ता व महागाई भत्ता देण्यात येईल. मात्र, त्यासाठी इतर कोणत्याही नोकरीत किंवा व्यवसायात सहभागी नसल्याचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील. अटींचे उल्लंघन झाल्यास ते गैरवर्तन समजून पुढील शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल.


अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....