मानवतेचे रक्षक

    28-Feb-2026
Total Views |
Guru Tegh Bahadur Ji
 
भय काहू को देत नहि, नहि भय मानत आन असा निर्भयतेचा संदेश देणारे श्री गुरू तेग बहादुर साहिब जी यांच्या ३५०व्या शहिदी समागम वर्षानिमित्त या महान क्रांतिकारकाला, धर्मरक्षकाला आणि मानवतेच्या कवचाला माझे कोटी कोटी प्रणाम. संपूर्ण भारताच्या अस्मितेचा आणि मानवी हक्कांसाठी दिलेल्या सर्वोच्च बलिदानाचा हा सन्मान आहे.
जेव्हा १७व्या शतकात धार्मिक कट्टरता आणि अन्यायाने कळस गाठला होता, तेव्हा श्री गुरू तेग बहादुर साहिबजी यांनी निर्भीडपणे जुलमी सत्तेला आव्हान दिले. त्यांनी केवळ शिख धर्मासाठी नाही, तर संपूर्ण हिंदुस्थानच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक अस्तित्वासाठी बलिदान दिले. म्हणूनच त्यांना 'हिंद-दी-चादर' या सार्थ पदवीने गौरविले आहे. त्यांच्या बलिदानाची व्याप्ती इतकी मोठी होती की, त्यांच्या निधनानंतरही त्यांच्या अनुयायांनी दिलेला लढा थक्क करणारा आहे.
इतिहासात अशा अनेक लढाया झाल्या जिथे स्वतःच्या अस्तित्वासाठी संघर्ष झाला, पण गुरू तेग बहादुर साहिबजींचा लढा हा 'दुसऱ्याच्या' अस्तित्वासाठी आणि धार्मिक स्वातंत्र्यासाठी लढला गेला. ज्यावेळी औरंगजेबी सत्तेने काश्मिरी पंडितांवर धर्मांतराची तलवार टांगली होती, त्यावेळी गुरूजींनी स्वतः पुढे होऊन अन्यायाला आव्हान दिले. "शीश दिया पर सिर न दिया" त्यांचे हे बलिदान भारताची संस्कृती आणि धर्माचे रक्षण करणारे 'कवच' ठरले, म्हणूनच त्यांना 'हिंद-दी-चादर' ही पदवी सार्थ ठरली.
महाराष्ट्राचा आणि शीख परंपरेचा संबंध अतिशय जुना आणि जिव्हाळ्याचा आहे. गुरू तेग बहादुरजींचे सुपुत्र आणि दहावे गुरू श्री गुरू गोविंद सिंगजी यांनी महाराष्ट्रातील नांदेडच्या पवित्र भूमीत आपले शेवटचे दिवस घालवले. शीख धर्माचे दहावे गुरू श्री गोविंद साहिबजी यांची कर्मभूमी ही श्री हुजूर साहिब नांदेड असून याठिकाणी त्यांनी सर्व शीख बांधवांना उद्देशून, 'सब सिक्खन को हुकम हे गुरू मान्यो ग्रंथ साहिब' असा उपदेश दिला होता.
हा मानवतेचा संदेश घरोघरी पोचविण्यासाठी व श्री गुरु तेग बहादुर साहिब यांच्या त्यागाची शिकवण समाजाच्या सर्व घटकांत पोचविण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने तेग बहादुर साहिब यांच्या शहिदीला ३५० वर्ष पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने आखलेल्या कार्यक्रमाची सुरुवात सर्व धर्म समाभावाची भूमी नागपूर येथून सुरुवात करण्यात आली. श्री गुरू तेग बहादुर साहिबजींचा हा प्रेरणादायी इतिहास महाराष्ट्राच्या प्रत्येक गावापर्यंत पोहोचवण्यासाठी राज्यातले महायुती सरकार प्रयत्न करत आहेत. ज्या काळात समाज जाती-पातीत विभागला गेला होता, त्या काळात समाजाला एका सूत्रात बांधून धर्मरक्षणासाठी प्रेरित करण्याचे महान कार्य गुरूजींनी केले. या ऐतिहासिक कार्यासाठी आमचे सरकार कटिबद्ध आहे. राज्य शासनामार्फत १० डिजिटल रथ उपलब्ध करून देण्यात आले असून, ६००० पेक्षा जास्त गावांमध्ये याद्वारे जनजागरण मोहीम राबवली जात आहे. या महोत्सवाच्या माध्यमातून सिंधी, बंजारा, वाल्मिकी, सिकलगर, लबाना, मोहियाल यांसह सर्व समाजाला एकत्र आणण्याचे काम केले जात आहे. गुरूजींच्या महान कार्याची माहिती देश-विदेशात पोहोचवण्यासाठी आणि इतिहासातील संदर्भासह प्रसार करण्यासाठी राज्य सरकारने 'राज्यस्तरीय प्रदर्शनी समिती'ची स्थापना केली आहे.
श्री गुरू तेग बहादुर साहिबजींनी दिलेला "भय काहू को देत नहि, नहि भय मानत आन" हा विचार आजही तितकाच प्रासंगिक आहे. त्यांनी केवळ प्रार्थनेला महत्व दिले नाही, तर परोपकार, सेवा आणि साधेपणा या मूल्यांचा प्रचार केला. त्यांचे विचार 'गुरू ग्रंथ साहिब'मध्ये समाविष्ट असून ते आजही मानवतेला शांती आणि धैर्याचा मार्ग दाखवत आहेत. श्री गुरू तेग बहादुर साहिबजींनी ३५० वर्षांपूर्वी मानवता आणि धर्मासाठी दिलेले बलिदान हे जगाला ज्ञानाचा मार्ग दाखविणाऱ्या आपल्या देशावरील आक्रमणाविरुद्ध दिलेला एक बुलंद आवाज होता. त्यांच्या बलिदानाचा हा वारसा आपण अखंड तेवत ठेवू. समाजातील प्रत्येक घटकाला सुरक्षित वाटावे आणि अन्यायाविरुद्ध लढण्याची शक्ती मिळावी, हेच आमच्या शासनाचे ध्येय आहे.
श्री गुरू तेग बहादुर साहिबजी यांचे मोठेपण यात आहे की, त्यांनी दुसऱ्याच्या श्रद्धेच्या रक्षणासाठी स्वतःचे शीश अर्पण केले. औरंगजेबाच्या जुलमी राजवटीत जेव्हा काश्मिरी पंडितांवर सक्तीने धर्मांतर लादले जात होते, तेव्हा गुरूजींनी न्यायाची बाजू घेतली. त्यांनी ठणकावून सांगितले की, "जर माझ्या बलिदानामुळे निरपराधांच्या श्रद्धेचे रक्षण होणार असेल, तर तेच माझे सर्वोच्च धर्मकर्म ठरेल." ही केवळ घोषणा नव्हती, तर मानवतेच्या रक्षणाचे एक महाव्रत होते. दिल्लीच्या चांदनी चौकात दिलेले त्यांचे बलिदान हे मानवी हक्कांच्या रक्षणासाठी दिलेला जगातील सर्वात मोठा लढा मानला जातो. त्यांच्यासोबत भाई मतीदास, भाई सतीदास आणि भाई दयाला यांनीही आपल्या प्राणांची आहुती देऊन गुरूनिष्ठेचा आदर्श निर्माण केला.
महाराष्ट्र आणि पंजाब यांच्यातील नाते रक्तापेक्षाही घट्ट आहे. महाराष्ट्राचे संत नामदेव महाराज यांनी भागवत धर्माची पताका पंजाबपर्यंत नेली. शीख धर्माच्या पवित्र 'श्री गुरू ग्रंथ साहिब' मध्ये संत नामदेवांची ६१ पदे समाविष्ट आहेत. पंजाबमधील घुमान येथे त्यांनी घालवलेली २० वर्षे आणि तेथील 'तपियाना साहिब' हे स्थान आजही महाराष्ट्र-पंजाबच्या आध्यात्मिक ऐक्याचे प्रतीक आहे. त्याचप्रमाणे, दहावे गुरू श्री गोविंद सिंग जी यांनी महाराष्ट्रातील नांदेड (श्री हजूर साहिब) ही आपली कर्मभूमी निवडली. त्यांनीच 'गुरू मान्यो ग्रंथ' हा अमर संदेश देऊन ग्रंथ साहिबजींना कायमस्वरूपी गुरुपद बहाल केले. भक्ती आणि शक्तीचा हा संगम आजही महाराष्ट्राच्या मातीत जिवंत आहे.
गुरू साहेबांच्या ३५०व्या शहीदी वर्षाचे औचित्य साधून महाराष्ट्र शासन, नागपूर, नवी मुंबई आणि नांदेड यांसह राज्यभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या कार्यक्रमांचे संकेतस्थळ आणि त्यांच्या बलिदानावर आधारित गीताचे लोकार्पण करण्यात आले. 
सर्वसामान्य माणसाच्या हक्काचे रक्षण करणे, अन्यायाविरुद्ध उभे राहणे आणि सर्वांना सोबत घेऊन विकास करणे, हेच आमचे ध्येय आहे. श्री गुरू तेग बहादुर साहिबजींच्या ३५०व्या शहीदी समागमानिमित्त, आपण त्यांच्या विचारांची ज्योत आपल्या मनात प्रज्वलित ठेवूया. 'हिंद-दी-चादर' श्री गुरू तेग बहादुर साहिबजी यांचा त्याग आणि त्यांचे महान विचार घराघरात पोहोचवणे, हाच आमचा प्रामाणिक उद्देश आहे. या महान क्रांतिकारकाला, धर्मरक्षकाला आणि मानवतेच्या कवचाला माझे कोटी कोटी प्रणाम..
घुमान विषयी माझी एक आठवण आहे. खर म्हणजे मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो..कारण संत शिरोमणी नामदेव महाराजांच्या ७५५व्या प्रकाशोत्सवाच्या औचित्याने संत नामदेवांनी जेथे आपल्या आयुष्यातला उत्तरार्ध व्यतित केला त्या पंजाबमधील घुमान येथे संत नामदेव महाराष्ट्र सदनचे भूमिपुजन काही महिन्यांपूर्वी माझ्या हस्ते झाले. त्याचबरोबर या कार्यक्रमात घुमान मधील नामदेव दरबार कमिटी आणि ग्रामस्थांच्या वतीने मला ‘बाबा नामदेव महाराज सन्मान पुरस्कार’ देवून गौरविण्यात आले.
 
पंजाब शासनाने सरहद संस्थेला दिलेल्या दोन एकर जागेत हे महाराष्ट्र सदन उभारण्यात येणार असून महाराष्ट्राच्या वारकरी संप्रदायासाठी श्रद्धेचे ठिकाण असलेले घुमान हे गाव देशाच्या पर्यटन नकाशावर येण्यासाठी महाराष्ट्र शासन प्राधान्याने पुढाकार घेईल, अशी ग्वाही मी यावेळी घुमानवासियांना दिली होती.
 
- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे