हिंद-दी-चादर समरसतेची प्रेरणा

    28-Feb-2026   
Total Views |
Guru Tegh Bahadur
 
गुरू तेग बहादूर सिंग जसे शौर्याचे, वीरतेचे प्रतिक होते, तसेच ते सामाजिक समरसतेचे आणि ऐक्याचेही प्रणेता होते. गोरगरीब, शोषित, वंचित समाजामध्ये त्यांनी आत्मशक्तीची प्रेरणा जागृत केली. विविध समाजबांधवांची गुरू तेग बहादूर यांच्यावर निष्ठा होती. तत्कालीन वाल्मिकी समाजाचे आणि गुरू तेग बहादूर सिंग यांचे नातेही असेच सामाजिक समरसतेची प्रेरणा देणारे, धर्मनिष्ठा जागवणारे गुरू तेग बहादूर सिंग यांच्या शौर्यशाली आणि सामाजिक समरसतेचा मंत्र देणार्‍या जीवनकार्याचा मागोवा या लेखात घेतला आहे.
 
तिलक जंञू राखा
प्रभ ताका॥
कीनो बडो कलू
महि साका॥
धरम हेत साका
जिनि कीआ॥
सीसु दीआ परु
सिररु न दीआ॥
‘हिंद-दी-चादर’, श्री गुरू तेग बहादूर|
 
याचा अर्थ गुरू तेग बहादूर यांनी तिलक आणि जंजम(हिंदू धर्मा)ची रक्षा केली. त्यांनी कलियुगात मोठे बलिदान केले. साधूंच्या-सज्जनांच्या धर्माच्या रक्षणासाठी त्यांनी आपले शिर दिले (सर्वोच्च बलिदान दिले;) पण त्यांच्या मुखातून ‘ब्र’ शब्द उच्चारला नाही. धर्मासाठी बलिदान केले, असे ‘हिंद-दी-चादर’ आहेत, श्री गुरू तेग बहादूर सिंग. त्यांना ‘हिंद-दी-चादर’ का बरं म्हटले जाते? तर क्रूर परकीय धर्मांध आक्रमणकर्त्यांपासून त्यांनी हिंदूंचे, हिंदू धर्माचे रक्षण केले. त्यांचे बलिदान शब्दातीत आहे. त्यांचे आयुष्य प्रेरणेचे आणि त्यागाचे धगधगते अग्निकुंड होते. ते ‘हिंद-दी-चादर’ होते.
 
तर दि. ११ नोव्हेंबर १६७५चा तो काळा दिवस. औरंगजेबाच्या आदेशाने दिल्लीच्या चांदनी चौकामध्ये गुरू तेग बहादूरजींचे शिर कापण्यात आले. धर्मरक्षणासाठी गुरू तेग बहादूरांनी हौतात्म्य पत्करले. त्यावेळी मुघलांच्या भीतीने कुणीही गुरू तेग बहादूर सिंगांचे शिर उचलण्याची हिंमत केली नाही. अशा वेळी भाई जैताजी (सदानंदजींचे पुत्र) यांनी गुरू तेग बहादूर यांचे शिर तिथून आणण्याची जबाबदारी घेतली. मुघलांना याची खबर लागू नये, म्हणून गुरूजींच्या शरीराच्या जागी दुसरे शरीर ठेवणे आवश्यक होते. त्यावेळी भाई सदानंद यांनी मृत्यू पत्करत स्वतःचे शरीर गुरूंच्या जागी ठेवले. भाई जैता यांनी गुरूंचे शिर पंजाबच्या आनंदपूरमध्ये आणलेच. गुरू तेग बहादूरांप्रति किती ती निष्ठा, किती ती श्रद्धा!
 
त्यांचे शौर्य साहस आणि गुरूप्रति असलेली निष्ठा पाहून गुरू गोविंद सिंग म्हणाले, "रंगरेटे गुरू दे बेटे!” ‘रंगरेटे’ म्हणजे वाल्मिकी किंवा मेहतर. ते कुणाचे पुत्र? तर ते पुत्र आहेत, गुरू तेग बहादूर सिंग यांचे. रंगरेटे हे या गुरू तेग बहादूरांचे बेटे आहेत, असे सन्मानपूर्वक गुरू गोविंद सिंग म्हणतात. जाती-पातीच्या विषैल भिंती त्यावेळीही होत्याच. मात्र, गुरू तेग बहादूरांसाठी भाई सदानंद आणि भाई जैता हे बाप-लेक जीवावर उदार झाले. त्यांचे कापलेले शिर दिल्लीहून परत आणण्यासाठी या दोघांनी पराक्रमाची, विरतेची आणि हिमतीची शर्थ केली. कोण कुणासाठी जीवाची बाजी लावते आणि मृत्यूच्या छायेत जाते? पण यांनी केले. का? कारण, गुरू तेग बहादूरांशी असलेले माणुसकीचे आणि धर्माचेही नाते. दुर्दैवाने ‘अस्पृश्य’ म्हणून ज्यांना हिणवले गेले, ज्यांच्या संधी हिरावल्या गेल्या, त्यांना गुरू तेग बहादूर यांनी सन्मानाने जगण्याची संधी दिली. त्यांच्यातले कर्तृत्व प्रकाशमान केले. भाई जैता आणि भाई सदानंद यांच्या निर्भयतेचे शब्दांत वर्णन करणे शक्य नाही. ही निर्भयता ही आत्मशक्ती कसले प्रतीक होती? तर ते प्रतीक होते, गुरू तेग बहादूर यांच्या वचनाचे.
 
भै काहू कउ देत नहि नहि भै मानत आन॥
 
याचा अर्थ आहे, ‘भयमुक्त व्हा, कोणाला घाबरू नका आणि कोणाला घाबरवू नका.’ तो काळ होता, १६व्या शतकाच्या उत्तरार्धातला. औरंगजेबाच्या क्रूर आणि धर्मांध सत्तेने देशाचे आणि जनतेचे वाटोळे केले होते. हिंदू धर्मीयांना जगणे म्हणजे सुळावरची पोळीच होते. अशा काळात गुरू तेग बहादूर यांनी भारतभर भ्रमण करत लोकांमध्ये चेतना जागवत की, ‘कशाला आणि कोणाला घाबरता? बिलकूल घाबरू नका.’ गुरू तेग बहादूर यांनी जनतेत निर्भयता पेरली. दुसरीकडे अत्याचारी वृत्ती असलेल्यांना जरब दिली की, कुणालाही घाबरवू नका. ‘घाबरू नका आणि घाबरवू नका,’ या त्यांच्या वचनाने समाजात जागृती आली. औरंगजेबाच्या आणि त्याच्यासारख्याच क्रूर लोकांच्या दहशतीला भीक घालायची नाही, हे वचन भारतीयांच्या मनात रूजले. हे वचन भाई जैता आणि भाई सदानंद अक्षरशः जगले.
 
दीन, दलित, शोषित, वंचित समाज गुरू तेग बहादूर यांच्यासोबत आला. कारण, गुरूंनी शोषित-वंचित समाजाचे दुःख दूर करण्यासाठी प्रयत्न केले. दुर्बल शोषितांविरोधात समाजात माजलेल्या अनिष्ट रूढींच्या विरोधातही त्यांनी देशात जागरण केले. शोषित-वंचित समाजाचे दुःख, दैन्य पाहून त्यांचे मन कळवळले. भूक दैन्य आणि उपासमार यांनी होरपळलेल्या बांधवांची स्थिती पाहून ते व्यथित झाले. त्यावेळीही दानशूर लोक दान-पुण्य करतच होते. त्या दानाशी सामाजिक बांधिलकीचे नाते निर्माण व्हावे, म्हणून गुरू म्हणाले, ‘गरीब दा मुंह, गुरू की गोलक’ याचा अर्थ आहे, ‘गरीब आणि गरजवंतांची सेवा करणे; त्यांना अन्न उपलब्ध करून देणे, म्हणजे साक्षात गुरूची सेवा करणे होय. ज्याप्रमाणे आपण गोलक (बचत करण्याच्या डब्यात) पैसे साठवतो, त्याचप्रमाणे गरिबांना अन्न देणे, म्हणजे साक्षात परमेश्वरांच्या मुखात अन्न भरवणे आहे. दुष्काळ महामारी आणि परकीय आक्रांतांच्या अत्याचाराने पिळवटलेल्या असाहाय्य बांधवांसाठी हे वचन जीवन देणारे ठरले. ते म्हणत, ‘जिस की देग उस की तेग|’ याचा अर्थ, जो गरिबांना अन्न भरवतो, तो दयाळू आहे आणि वास्तवात तोच तलवारीचा योग्य वापर करू शकतो. शौर्य आणि दयेचा असीम सागर असणारे गुरू तेग बहादूर.
 
गुरूंच्या वचनाने शोषित-वंचित समाजघटक गुरूंच्या थेट संपर्कात आले. जाती-पातीवरून किंवा गरीब-श्रीमंत हा भेद न करता, गुरू तेग बहादूरांनी सगळ्यांना आपल्या सोबत घेतले. त्यात सर्व समाजांचे लोक होते. तत्कालीन जाती-पातीच्या विषम उतरंडीचे कणभरही परिणाम गुरूंच्या संगतीमध्ये नव्हते. त्यामुळेच तर ‘आम्हाला वाचवा’ म्हणत काश्मिरी पंडित त्यांच्याकडे विश्वासाने आले आणि दुसरीकडे तत्कालीन मागासवर्गीय समाजाचे बांधवही त्यांच्या साथीला आले. हा पुजारी आहे किंवा हा स्वच्छताकर्मी आहे, असा कोणताच भेद गुरूंनी केला नाही. समाजबांधवांवर झालेल्या अन्यायाविरोधात त्यांनी संघर्ष पुकारला.
 
काश्मिरी ब्राह्मणांची दयनीय स्थिती आणि त्यांच्यावर इस्लामी आक्रंत्यांनी केलेले भयंकर अत्याचार पाहून ते काश्मिरी ब्राह्मणांच्या रक्षणासाठी सज्ज झाले. याचे परिणाम भयंकर होतील, हे माहीत होते. पण त्याची पर्वा करतील, तर ते गुरू तेग बहादूर कसले? ते म्हणाले, "आपले शिर त्यागा (म्हणजे मृत्यू पत्करा;) पण ज्यांच्या रक्षणाचे दायित्व तुम्ही घेतले, त्यांची साथ कोणत्याही परिस्थितीमध्ये सोडू नका.” या विचारानुसारच त्यांनी काश्मिरी पंडितांच्या अत्याचाराविरोधातला संघर्ष सोडला नाही आणि काश्मिरी पंडितांची साथही सोडली नाही.
 
त्यामुळे क्रूर-कपटी औरंगजेबाने त्यांच्याशी वैर आरंभले. समाजात स्वधर्माची प्रेरणा देणार्‍या, जाती-पातीला मूठमाती देऊन ‘एक व्हा’ असा संदेश देणारे गुरू तेग बहादूर समाजाच्या हृदयात विराजमान झाले. भलेही गुरूंचा लोकार्थाने क्रूर मृत्यू झाला. मात्र, त्यांच्या धर्मनिष्ठा आणि समाजधर्मासाठी असलेल्या निर्भयतेने अवघ्या भारतीयांच्या मनात चेतना जागवली. अत्याचाराविरोधात निर्भयतेने उभे ठाकण्याची प्रेरणा दिली. दुसरीकडे रंगरेटे असलेल्या पिचलेल्या समाजाला आत्मशक्ती आणि आत्मप्रेरणा दिली की ते गुरूचे बेटे आहेत. ते दुर्बल नाहीत. साक्षात गुरू तेग बहादूरांशी आपले नाते आहे. समाजाला दुर्दम्य धर्मशक्तीची आणि आत्मशक्तीची प्रेरणा देणारे ‘हिंद-दी-चादर’ गुरू तेग बहादूर. यांचे समरस सामाजिक कार्य आणि विरतेची धर्मनिष्ठा समाजाला कायमच वंदनीय आणि प्रेरणादायी आहे.
 
 
 

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.